जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही!! लाचखोर कर्मचाऱ्यांना रेजितवाड सोडत नाही!!!
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला पोलीस उपाधीक्षक म्हणून पंडित रेजितवाड आल्यापासून धडाकेबाज कामगिरीला सुरुवात झाली आहे. “लाचखोरांचा कर्दनकाळ” म्हणून हा अधिकारी विभागात नावलौकिक कमावतो आहे. कोणत्याही विभागाची तमा न बाळगता, बेधडक कारवाई करून लाचखोर प्रवृत्तीला आळा घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे, असे असले तरीही लाचखोर प्रवृत्ती म्हणजे कुत्र्याचे शेपूट असल्यासारखी अवस्था असल्याचे बोलले जात आहे.
परवाच प्रसिद्धी माध्यमांनी लातूर पंचायत समिती अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या विविध लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यांना देताना, लाच घेणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लिखाण केले होते. पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वत्र हा प्रकार होताना चर्चिला जात आहे.
चाकुर तालुक्यातील एका शेतकऱ्याला एमजीनरेगा योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरीचा प्रस्ताव पंचायत समिती चाकूर येथे दाखल केल्याचा मोबदला, तसेच यापुढे सिंचन विहीर मंजूर होण्यासाठीच्या कामात मदत करण्यासाठी म्हणून ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांनी पंचासमक्ष तीन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले आहे.
गंमत म्हणजे याच ग्रामसेवकाला दिनांक 31 मार्च 2020 रोजी हळी तालुका उदगीर येथे आणखी दोन साथीदारासह तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्याप्रकरणी वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हाळी येथील प्रकरणामध्ये आरोपी ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांच्यासोबत इतर दोन आरोपींचाही समावेश होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झालेला असताना देखील पुन्हा बिनधास्तपणे लाचखोर प्रवृत्तीकडे वळलेल्या ग्रामसेवक परशुराम गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा जाळ्यात अडकवले आहे. या संदर्भात हाती आलेली माहिती अशी की, तक्रारदार शेतकऱ्याला लोकसेवक आरोपी परशुराम पंढरी गायकवाड (वय पन्नास वर्ष, नेमणूक पंचायत समिती चाकूर अंतर्गत ग्रामपंचायत बोथी सध्या राहणार शाहूनगर, थोडगा रोड, अहमदपूर) यांनी एमजीनरेगा योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच द्यायची नसल्यामुळे आणि लातूर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर विश्वास निर्माण झालेला असल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. या प्राप्त तक्रारीनुसार लाच लुचपत विभागाने लाचेच्या मागणीच्या रकमेच्या संदर्भात शहानिशा करून 20 जून 2023 रोजी सापळा रचला.
आरोपी लोकसेवक ग्रामसेवक परशुराम पंढरी गायकवाड यांनी लाचेची मागणी केलेली रक्कम तीन हजार रुपये चाकूर बस स्टॅन्ड येथील कॅन्टीनमध्ये पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. थोड्याच वेळात लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकून लाचेच्या रकमेसह जागीच रंगेहात पकडले. या प्रकरणी चाकूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सापळा रचणारे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अन्वर मुजावर यांनी व त्यांच्या टीमने रंगेहात पकडून कारवाई केली आहे.
ग्रामसेवक गायकवाड यांच्यावर लाचलुचपत विभागाची ही दुसऱ्यांदा कारवाई असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती अंतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील कोणत्याही विभागात शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती, दलाल, एजंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासकीय शुल्का व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याशी संपर्क करावा. (दूरध्वनी क्रमांक 02382-242674 तसेच टोल फ्री क्रमांक 1064) असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी केले आहे.