पोलीस फ्लॅश न्यूज चा दणका !! उदगीरची सिग्नल यंत्रणा पूर्ववत सुरू !!!
एल.पी. उगिले
उदगीर:- उदगीर शहराची वाहतूक सुरळीत व्हावी, या उद्देशाने प्रसिद्धी माध्यमांनी सतत सिग्नल सुरू करण्याची मागणी केल्यानंतर पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन, नगरपालिकेकडे यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर, पूर्ववत सिग्नल यंत्रणा सुरू झाली आहे. उदगीर शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे परवाच दोन तरुणांना जीव गमवावा लागला होता. तसेच रस्त्याच्या कडेला, काही ठिकाणी रस्त्यावरच हातगाडीवाले, भाजीपाला विकणारे, फुटपाथवर बसून व्यवसाय करणारे तसेच अनेक दुकानदारांनी आपले साहित्य मुख्य रस्त्यावर टाकल्याने रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे सतत दुर्लक्ष होत असल्या संदर्भात ओरड होत होती. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत नगरपालिकेकडे सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर शेवटी नगरपालिकेने सहकार्याचा हात पुढे केल्यामुळे सिग्नल यंत्रणा पूर्वत सुरू झाली आहे. असे असले तरीही पोलीस प्रशासनाच्या समोर वाहतूक नियंत्रण करणे आणि बेशिस्त झालेल्या वाहतुकीला शिस्त लावणे या दोन गोष्टी आव्हानात्मक आहेत.
वाहतूक शाखेकडे स्वतंत्र पोलीस मनुष्य बळ नसल्यामुळे उपलब्ध यंत्रणे कडून ही सर्व कामे करून घ्यावी लागत आहेत. असे असले तरीही जी यंत्रणा आहे, ती प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. तब्बल आठ नऊ महिन्यानंतर सिग्नल यंत्रणा सुरू झाली असल्यामुळे वाहतुकीला शिस्त लावणे, ऑटो रिक्षाचे थांबे निश्चित करणे, शिवाय रस्त्यावर अतिक्रमण करणारे हातगाडीवाले, भाजीपाला विक्रेते आणि काही ठिकाणी वर्षानुवर्ष कायम थांबून असलेले व्यापारी यांना कशी शिस्त लावणार? यासंदर्भातही पोलिसांना विचार करावा लागणार आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्याच्या संदर्भात पोलीस फ्लॅश न्यूज वृत्तपत्राने यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर सिग्नल पूर्ववत सुरू करण्याच्या कामाच्या हालचालींना वेग आला होता, आता सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यामुळे निश्चितपणे पोलिसांवरील ताण कमी होईल, आणि उपलब्ध पोलीस बळाच्या आधारावर वाहतुकीला शिस्त लावता येईल. अशी अपेक्षा उदगीरकर व्यक्त करत आहेत.
14 जून रोजी बैठक…..
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आ.संजय बनसोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि वाहतुकीशी संबंधित सर्व विभागाचे संबंधित अधिकारी यांची बैठक शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात 14 जून रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतून वाहतुकीचे प्रश्न निकाली काढण्याच्या संदर्भात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाचा आहे. मात्र यापूर्वीही उदगीरचे आ. संजय बनसोडे हे मंत्री असताना अशीच बैठक झाली होती. त्यावेळेस ही अनेक सूचना दिल्या होत्या. मात्र बैठक संपल्यानंतर त्या सर्व सूचना बासनात गुंडाळून ठेवल्या गेल्या. तशाच पद्धतीने पुन्हा केवळ चर्चेचे गुऱ्हाळ या बैठकीत होऊ नये. निश्चित काहीतरी उपाययोजना केली जावी. असे अपेक्षा उदगीरच्या जनतेतून होत आहे. नेहमीप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांची बैठक म्हटली की, विषय सोडून होणारी चर्चा जास्त असते. त्यामुळे प्रामुख्याने अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उठवला जातो, पोलीस प्रशासन या कामी अपयशी ठरल्याची चर्चा केली जाते. मात्र त्यावर उपाययोजना काहीही होत नाही. यामुळे जनतेलाही अशा बैठकी बद्दल फारशी उत्सुकता राहिली नाही, तसेच अशा बैठकीतून काही फलित होईल, असेही वाटत नाही. तरीही संबंधितांनी या बैठकीसाठी उदगीरकरांनी सहभागी होऊन सूचना कराव्यात, अशा अपेक्षा व्यक्त केली आहे.