वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च टाळून समाज कार्य करावे – श्रद्धा जगताप
उदगीर (एल पी उगिले) सध्या राजकीय व्यक्तिमत्त्वांत वाढदिवसाचे औचित्य साधून मोठमोठे कार्यक्रम आणि पैशाची उधळपट्टी करण्याची फॅशन सुरू झाली आहे. मात्र तेच पैसे जर समाजातील गरजू आणि सर्वसामान्य माणसांच्या उपयोगासाठी आणता आले तर ते लाख मोलाचे आहे. असे विचार सामाजिक कार्यकर्त्या तथा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस श्रद्धा जगताप यांनी व्यक्त केले. त्या उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर येथे ग्रामपंचायत सदस्य सौ शिवकर्णा अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक भागवत हे होते, तर या कार्यक्रमासाठी निमंत्रित म्हणून अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा हाके (पाटील), सोमनाथपूर येथील सरपंच अंबिका ज्ञानेश्वर पवार, ग्रामसेवक अवकाश पवार, माजी सरपंच राम सूर्यवंशी पाटील यांच्यासह ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना श्रद्धा जगताप यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, हे समाजसेवक म्हणून पुढे येणाऱ्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपला अनावश्यक खर्च टाळून समाज उपयोगी कार्यक्रमासाठी खर्च करावा. असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
रेखा हाके पाटील यांनी याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिवकर्णा अंधारे यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक करून इतर महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा, आपल्या सामाजिक कार्यातून आपली ओळख निर्माण करावी, आपले कार्यच समाजामध्ये आपला आदर्श निर्माण करत असते, असे सांगितले. अध्यक्षीय समारोप उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक भागवत यांनी केला. या कार्यक्रमात दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सोमनाथपूर येथील अंगणवाडीच्या लहान बालकांना गणवेश वाटपही करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच राम सूर्यवंशी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. शिवकर्णा अंधारे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सोमनाथपुर व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.