शेतकरी नेते सचिन दाने यांच्या आंदोलनाचा दणका; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा वाटप सुरू
लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात २०२२ सालच्या खरीप हंगामातील पीक विमा मिळण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना विमा मिळावा,यासाठी शेतकरी नेते, शिवसेना मा. उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वातील आंदोलनास यश आले असून शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे,अशी माहिती सचिन दाने यांनी दिली.
शेतकरी क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून दाने यांनी मागील ८ महिन्यांपासून पीकविम्यासाठी आंदोलन सुरू ठेवले होते.विविध लोकशाही मार्गांनी ते लढा देत होते.त्याला यश आले. दि.५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पीकविम्या संदर्भात बैठक होऊन १५ जून पासून विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे मान्य करण्यात आले होते. प्रत्यक्षात विमा वाटप सुरू झाल्यानंतर त्यातही अनेक त्रुटी असल्याचे लक्षात आले.सचिन दाने यांनी मुंबई येथे ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात राज्याच्या विमा अधिकाऱ्यांची दिनांक १६ जून रोजी भेट घेऊन या त्रुटी दूर करण्याची विनंती केली. त्यानुसार रखडलेले विमा वाटप सुरू झाले.
शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत.विमा वितरित करण्यात तफावत व अनियमितता असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रश्नासंदर्भात एकजूट दाखवली.शेतकरी क्रांती आंदोलनाने तीव्र आंदोलने करतानाच वेळोवेळी पाठपुरावा केला.त्यामुळेच हे यश प्राप्त झाल्याचे सचिन दाने यांनी सांगितले.अद्यापही अनेक शेतकरी विम्यापासून वंचित आहेत.काही शेतकऱ्यांची विमा रक्कम १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.ती तफावतीची रक्कम राज्य शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे.असे जवळपास १२ हजार शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित आहेत.या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पत्र पाठवली आहेत.लवकरच प्रत्यक्षात भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी आपण करणार आहोत.
पीकविमा मिळण्यासंदर्भात लातूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पावणेचार लाख शेतकऱ्यांना जवळपास २७५ कोटी रुपये विमा मंजूर झाला आहे.दि.२२ जून नंतर वंचित शेतकऱ्यांची यादी मागवली जाणार असून या शेतकऱ्यांनाही विमा मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.येणाऱ्या खरीप पहंगामात विमा धोरण पारदर्शकपणे राबवावे यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून शेतकऱ्यांना ही प्रक्रिया सोपी करून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.पीक विम्यापासून वंचित असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उभारलेल्या या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी, कामगार यांच्यासह ग्रामपंचायती,विविध सहकारी सोसायट्या, राजकीय पक्ष,विविध पक्षाचे आमदार, खासदार, विविध सामाजिक संघटना तसेच युवक व महिलांनी सहभाग घेतला.तसेच लातूर जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा विमा प्रतिनिधी, राज्याचे कृषी आयुक्त,AIC व्यवस्थापक मुंबई यांचे देखील सचिन दाने यांनी आभार मानले.
पेरणीपूर्वी विमा मिळणार असल्याने शेतकरी आनंदात आहेत.आगामी काळात विविध प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन मजबूत केले जाणार असून त्यासंदर्भात आपण लवकरच लातूर जिल्ह्यातील गावात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचेही सचिन दाने यांनी सांगितले.