संभाजीभैय्या निलंगेकर यांनी भाजपाची शान राखली – भगवानदादा तळेगावकर
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ असलेले संभाजीभैय्या पाटील निलंगेकर आणि त्यांचे बंधू भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरविंदभैया पाटील निलंगेकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकतीने काम करून, एक आदर्श निर्माण केला आहे. पक्षातील इतर नेत्यांनीही त्यांचा आदर्श घ्यावा. असे कार्य त्यांच्या हातून झाले आहे. असे उद्गार सहकार महर्षी भगवानदादा पाटील तळेगावकर यांनी काढले.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निलंगा, औराद शहाजानी आणि देवणी या तीनही कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकवून, संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांनी निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला आहे. असेही त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीचे नेते माजी पालकमंत्री आ. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांनी निलंगा, शहाजानी औराद, व देवणी या तिन्ही ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते, डीसीसी बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर संचालक भगवानदादा पाटील तळेगावकर, भाजप नेते जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल भैया केंद्रे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. पंडित सूर्यवंशी , प्रदेश प्रवक्ते शिवनंद हैबतपुर, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार नळंदवार, जिल्हा सरचिटणीस मनोर भंडे, संजय पाटील मलकापूरकर, अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे, देवणी संचालक दिलीपजी मजगे , भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय मामा पाटील, सुधाकर बिरादार, लक्ष्मण जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भगवानदादा पाटील तळेगावकर यांनी स्पष्ट केले की कित्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांचे दुर्लक्ष झाल्याने अनेक उमेदवार फार थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि सहकार्य झाले असते तर, भारतीय जनता पक्षाच्या जागा आणखी वाढल्या असत्या, उत्कृष्ट वातावरण निर्माण झाले होते, मात्र काही ठिकाणी आपसातील मतभेदामुळेच भारतीय जनता पक्षाच्या अनेक उमेदवारांना पराभूत व्हावे लागले. हे दुर्दैव आहे, असेही सांगितले.