नागरी सुविधा पुरवणे ग्रामपंचायतिचे आद्य कर्तव्य – गुरुनाथ अण्णा बिरादार
उदगीर (एल.पी.उगीले) नागरिकांच्या मूलभूत सुविधा ग्रामपंचायतीने पूर्ण केल्या पाहिजेत, त्याचसाठी ग्रामपंचायत असते. मात्र कित्येक वेळा याचे भान लोकांना नसते. वेगवेगळ्या मार्गांनी विकासाचा निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो, त्या माध्यमातून विकास करून नागरिकांच्या समस्या सोडवता येऊ शकतात. त्यासाठी महत्वकांक्षा आणि काम करण्याची जिद्द असणे गरजेचे आहे, असे विचार मलकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच गुरुनाथ अण्णा बिरादार यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
अल्पावधीतच ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आपण करत असून त्यासाठी ग्रामपंचायतीच्या स्वनिधी मधून नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे सांगतानाच त्यांनी आपण केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी ही प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. यामध्ये क्रांतीनगर भागात रस्त्याचा मोठा गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता, जवळपास 85 ब्रास इतका अत्यंत दर्जेदार असा सिमेंट काँक्रेट चा रस्ता संजय इंद्राळे यांच्या घरापासून पुढील मेटल रोड पर्यंत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बनवण्यात आला आहे. तसेच ग्रामनिधी अंतर्गत शशिकांत घोगरे यांचे घर ते शिवाजी सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत सहाशे फुटाचा मेटल रोड बनवण्यात आला आहे. इतकेच नाही तर गावात येण्यासाठीचा विश्रामगृहापासूनचा रस्ता अत्यंत लहान होता, त्या रस्त्यावरून एक गाडी देखील व्यवस्थित जाऊ शकत नव्हती. तो रस्ता 42 फुटाचा बनवण्यात आला आहे. जवळपास सातशे फूट लांबीचा हा रस्ता पूर्ण झाला असून गावातील लोकांची खूप मोठी सोय या रस्त्यामुळे झाली आहे. तसेच गावापासून थोड्याच अंतरावर स्मशानभूमी आहे. मात्र स्मशानभूमीला जाण्यासाठी नाल्यातून जावे लागत होते. पावसाळ्यामध्ये पाऊस झाल्यास आणि गावात एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास गुडघ्या पेक्षा जास्त पाण्यातून मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जावा लागत होता. गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकांची या नाल्यावर पूल बांधण्याची मागणी होती, मात्र ती पूर्ण होत नव्हती. एस आर एफ अंतर्गत गेल्या तीन वर्षापासून या कामासाठी बजेट येत होते, मात्र या कामांमध्ये आर्थिक फायदा नसल्याने या गोष्टीकडे गांभीर्याने कोणी पाहत नव्हते. मात्र आपल्या कार्यकाळात नागरिकांना दिलेला शब्द आपण पाळला पाहिजे. ही जाणीव ठेवून आपण पुलाचे काम देखील पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरील पूल आणि शंभर मीटरचा रस्ता बनवण्यात आल्यामुळे नागरिकांची सुविधा होणार आहे. या ठिकाणी पक्के काम करणे खूप कठीण होते, कारण खाली काळी माती असल्याने या रोडसाठी कोणीही पुढे येत नव्हते. मात्र आपण आर्थिक बाबींचा विचार न करता शासनाकडून निधी येईल तेव्हा येईल तोपर्यंत स्वखर्चातून या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बोडके हेही उपस्थित होते.
काम मंजूर करून घेऊन शासनाकडून निधी येण्या अगोदरच स्वखर्चाने ते काम पूर्ण करणारा असा अवलिया सरपंच मलकापूरकरांना मिळाल्यामुळे ग्रामपंचायतिच्या कामकाजाबद्दल जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. उदगीर शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर या गावात मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या ही भरपूर आहेत. नव्याने सर्व उभारणी या भागात करावी लागणार आहे, असे असतानाही नागरी सुविधांना प्राधान्यक्रम देऊन रस्ते, नाली, वीज, पाणी या गोष्टी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात असल्याची ही माहिती याप्रसंगी सरपंच गुरुनाथ अण्णा बिरादार यांनी दिली.
मलकापूर ग्रामपंचायत हद्दीतील क्रांतीनगर, शिवनगर, एसटी कॉलनी, समर्थ नगर, उदयनगर, पांचाळ कॉलनी, बनशेळकी रोड चा भाग हा नवीन वसाहतीचा असल्यामुळे रस्ते, नाल्या, पाणी या मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्याचे भान ठेवून गावाच्या विकासाचा आराखडा बनवला जात असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. ग्राम विस्तार अधिकारी संतोष पाटील, कार्यालयीन कर्मचारी शिवराज ब्रह्मणा हेही या प्रसंगी उपस्थित होते.