देशमुखांनी तात्यांना आयुष्यातून उठवले हे विसरलात का? – प्रदीप पाटील खंडापूरकर

देशमुखांनी तात्यांना आयुष्यातून उठवले हे विसरलात का? - प्रदीप पाटील खंडापूरकर

लातूर (एल.पी.उगीले) : स्वर्गीय बब्रुवानजी काळे तात्यांनी आयुष्यभर गोरगरीब सर्वसामान्यासाठी, शेतकऱ्यांसाठी काम केले. मांजरा कारखान्याची उभारणी करून नावारूपाला आणले.स्व. विलासरावांच्या खांद्याला खांदा लावून काम केले, याच तात्यांना देशमुख यांनी आयुष्यातून उठविले, आणि त्यांचे कार्यकर्ते संपविले. हे कोणीही विसरू शकत नाही. कारखान्याची नामधारी खुर्ची मिळाल्याने हा इतिहास विसरलात का? असा सवाल रवींद्र काळे यांना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी मतदारांच्या मेळाव्यात काँग्रेसच्या कारभाराचे वस्त्रहरण केले, त्यांनी जे काही सत्य बोलून दाखवले हे देशमुखांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सहन झाले नाही. सत्ताधारी काँग्रेस पॅनलचा पराभव निश्चितच होणार असल्याने विकास कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे यांनी कसलाही आधार नसलेले आणि बिनबुडाचे आरोप एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले, अशा कितीही खोट्या बातम्या पसरलेल्या तरीही मतदार मनमानी कारभाराचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. असेही प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी अनेक शेतकऱ्याची अडवणूक केली, काबाड कष्ट करून मेहनत करून वाढवलेल्या उसाला शासनाच्या नियमा नुसार एफआरपीप्रमाणे भाव मिळावा याकरिता आ. रमेशआप्पा कराड यांना मांजराच्या दारात आंदोलन करावे लागले. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडले नाही, त्यानुसार आंदोलन केल्यानेच मांजरा परिवाराला उसाचा एफआरपीप्रमाणे भाव द्यावा लागला. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. एवढेच नव्हे तर जाणीवपूर्वक देशमुख यांच्या खाजगी कारखान्याचे गाळप अधिक व्हावे यासाठी सहकारी साखर कारखाने बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले हे खोटे आहे का? असा सवाल ही खंडापूरकर यांनी केला.

बाजार समितीच्या निवडणुकीत देशमुखशाही नष्ट होणार आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे शेतकरी विकास पॅनल विजय होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. याची जाणीव देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाल्याने मतदारात आणि शेतकऱ्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी गोरगरिबासाठी संघर्ष करणाऱ्या आ. रमेशआप्पा कराड यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून वातावरण दूषित करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या पॅनलला पराभव पत्करावाच लागेल. पराभवाच्या भीतीने कोणाचे मानसिक संतुलन बिघडले याचे रवींद्र काळे यांनी आत्मपरीक्षण करावे. आणि मगच इतरांवर आरोप करावेत. असे सांगून जागरूक मतदारांनो जागे व्हा, हुकूमशाही, एकाधिकारशाही नष्ट करण्यासाठी आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना आशीर्वाद देऊन बहुमताने विजयी करा. असेही भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

About The Author