महाविकास आघाडीने शिवसेनेच्या पाठीत खंजर खूपसला – कैलास पाटील
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे पॅनल ठरवत असताना, शिवसेनेला विश्वासात घेतले नाही. शेवटपर्यंत आघाडीचा धर्म पाळण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ऐनवेळी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज परत घेण्याचा सूचना केल्या. कार्यकर्त्यांनी पक्ष आदेश असेल, असे समजून उमेदवारी अर्ज परत घेतले. मात्र शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांचे फोन देखील काँग्रेसच्या नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतले नाहीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तितकेच ते धोकादायक ही आहे. शिवसेनेचे आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे फोटो बॅनर वर टाकले नाहीत. स्थानिक कार्यकर्त्यांचे फोटो घेतले, ते अत्यंत चुकीचे आहे. शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो टाकने आणि महाविकास आघाडी असल्याचे सांगणे हे चुकीचे आहे. आगामी काळात कार्यकर्त्यांच्या निवडणुकांच्या वेळी शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवेल, अशी माहिती उदगीर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी दिली. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अंकुशराव कोनाळे, शहर प्रमुख मुन्ना पांचाळ, विधानसभा समन्वयक प्रकाश हैबतपुरे, उपशहर प्रमुख संजय मठपती, तालुका संघटक बालाजी पुरी, उपतालुकाप्रमुख गोविंदराव बेंबडे, महेश फुले, उपशहर प्रमुख व्यंकटराव साबणे, शिक्षक सेना तालुकाप्रमुख तातेराव मुंडे, धावणगाव येथील शिवसेना शाखा संघटक भाऊसाहेब भंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना ही स्वाभिमानी संघटना असून अशा पद्धतीने विश्वासघात जर केला जात असेल तर, शिवसेनेची ताकद निश्चितपणे शिवसैनिक दाखवतील. असा विश्वासही अंकुशराव कोनाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी शिवसेनेला विश्वासात घ्यायची भाषा केली, मात्र ऐनवेळी दगा दिला. हे चुकीचे असून भविष्यात येणाऱ्या निवडणुका वर त्याचा निश्चित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रकाश हैबतपुरे यांनी सांगितले. या बैठकीचे संचालन व्यंकटराव साबणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक सेना तालुकाप्रमुख तातेराव मुंडे यांनी केले.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना कैलास पाटील यांनी सांगितले की, शिवसेना ही श्रेष्ठींचा आदेश मानणारी संघटना असून “गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक” या अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेने विधानसभा मतदारसंघात आपली मोठी ताकद निर्माण केली आहे. असे असताना देखील शिवसेनेला डावलले जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. नाईलाज म्हणून येणाऱ्या निवडणुकात सावधगिरीने राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला.