जनसंघाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि त्यागाची शिकवण डॉ .शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिली – माजी आ. भालेराव
उदगीर (एल.पी.उगीले) : आज देशाला सामर्थ्यशाली आणि त्यागाची मूर्ती असलेले पंतप्रधान लाभले आहेत. विकासाची जाण असलेले आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जडणघडण भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या वैचारिक अधिष्ठानातून निर्माण झाली. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951 साली भारतीय जनसंघाची स्थापना करून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशांतर्गत अनेक गोष्टी ज्या राष्ट्रहिताला बाधक होत्या, त्या थांबल्या पाहिजेत. या विचाराने त्यांनी हिंदुत्वाचा विचार करून हिंदू महासभेचे अध्यक्षपदी भूषवले. त्यानंतर मात्र संपूर्ण देशामध्ये हिंदुत्ववादी प्रखर विचारधारा जर रुजवायची असेल तर जनसंघाचे काम वाढवले पाहिजे. हा विचार समोर ठेवून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काम केले. असे विचार भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमाती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगरसेवक साईनाथ चिमेगाव, आनंद बुंदे,अमोल अनकल्ले , जया काबरा,शामला कारामुंगे, राजकुमार देशमुख, सुनील सावळे, बापूराव येलमटे इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार भालेराव यांनी स्पष्ट केले की, देशातील सर्व नागरिकांसाठी एकच संविधान, एकच निशान आणि कश्मीरचे भारतात विलीनीकरण व्हावे. व या देशाचे अखंडत्व अबाधित राहावे. यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपले आयुष्य वेचले. आज त्यांची स्वप्नपूर्तीची घडी आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात नऊ वर्ष उत्कृष्ट कार्य झाले. याच काळात जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे 370 कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रद्द केले. तसेच अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी क्रांती आणि परिवर्तनाची नांदी सांगितली होती. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आणि राज्यात राष्ट्रभक्तीची बीजे पेरताना दिसत आहे. अशा कर्तबगार सरकारच्या पाठीमागे जनतेने उभारावे. असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले.