लातूर ग्रामीण मतदार संघात सात-आठ महिन्यांत शेकडो कोटींचा विकास निधी मंजूर – आ. कराड
सामनगाव येथे १ कोटी १२ लाखाच्या विविध विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन
लातूर (प्रतिनिधी) : ज्या दिवशी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले त्या दिवसांपासून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात विकासाचा जेवढा म्हणून निधी आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न केला असून त्यानुसार गेल्या सात आठ महिन्यात शासनाच्या विविध विभागामार्फत शेकडो कोटींचा निधी आणण्यात यश आले. मात्र ज्यांनी पैशाच्या जोरावर आमदारकी विकत घेतली त्यांनी काय केले असा प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी उपस्थित केला आहे.
लातूर तालुक्यातील मौजे सामनगाव येथील केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत ४७ लक्ष रुपये खर्चाच्या हर घर नल, नल से शुध्द जल योजना; सामाजिक न्याय विभागांतर्गत ५ लक्ष रुपयाचे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, आ. कराड यांच्या आमदार निधीतून ७ लाख रुपयाचा सिमेंट रस्ता, ३३ लाख रुपये खर्चाच्या सामनगाव- भोईसमुद्रगा पांदण रस्ता, पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत ८ लक्ष रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता, भूमिगत गटार शाळा दुरुस्ती, अनुसूचित जातीचा विकास योजने अंतर्गत ५ लाख रुपयाचा सिमेंट रस्ता आणि जनसुविधे अंतर्गत ७ लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता अशा एकूण १ कोटी १२ लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभ हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन गुरूवारी संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामनगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करत आ. कराड यांचे जोरदार स्वागत केले.
लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरआप्पा बुलबुले हे होते तर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेश सदस्य भागवत सोट, तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, लातूर तालुका संगायो समितीचे अध्यक्ष वैभव सापसोड, ज्येष्ठ नागरिक शहाजीआप्पा येलूरकर, सरपंच प्रीतीताई ईश्वर बुलबुले, भाजपाचे सुधाकर गवळी, विश्वास कावळे, गोपाळ पाटील, बालासाहेब कदम, ईश्वर बुलबुले, शिवदास बुलबुले, धनराज शिंदे, प्रताप पाटील, काशिनाथ ढगे, तुकाराम झुंजारे बसलिंगआप्पा गुरुजी, ज्ञानेश्वर जुगल, लताताई भोसले, पद्माकर होळकर, पांडुरंग गडदे, वैभव मगर, अशोक झुंजारे, लिंबराज येलूरकर, बळवंत बुलबुले, गुरुनाथ बुलबुले, श्रीकृष्ण काळे, मेघाताई झुंजारे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमातून बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, गावचा कर्ता चांगला असेल तर गावात बदल होवू शकतो. आजपर्यंत वेळोवेळी सामनगावच्या ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवून साथ दिली. या विश्वासातून कोठेतरी उतराई व्हावी म्हणून गावच्या विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मला काय मिळाले यासाठी मी आजपर्यंत काम केले नाही तर गोरगरीब जनतेसाठी काय करू शकतो यासाठीच काम करत राहीलो. गेल्या विधानसभा निवडणूकीत माझी उमेदवारी कशी विकली, कोणी विकत घेतली हे सर्वांना माहीत आहे. मात्र आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेवून पक्षाने मला आपल्या आशिर्वादाने आमदार केले. या आमदारकीच्या माध्यमातून लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात वाडीतांड्यात विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला.
भ्रष्ट कॉग्रेसला बाजूला सारून देशात नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार सत्तेवर आले. गेल्या नऊ वर्षात देशात आणि गावागावात काय बदल झाला याचा प्रत्येकाने विचार करावा असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, कॉग्रेसला जे ७० वर्षात जमले नाही ते मोदीजींने ९ वर्षात करून दाखविले. संपूर्ण जग एका मोठया अपेक्षेने नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे पाहत आहे. जात धर्म पंथ न पाहता ज्यांना लाभ देणे गरजेचे आहे अशा गोरगरीब सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाच्या विविध योजनेचा थेट लाभ देण्याचे काम त्यांनी केले असून राम मंदिर, काशीविश्वनाथ, उजैनच्या काळभैरवनाथ मंदिराचा जिर्णोध्दार करून भारतीय संस्कृती जतन करण्याचे काम केले आहे.
नरेंद्रजी मोदी साहेब यांना हटवण्यासाठी देशातील सर्वच पक्ष एकत्र येत आहेत मात्र या देशातील सर्वसामान्य जनता मोदीजींच्या पाठीशी आशिर्वाद रूपाने उभी आहे. जोपर्यंत आठरापगड जनतेचा आशिर्वाद आहे तोपर्यंत देशातीलच काय तर जगातील कोणतीही शक्ती त्यांना हरवू शकत नाही असे सांगून देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेणा-या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी आपल्या सर्वांचे आशिर्वाद कायम रहावेत असे आवाहन आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
प्रारंभी सामनगावच्या सरपंच सौ. प्रीतीताई ईश्वर बुलबुले यांनी आपल्या प्रास्ताविकातून गावात झालेल्या विविध विकास कामाची सविस्तर माहिती दिली तर या प्रसंगी भागवत सोट, ईश्वर बुलबूले यांनी आपले मनोगत व्यक्त करून आ. रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातूनच विविध विकास कामांना गती मिळाली असल्याचे बोलून दाखविले. या कार्यक्रमास भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामनगाव येथील महिला पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.