संभाव्य उष्णतेच्या लाटेबाबत लातूर जिल्हा प्रशासन सतर्क

संभाव्य उष्णतेच्या लाटेबाबत लातूर जिल्हा प्रशासन सतर्क

लातूर (एल.पी.उगीले) : हवामान विभागाच्या अंदाजानुसार लातूर जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट असू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच आवश्यकता नसल्यास दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात जाणे टाळावे. अंग मेहनतीचे कामे करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा, विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उष्माघात विरोधी औषधांसह सर्व सज्जता ठेवावी. याबाबत जिल्हा प्रशासन वेळोवेळी आढावा घेणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

संभाव्य उष्णतेच्या लाटेबाबत विविध शासकीय विभागणी करावयाची कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

उष्ण लाट कशाला म्हणावे?
तापमानाच्या निकषानुसार सलग दोन दिवस डोंगरी भागात 30 डिग्री सेल्सियस आणि समतल भागात 40 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची नोंद होणे किंवा या भागात सलग दोन दिवस हंगामातीला सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे. यापैकी कोणतीही एक नोंद आढळल्यास या भागात उष्णतेची लाट आहे हे समजून होणारे परिणाम टाळण्यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तर जिल्हा शल्यचिकित्सक विभागाने जिल्ह्यातील रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे ओआरएस पासून ते आईस पॅकपर्यंत सर्व सुविधा ठेवाव्यात. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सर्व सुविधासह दोन वार्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. उष्माघाताने कोणीही दगावणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावापर्यंतच्या आशा कर्मचाऱ्यांपर्यंत प्रशिक्षण द्यावे. ग्रामपंचायत, अंगणवाडी इतर महत्वाच्या ठिकाणी उष्णतेच्या लाटेत घ्यावयाची काळजी याबाबत दर्शनी भागात भिंतीपत्रके लावावीत, माहितीसाठी पॅम्प्लेट लोकांपर्यंत पोहचवावे. पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील जनावरांची या काळात काय काळजी घ्यावी, याविषयी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण द्यावे.

उष्णतेच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभागाने लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा, पाण्याचे स्रोत यांचे नियोजन करावे. कोणत्या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो, याचे परिपूर्ण नियोजन करावे. आवश्यक तिथे पाण्याच्या टँकरचा पुरवठा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिल्या.

वन्यजीवांची या काळात पाण्यासाठी वणवण होऊ नये, यासाठी पाणवठ्यावर वेळोवेळी पाणी भरले जाईल, याची दक्षता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिल्या.

About The Author