सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे – दिलीप भागवत

सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे - दिलीप भागवत

उदगीर (प्रतिनिधी): येथील उर्दू माध्यमाची शाळा अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अमली पदार्थां बाबत जनजागृती करण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीपजी भागवत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासाकरिता व्यसनापासून नेहमी दूर राहावे. व्यसनाधीन माणूस सारासार विवेक बुद्धीचा विचार किंवा संस्काराचा विचार न करता वागत असतो. त्यामुळे त्याच्या हातून चुकीचे कृत्य होण्याची शक्यता असते. विद्यार्थी दशेमध्ये संगत आणि अनुकरण करण्याच्या सवयीमुळे व्यसनाधीन होण्याची शक्यता असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळीच सावध होऊन व्यसनापासून दूर रहावे.
यावेळी कार्यक्रमात डॉक्टर हाशमी इरफान यांनी विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय? हे कशाप्रकारे लागते? याचे दुष्परिणाम काय? व यापासून कशाप्रकारे सावध राहावे? याबाबत सखोल वैज्ञानिक माहिती सांगितली. व्यसनाधीन समाज नेहमी अधोगतीकडेच जात राहतो असे त्यांनी सांगितले.
विशेष मार्गदर्शन करताना दिलीप भागवत यांनी सांगितले की, अमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होतात. समाजाचे स्वास्थ्य बिघडते. व्यसनाधीन लोकांना कोणकोणत्या कलमाखाली अटक केली जाते, व शिक्षा दिली जाते. याचेही वर्णन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे, गुरुजनांचे व वडीलधाऱ्या माणसांचे मान ठेवत वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सल्ल्यांवर आचरण करावे, जेणेकरून दुर्गुणापासून दूर राहाल. असा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थिनींनी शाळेत व शाळेबाहेर वावरत असताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत आपल्या शिक्षकांशी व आई-वडिलांशी चर्चा करावी. स्त्रिया-मुली करिता कायदा सशक्त आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरापासून दूर राहावे, असाही त्यांनी सल्ला दिला.
अध्यक्षीय भाषणात शेख अकबर, सचिव अल-अमीन एज्युकेशन सोसायटी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या की, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता इतके सुंदर कार्यक्रम ठेवलेले आहेत. येथे मार्गदर्शित माहितीचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उपयोग करून घ्यावा. अभ्यासाकरिता जास्त वेळ द्यावा, समाज व देशाचे नाव उज्वल करावे, असाही सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यासह शेख अझरोद्दीन यांचीही उपस्थिती राहिली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विद्यालयाच्या प्राचार्या शेख आजेमा बेगम यांच्यासोबत सर्व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद अनवर हुसेन व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक गुलाम गौस खान यांनी व्यक्त केले.

About The Author