उदगीर ग्रामीण पोलीस अवैध धंद्याला पाठबळ देण्यात मशगुल, गावोगावी कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे!!
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असून अनेकांच्या संदर्भात तक्रारी करून देखील पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची ओरड सर्वसामान्य नागरिक करत आहेत. अवैध दारू, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू तसेच मटका, जुगार मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चालू आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीला काही काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने अवैद्य धंद्यावर धाडी टाकण्याचे सत्र सुरू केले होते. मात्र आता त्या धाडीचे प्रमाण कमी झाल्याने स्थानिक पोलिसांची हिम्मत वाढली आहे. त्यामुळे अवैध धंदेवाले चक्क पोलिसांच्या सोबत फिरताना दिसून येऊ लागले आहेत. पोलिसांचे आपल्याला सहकार्य असेपर्यंत आपले कोणीही काही वाकडे करू शकत नाही. असा विश्वास अवैध धंदेवाल्यांना असल्याने ते आपले धंदे बिनधास्तपणे चालू ठेवत आहेत.
एका अर्थाने सर्वसामान्य माणसाला लुबाडत आहेत. पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावातून आपापसात दंगली आणि हाणामारीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. या बाबीकडे पोलीस फारशा गांभीर्याने पाहत नसल्याने पोलिसांचा वचक संपल्याची भाषा बोलली जात आहे.
उदगीर तालुक्यातील नेत्रागाव येथे जनावरे रस्त्याने नेण्याच्या व रस्त्यावरील बांधलेल्या म्हशीला बाजूला घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. या दोन्ही गटाकडून गैर कायद्याची मंडळी जमऊन मारहाण केल्या प्रकरणी परस्पर विरोधामध्ये तक्रारी देऊन 17 जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलीस सूत्राकडूनच हाती आलेली माहिती अशी की, फिर्यादी रजाक उस्मान अली पटेल यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद केले आहे की, आरोपी हुसेन शरीफ शेख, नयुम महबूब शेख, अमीर महबूब शेख, सलमान खयुम शेख, सोहेल लतीफ पटेल, चांद लतीफ पटेल, वाजिद इसाक लष्करे, कयूम महबूब साब शेख यांनी संगणमत करून गैर कायद्याची मंडळी जमवून जनावरे रोडवरून नेण्याच्या कारणावरून फिर्यादीच्या मुलास शिवीगाळ करून फिर्यादीस काठीने डाव्या पायावर मारून दुखापत केली. आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली, काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे दिल्यावरून आरोपींच्या विरुद्ध गु. र. न. 327 /23 कलम 143, 147, 148, 149, 336, 324, 323, 504, 506 भारतीय दंड विधान संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करत आहेत.
तर फिर्यादी खय्युम महबूब साब शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादीची पत्नी व फिर्यादी हे दोघे दुचाकीवरून शेताकडे जात असताना, आरोपीच्या घरासमोर रस्त्यावर बांधलेली म्हैस आरोपी रजाक उस्मान पटेल यांना बाजूला घ्या असे म्हणाले असता आरोपींनी संगणमत करून, गैर कायद्याची मंडळी जमऊन तुमचे लय दिवसापासून बघत आलो आहे. असे म्हणून आरोपी रजाक उस्मान पटेल, समीर रजाक पटेल, वजीर रजाक पटेल, नजीर रजाक पटेल, इसुब उस्मान पटेल, नाझीम युसुब पटेल, बिलाल युसुफ पटेल, तयबा जमीर पटेल, फरहाणा नजीर पटेल यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीस खाली पाडून शिवीगाळ करून लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोळ्यात मिरचीची पूड टाकून फिर्यादीचे पत्नीला केसाला धरून लाथा बुक्क्याने मारहाण केली. काठीने ,कुराडीने, लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात डाव्या कानावर व तोंडावर मारून तीन दात पाडून दुखापत केली आहे. फिर्यादीच्या पत्नीला हातावर मारून दुखापत केली आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा भाचा व भाऊ यांना लोखंडी रोडने, लाथा बुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा आशयाच्या एमएलसी जबाबवरून नऊ आरोपीच्या विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गु.र.न. 328/ 23 कलम 143, 147, 148, 149, 325, 324, 323, 504, 506 भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.