वर्तमानाचे पडसाद म्हणजे अस्वस्थ काळ रात्रीचे दृष्टांत होय – प्रभाकर साळेगावकर
उदगीर( एल.पी.उगीले) – जगात सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे मानवता धर्म आहे. परंतु आज माणसाच्या बाजारात भावनांचा बाजार मांडून स्वतःला विकून पोट भरण्यासाठी फिरणारे भिकारी पावलोपावली भेटतात. महिलांचा स्वतःच्याच घरात कधीकधी श्वास गुदमरतोय. कुणालाही मनःशांती नाही. दया, क्षमा, शांती सांगणारे सर्वच धर्मातील धर्मांध दुर्विचारांचे विष पाजत सुटलेत. सगळीकडे सामाजिक वितुष्टता वाढत आहे. अशा या वर्तमानाचे पडसाद व्यक्त करणाऱ्या कवितांचा संग्रह म्हणजे अस्वस्थ काळ रात्रीचे दृष्टांत होय, असे मत प्रसिद्ध साहित्यिक, कवी प्रभाकर साळेगांवकर यांनी व्यक्त केले.
गोरख सेंद्रे, प्रसिद्ध साहित्यिक अंबाजोगाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व चला कवितेच्या बनात या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक चळवळीच्या वतीने चालवल्या जात असलेल्या 298 व्या वाचक संवादास टीव्ही स्टार, प्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या संवादात प्रभाकर साळेगांवकर यांनी रमजान मुल्ला लिखित अस्वस्थ काळ रात्रीचे दृष्टांत या साहित्यकृतीवर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी वक्तृत्वाने परिपूर्ण असा संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, तप्त व दग्ध भोवताल, ढासळत जाणारी मूल्ये, प्रेमाला पारखी झालेली माणसे, धर्माच्या दहशतीखाली जखमी-दुःखी अवस्थेत वावरणाऱ्याच्या यातनांना शब्दात मांडताना मानवता,संस्कृती, संस्कार आणि परोपकार या अनुषंगाने आत्मटिका करत, धर्मातील कुप्रथांचा समाचार घेत, धर्मापेक्षा भूक मोठी असल्याचे सांगणार्या रमजान मुल्ला यांच्या कविता मानवता धर्माचा पुरस्कार करत परिवर्तनाला दिशा देणाऱ्या असून समतेच्या झाडाला बांधून माणूसकीचा झोका घेतात. अस्वस्थ विचारांना अश्वस्थ करणाऱ्या मानवी मूल्यांच्या या कविता आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत, प्रसिद्ध नाटककार तुळशीदास बिरादार, यांसह अनेकांनी सहभाग घेतला. यानंतर उपस्थितांना जन्मदिनानिमित्त ग्रंथ भेट देण्यात आली. शेवटी अध्यक्षीय समारोपात गोरख सेंद्रे यांनी वाचनाच्या या महायज्ञाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे संचालन भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर जाधव यांनी केले. संवादकांचा परिचय संयोजक अनंत कदम यांनी करून दिला.तर आभार वीरभद्र स्वामी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी आनंद बिरादार, हणमंत म्हेत्रे, प्रा.राजपाल पाटील, मिटू पाटील व सुरेश वजनम आदींनी परिश्रम घेतले.