लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या लोकार्पण सोहळ्यास खा.सुधाकरराव शृंगारे,आ.विक्रम काळे,आ.धीरज विलासराव देशमुख,माजी खासदार डॉ.सुनिल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.योगायोगाने शहरात असणारे उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार तिरथसिंह रावत आणि मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष विनोद गोठिया हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहिले.मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.

लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

यावेळी मनोगत व्यक्त करताना खा.सुधाकरराव शृंगारे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले.विकासापासून कोसो दूर असणाऱ्या जातींसाठी आरक्षण लागू केले.विधवा पुनर्विवाहा सारखे कायदे लागू करत सामाजिक सुधारणांसाठी शाहू महाराजांनी पुढाकार घेतल्याचे ते म्हणाले.

आ.विक्रम काळे,आ.धीरज विलासराव देशमुख,माजी खासदार डॉ.सुनिल गायकवाड यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू न शकलेले आ.अमित देशमुख यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले.

प्रास्ताविक करताना आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी पुतळा उभारणीमागची पार्श्वभूमी विषद केली.याशिवाय मनपाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. शहरातील महिलांसाठी मनपाकडून मोफत शहर बस सेवा चालविली जाते. पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत नसतानाही सामाजिक जाणिवेतून मनपा हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी आयुक्त बाबासाहेब मनोहरे,अतिरिक्त आयुक्त शिवाजी गवळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. मूर्तिकार दिनेश लोखंडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.उपायुक्त मयुरा शिंदेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास मान्यवर लोकप्रतिनिधींसह मनपाचे अधिकारी व कर्मचारी, माजी नगरसेवक आणि शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author