कॉफी शॉप व हॉटेलवाल्यांना नवीन नियमावलीची अधिसूचना जारी
लातूर (एल.पी.उगीले) : कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे कॉपी शॉप व हॉटेल वाल्यांसाठी नवीन नियमावली प्रस्तावित करून पाठवली होती जेणेकरून अशा ठिकाणावरून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होईल, बाबीचे गांभीर्य विचारात घेऊन महसूल प्रशासनाने ही नियमावली मान्य केली आहे. आणि नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील कॉफीशॉप व हॉटेल बद्दल लातूर पोलिसाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून त्या अनुषंगाने लातूर पोलिसांनी वेळोवेळी सदर कॉफी कॅफे, हॉटेलवर कार्यवाही करण्यात येत आहे.
सदर आस्थापना चालकावर प्रभावी निर्बंध नसल्याने, कॉफीकॅफे व हॉटेल मध्ये गैरकृत्यांना चालना मिळेल अशा प्रकारची बैठक व्यवस्थेत व इतर बाबीत बदल करून महाविद्यालयीन युवक-युवतींना बसण्यास मुभा दिली जाते. त्यामुळे कॉफीशॉप व हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले-मुली यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नमूद व्यवसाय चालक हे त्यांना बसण्याकरिता म्हणून कालावधीनुसार शुल्क आकारून गैर्यकर्त्यास चालना देत आहेत. सदर कॉफीशॉप, हॉटेलमध्ये युवक व युवती तसेच अल्पवयीन मुले-मुली हे तासनतास बसून अश्लील वर्तन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर ठिकाणी बालकांच्या बाबतीत लैंगिक चाळे देखील होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. आहेत. कॉफी, कॅफे शॉप व हॉटेल चालकांवर पुरेसे निर्बंध नसल्याने भारतीय दंड विधान संहिता कलम 376, 363, 354, 509 तसेच बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे घडत असून प्रसंगी गंभीर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लातूर शहर व जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत प्रसिद्ध व महत्त्वाचा असून लातूर शैक्षणिक पॅटर्नमुळे संपूर्ण महाराष्ट्र व बाहेर राज्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी जिल्ह्यात येतात, शिक्षणासाठी येणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कॉफी शॉप, कॅफे,हॉटेल यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता लातूर जिल्ह्यातील कॉफी कॅफे शॉप, हॉटेल यांच्यावर निर्बंधाबाबतीत नियमावलीची अधिसूचना जारी होणे बाबतचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय,लातूर यांच्याकडे पाठविला होता.त्यावरून जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर यांनी कॉफी कॅफे शॉप, हॉटेल बाबत नियमावलीची अधिसूचना जारी केली असून त्यामध्ये आता लातूर जिल्ह्यातील कॉफी कॅफे शॉप, हॉटेल यांना पुढील प्रमाणे नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
कॉफी कॅफे (कॉफी शॉप), हॉटेल मधील पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत असणे बंधनकारक आहे. कॉफी कॅफे (कॉफी शॉप) व हॉटेलमधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत, दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांचे सहज दृष्टीस पडतील असे असावेत. कॉफीशॉप, हॉटेलमधील बैठक व्यवस्था सर्व ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना असावी. कॉफीशॉप, हॉटेलमध्ये अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट करण्यात येऊ नये. कॉफीशॉप, हॉटेलमध्ये सक्षम प्राधिकार्यासाठी भेट पुस्तिका (व्हिजीट बुक) ठेवावे. कॉफीशॉप हॉटेलमध्ये डेक, डॉल्बी, व इतर ध्वनीक्षेपण व्यवस्था प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणारी नसावी. कॉफीशॉप, हॉटेलमध्ये धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. कॉफीशॉप, हॉटेल शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच चालू राहतील याची काटेकोरपणे काळजी घ्यावी.
या प्रकारचे नियम जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांचे कडून देण्यात आले असून याची कठोर अमलबजावणी लातूर पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
सदर व्यवसायिकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.