वाढवणा पोलिसांची अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैद्य धंदे बोकाळत आहेत. अशी ओरड सर्वसामान्य नागरिकांतून आणि काही प्रसिद्धी माध्यमातून सुरू असतानाच, वाढवणा पोलिसांनी अवैध जुगार, अवैध दारू विक्री याच्याविरुद्ध मोहीम काढून असे गुन्हे करणाऱ्यावर रीतसर कारवाई केली आहे. या संदर्भात हाती आलेली माहिती अशी की, वायगाव पाटी येथे अहमदपूर कडे जाणाऱ्या रोडवर अनिल महाराजांच्या हॉटेलच्या समोर बळीराम बापूराव कॅनलवाड हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मिलन डे नावाचा जुगार बेकायदेशीररित्या आकड्यावर पैसे लावून खेळत व खेळवीत असताना, वाढवणा पोलिसांनी धाड टाकून जुगाराचे साहित्य व नगदी रोख रक्कम असे एकूण 25 हजार एकशे वीस रुपये जप्त केले आहेत. यामध्ये रोख रक्कम नऊ हजार एकशे वीस तर 16 हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव सारोळे हे करत आहेत.
तसेच दुसऱ्या एका प्रकरणात अहमदपूरहून वायगाव कडे जाणाऱ्या रोडवर तुकाराम भंडारपे यांच्या हॉटेलच्या बाजूस मिलन डे नावाचा मटका खेळला व खेळविला जात असताना पोलिसांनी धाड टाकून नगदी रोखरक्कम बारा हजार 700 व वापरात असलेला मोबाईल अंदाजे किंमत पाच हजार रुपये असा एकूण 17 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी तानाजी नागोराव बत्तलवाड, केदारनाथ रामेश्वर एसमोड, बळीराम बापूराव कॅनॉलवाड या तीन आरोपींच्या विरुद्ध वाढवणा पोलीस स्टेशन येथे पोलीस नायक मनमोहन माधवराव केंद्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा ही तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सारोळे हे करत आहेत.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विक्री वाढली आहे, सर्वसामान्य गोरगरिबांचे संसार उध्वस्त करणाऱ्या या विषारी दारूच्या विरोधात अनेक ठिकाणी महिलांनी आंदोलन करून पोलिसांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. उदगीर ग्रामीणच्या हद्दीत अनेक आंदोलने झाली, मात्र उदगीर ग्रामीण पोलिसांना याचे काही देणे घेणे नाही. यासंदर्भात ही वरिष्ठांना अर्ज फाटे करण्यात आले आहेत. वाढवना पोलीस स्टेशन हद्दीतही अशा पद्धतीची अवैध दारू विक्री होत असल्याची जाणीव होताच, लगेच शेळगाव पाटीजवळ वाढवणा पोलिसांनी धाड टाकून आरोपी सोनाली आप्पाराव घुगे यांच्याकडून देशी दारू भिंगरी संत्रा असे कंपनीचे लेवल असलेल्या काचेच्या 180 एम एल च्या सीलबंद दहा बॉटल प्रति बॉटल 70 रुपये या दराने एकूण सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव सारोळे हे अधिक तपास करत आहेत.