माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्या हस्ते गॅलेक्सी मॉलचे उद्घाटन
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी दुपारी लातूर शहरातील अंबाजोगाई रोड भागात सुप्रसिद्ध व्यावसायिक उद्योजक डॉ. साकीब आबास कायमखानी यांच्याकडून सुरु करण्यात आलेल्या गॅलेक्सी मॉलची मोलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गॅलेक्सी मॉलमधील फॅशन, फूड, फन गेम झोनची पाहणी करून कायमखानी कुटुंबीयांना त्यांच्या पुढील यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, डॉ. साकिब आबास कायमखानी, खालीद कायमखानी, उमर कायमखानी, तौफिक कायमखानी, लातूर शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस फैजल कायमखानी, गणेश एस.आर.देशमुख, विष्णू धायगुडे, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कायमखानी कुटुंबीय, मित्रपरिवार उपस्थित होता.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरमध्ये गॅलेक्सी मॉल सुरुवात होत आहे याचा मला मनस्वी आनंद झाला असून आपली लोक असे चांगली कामे करतात याच कराव तेवढ कौतुक कमी आहे. लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख म्हणायचे लातूर पूर्वीपासूनच नावाजलेलं शहर आहे. आणि या शहराला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख पुढे नेत आहेत.
लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांनी लातूरला आपले घर मानले त्यांनी लातूरला सांभाळले.लातूर हे केवळ शहर नाही तर असे घर आहे ज्याला दरवाजे नाहीत आपण सर्वजण लातूरात कुठेही सुख, शांतीने वास्तव्य करू शकतो. लातूरला आपणाला खूप पुढे घेऊन जायचे आहे आपण लातूरकर सर्वांच्या सोबतीने एकत्रितरीत्या प्रयत्नरत राहून लातूरला आणखी पुढे नेऊ याचा मला पूर्ण विश्वास आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूरमध्ये कुठलाही व्यवसाय करण्यासाठी कुणालाही अडचणी येत नाही कायमखानी परिवाराची नवीन पिढी व्यवसायासह राजकारणात काम करत आहे. हा परिवार उद्योग, व्यवसाय, व्यापार, सामाजिक क्षेत्रात काम करणारा कष्टाळू परिवार आहे. राजकारणात उच्च शिक्षण घेतलेले गुणवत्ता असलेले लोक आले पाहिजेत.
आंतरराष्ट्रीय मॉल सारखा गॅलेक्सी मॉल आज लातुरकराना दिसतो आहे लातूरकरांना या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादने, सोयीसुविधा मिळतील.
सर्वांच्या मदतीने येणाऱ्या काळात स्वच्छ, सुंदर, विकसित लातूर शहर बनवू असे म्हणत त्यांनी सर्वांना रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती परशुराम जयंती, अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खालीद कायमखानी यांनी केले तर मनोगत मनोगत डॉ. साकीब कायमखानी, तौफिक कायमखानी, फैजल कायमखानी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गाप्रसाद मोठे यांनी केले तर शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार उमर कायमखानी यांनी मानले.