राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर (एल.पी.उगीले) : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार आणि सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राजर्षि छत्रपती शाहू महाराज चौकातून समता दिंडीला सुरुवात झाली.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर समता दिंडीचा समारोप झाला. समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक या समता दिंडीत सहभागी झाले होते.
सामाजिक न्याय भवन येथे राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक नय्य भवन येथे आयोजित कार्यक्रमात समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले.
यावेळी संभाजी नवघरे व प्रा. विवेक सौताडेकर यांनी मार्गदर्शन करताना लोककल्याणकारी लोकराजा राजर्षि शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या कार्य कर्तृत्वाची प्रेरणा पिढ्यान पिढ्या ऊर्जा व सामाजिक जाणिव देत राहील, असे सांगितले. यावेळी त्यांनी राजर्षि शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.