प्रत्येक भारतीय स्त्रीने माँसाहेब जिजाऊंचा आदर्श घ्यावा – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर ( गोविंद काळे)
आदर्श मातृत्वाचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे माँसाहेब जिजाऊ होत. माँ साहेबांनी शिवबांना रामायण,महाभारतातील शौर्याच्या आणि धाडसाच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर त्यांना जाज्वल्य नैतिकतेची कृतीतून शिकवण दिली. आईने मुलाला कसे घडवावे, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे माँसाहेब जिजाऊ. माँ साहेबांचा हा आदर्श प्रत्येक भारतीय स्त्रीने घ्यावा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांना त्यांच्या ३४९ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी स्वराज्याचे केवळ स्वप्न पाहिले; एवढेच नव्हे तर त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी त्यांनी शिवबांना घडविले. जिजाऊंना लखुजीराव जाधव यांच्याकडून शौर्याचा वारसा लाभला होता. त्यांनी स्वतः हातात तलवार घेऊन शिवबांना लढण्याचे प्रशिक्षण दिले. शत्रु बरोबर शक्ती आणि युक्तीने कसे लढावे हेही त्यांनी शिकवले. म्हणूनच शिवबांसारखा जाणता राजा आपल्याला मिळाला, असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले.यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अभिजीत मोरे, डॉ. संतोष पाटील, डॉ. मारोती कसाब, शिवाजी चोपडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी , कर्मचारी उपस्थित होते.