जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले आहे, आरक्षणाची मागणी नाही – विवेक जाधव

जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले आहे, आरक्षणाची मागणी नाही - विवेक जाधव

उदगीर (एल.पी.उगीले) सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले. मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीनंतर उपोषण थांबवले असले तरी, मागणी लावून धरलेली आहे. आरक्षण मिळेपर्यंत सकल मराठा समाजाचा लढा चालूच राहणार असल्याचे मत गंगापूर भाकसखेडा विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.

उदगीर तालुक्यातील करडखेल येथे करडखेल, वायगाव, हेर, करवंदी, डीग्रस, भाकसखेडा, सताळा इत्यादी गावातून सकल मराठा समाज जमा होऊन छत्रपती संभाजी महाराज चौकात एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाच्या नंतर प्रसिद्धी माध्यमांना बोलताना विवेक जाधव यांनी सांगितले की, सरकार जोपर्यंत आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत सकल मराठा समाज गप्प बसणार नाही. मराठा समाजाला पोकळ आश्वासन देऊन सरकारने दिशाभूल करू नये. आरक्षण मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. या आंदोलन प्रसंगी जमा झालेल्या पंचक्रोशीतील सर्व गावांच्या सकल मराठा समाजातील नेत्यांनी प्रतिनिधीक स्वरूपात शासनाला महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव यांच्यामार्फत निवेदन देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. याप्रसंगी प्रामुख्याने अनंत ढगे, बालाजी माटेकर, नाना ढगे, बळवंत घोगरे, अजित पाटील गव्हाणकर, दिलीप होनाळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत ढगे, प्रमोद पाटील, सतीश गायकवाड, कृष्णा घोगरे, रावसाहेब गायकवाड, युवराज ढगे, महेश गुरुडे, लक्ष्मण गुराळे, गितेश ढगे, गोविंद मातनकर,दत्ता बर्ले, दिलीप निडवंचे, अविनाश बेलकुंदे इत्यादी उपस्थित होते. रस्ता रोको दरम्यान कोणताही अनर्थ घडू नये, म्हणून उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे जेष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About The Author

error: Content is protected !!