प्राध्यापक पद भरतीच्या नावान चांगभलं
(दि.२१ जून २०२१ पासून महाराष्ट्रातील नेट-सेट व पी-एच.डी. धारक संघर्ष समिती महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी हे प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन सूरू करताहेत. त्या नीमित्ताने लिहीलेला हा प्रासंगिक लेख.)
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. माणूस आयुष्यभर शिकतच असतो. शिक्षणाचे औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण असे ही भेद केले जातात.शाळा महाविद्यालयातून दिले जाणारे शिक्षण औपचारिक शिक्षणाच्या अंतर्गत येते. त्या संबंधाने आपण थोडासा विचार करणार आहोत.असे म्हणतात की समाजाचा सर्वांगीण विकास हा सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी, शिक्षक, पालक व चालक हे चार घटक महत्त्वाचे आहेत. सरस्वतीच्या हातात वीणा आहे.त्या वीण्याला चार तारा आहेत. त्या चार तारा वरील चौघांचे प्रतिनिधित्व करतात.त्यातून सुस्वर संगीत ऐकावयाचे असेल तर या चारही तारांचा आवाज सारखा असला पाहिजे म्हणजे सगळ्यांना तेवढेच महत्त्व दिले गेले पाहिजे.तरच शिक्षणातून जीवन विकासाचे सुमधुर संगीत ऐकायला मिळेल. अन्यथा यातील एक जरी घटक अपूर्ण राहिला तर जीवनाचे बेसूर संगीत ऐकावयास मिळेल.आजचे शिक्षण क्षेत्राचे चित्र पाहिले तर काय दिसते. एकीकडे विद्यार्थी केंद्रबींदु समजून शिक्षण दिले जातेय म्हणायचे आणि या गरीब विद्यार्थ्यांकडे कुठल्याच आॅनलाईन सुविधा नसताना त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचे धोरण अवलंबायचे हे विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा सध्यातरी अहिताचेच दिसते. दुसरा घटक पालक हा आहे.काही पालक अतिशय जागरूक आहेत तर काही पालक फारच शिक्षणाबाबत अनास्था असलेले आहेत. त्याला सध्याच्या काळात भरमसाठ वाढलेली फी भरून लेकरांना शिकवणे अवघड होत चालले आहे. तीसरा घटक चालक मग ते संस्थाचालक असतील की सरकार असेल. त्यांनाही हे क्षेत्र अनुत्पादक वाटायला लागले आहे की काय असी शंका घ्यावी असे वातावरण आहे कारण पूर्वी शिक्षक प्राध्यापकांना या दोन्ही घटकांकडून जो सन्मान मिळायचा त्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. त्यात प्राध्यापक, शिक्षक, संस्थाचालक व शासन या चौघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आली आहे काय ? असे वाटते. सर्वात महत्त्वाचा घटक जो शिक्षणक्षेत्राला गतिशील बनवतो. त्याला कुंभाराची, माळ्याची व अन्य उपमा दिल्या गेल्या आहेत. विदेशात ज्याला सोशल इंजिनियर म्हटले जाते तो शिक्षक या प्राध्यापक. जो समाजात विचार व विवेक निर्माण करण्याचे काम करतो असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.ज्या शिक्षकांबद्दल असे म्हणतात की बुद्धी, श्रम आणि मन विकसित करण्याचे काम करतो तो शिक्षक. विद्यार्थ्यात आत्मभान निर्माण करून देतो, त्याच्यातल्या स्वत्वाची ओळख करून देतो. विवेकानंद म्हणाल्याप्रमाणे प्रत्येक माणूस हा जन्मजात प्रचंड ज्ञानाचा साठा घेऊन जन्माला येतो ज्ञानाच्या प्रचंड साठयावर आलेला पडदा दूर करण्याचे काम शिक्षक करतो. समाजाला दारिद्र्य,अज्ञान व अंधश्रद्धेतून मुक्त करून ज्ञानी,विवेकी व विज्ञाननिष्ठ व संपन्न समाज बनविण्याचे काम करतो. त्याप्रमाणे समाजाचा सर्वांगीण विकास घडविण्याचे काम शिक्षकच करतो म्हणून जगाच्या पाठीवर त्याला फार सन्मानाचे स्थान असल्याचे आपणास पहावयास मिळते. आपल्याकडेही प्राचीन काळापासून त्याला ब्रह्मा,विष्णु,महेश यांची उपमा देऊन त्याचा वेळोवेळी गौरव केला आहे पण आज मात्र त्या शिक्षकाकडे फार गांभीर्याने पाहिले जाते आहे असे दिसत नाही. सरकार कुठल्याही पक्षाचे असु देत त्यांना शिक्षण क्षेत्राशी व शिक्षक प्राध्यापकांसी काही देणे घेणे आहे असे वाटत नाही. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी निवडून जाणारे आमदार मंडळी ही पक्षाच्या बॅनरखाली निवडून जात असल्यामुळे त्यांची अनेक वेळा बोलती बंद होत असल्याचे आपणास दुर्दैवाने पाहावे लागत आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही हा विचार महात्मा फुले, शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत गाडगे महाराज या समाजसुधारक व शिक्षण तज्ज्ञांनी दिला. शिक्षणाच्या विकासासाठी अनेक आयोग स्वातंत्र्यानंतर नेमले गेले, अनेक शिफारशी आल्या पण शिक्षणावरचा एकूण उत्पन्नाच्या तुलनेत खर्च दिवसेंदिवस कमी होतानाच दिसतो आहे.अलीकडे तर ऑनलाइन शिक्षणाचे प्रमाण अधिक करण्याचा विचार करून नवीन शिक्षक व प्राध्यापकांच्या पदभरतीला काही प्रमाणात खो देण्याचाच प्रयत्न चाललाय की काय असे वाटते आहे.यात चांगली भावना असेलही पण सरकारचे शिक्षण आणि पदभरतीचे धोरण पाहुन अस्या शंकेला वाव आहे. इकडे भारताला विश्वगुरू बनवण्याची भाषा करायची, नवनवीन शैक्षणिक धोरणाला गोंडस नाव द्यायची आणि शिक्षण व्यवस्थेचे कंबरडे मोडेल अशी कृती करायची असे दोन्ही स्तरावरील (राज्य व केंद्र) सरकारचे धोरण दिसते आहे. मागील दशकापेक्षा अधिक काळापासून शिक्षण क्षेत्राचा जो कणा शिक्षक व प्राध्यापक आहे त्यांची भरतीच बंद केली आहे.या क्षेत्रात ही कुणाच्या डोक्यातून सुपीक कल्पना आली माहिती नाही पण आधुनिक चातुर्वण्य व्यवस्था आणली गेली आहे.विनाअनुदानित शिक्षक, अंशत अनुदानित शिक्षक,शिक्षण सेवक शिक्षक, पूर्ण पगारी शिक्षक अशी चातुर्वण्य (वर्ग ) व्यवस्था. जुन्या वर्णव्यवस्थेच्या नावाने बोटे मोडायची व नवीन तीच व्यवस्था वेगळ्या पद्धतीने आणायची असेच दिसते.एकीकडे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला म्हणून त्याला दोष द्यायचे आणि दरवर्षी हजारों विद्यार्थ्यांना सेट-नेट, पी-एच.डी.साठी पुन्हा पुन्हा परीक्षा द्यायला लावण्याच्या नावावर फिस गोळा करायची आणी पात्रता प्राप्त केल्यावर मात्र नौकरी द्यायची नाही. हे बोट कापने नव्हे तर काय आहे?पदभरतीचा मुद्दा आला की अर्थव्यवस्थेचे कारण पुढे करायचे, कोरोनाचे कारण पुढे करायचे अशी पळपुटी भूमिका घेतली जाते आहे. मागील वर्षापासून कोरोना असेल पण त्यापूर्वी तर कोरोना नव्हता ना ? मग का झाली नाही पदभरती? वर्गात जर शिकवायला शिक्षक, प्राध्यापकच नसतील तर भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न कसे पूर्ण होईल? सर्वोच्च न्यायालय,विद्यापीठ अनुदान आयोग कितीतरी महिन्यांपासून शिक्षणाची गुणवत्ता ही पदभरती नसल्यामुळे ढासळते आहे असे सांगते आहे.त्यासाठी लवकर पदभरती करा म्हणून सांगते आहे पण मायबाप सरकारला त्याच्याशी काही लेनदेन नाही. एकीकडे महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहे असे असा डंका वाजवायचा आणि ज्या शिक्षणाने माणूस पुरोगामी बनतो त्याचेच कंबरडे मोडायचे. अंशता मान्यता,लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार असे गोंडस व तोंडाला पाणी पुसणारी आश्वासने मागील काही महिन्यांपासून ऐकून मेंढपाळ व त्या वाघाच्या गोष्टीची आठवण होते आहे.खरे तर प्राध्यापक होण्यासाठीची पात्रता प्राप्त करण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला किती प्रकारच्या अडचणी पार करून किती कष्ट सोसून इथपर्यंत पोहोचावे लागते याचा विचार सरकारने करायला हवा. योग्यता प्राप्त करून घड्याळी तासिकेवर पुढच्या भविष्याच्या आशेने पन्नाशी गाठलेले कित्येक प्राध्यापक महाराष्ट्रात आहेत. लग्न होत नाहीत ज्यांची लग्ने झाली आहेत त्यांची अवस्था ‘बारोमास ‘कादंबरीतील नायकासारखी झाली आहे.त्यांना संसार कसा चालवावा असा प्रश्न अर्थव्यवस्थे मुळे निर्माण झालाय, म्हणजेच ‘माय जेवू घालीना अन बाप भीक मागू देईना’ असी स्थिती या विद्यार्थ्यांची झाली आहे. काहींना तर शेवटी अन्न त्यागाचा मार्ग अवलंबावा लागला हे काही पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही. येत्या २१ जून २०२१ पासून नेट सेट व पी-एच.डी. प्राप्त विद्यार्थी या पदभरतीसाठी ‘करो या मरो’ असे हिमतीने आंदोलन करणार आहेत.खरे तर या युवा पिढीचा जास्तीचा अंत सरकारने आता पाहू नये. अन्यथा हे जर पेटुन उठले तर मग अनर्थ व्हायला वेळ लागणार नाही. पण मला आशा आहे की महाराष्ट्राला चांगल्या जाणत्या नेतृत्वाची परंपरा लाभलेली आहे. समस्या चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा कसबही आपल्या नेतृत्वाने वेळोवेळी दाखविला आहे. तसेच हे मायबाप सरकार ही दाखवेल. प्राध्यापकाच्या पदाची योग्यता अंगी असताना भेळपुरीचा गाडा लावणे,गवंड्याच्या हाताखाली कामाला जाणे असे काम या विद्यार्थ्यांना करावी लागत आहेत. त्यापासून सूटका करुन त्यांच्या बुद्धिमत्तेची कदर केली जाईल अशी आशा बाळगतो. शिक्षण हे अनुत्पादक आहे ही भावना मनातून काढून टाकून शिक्षणाकडे जर चांगल्या दृष्टीने पाहिले तरच आपण आणलेली ही गोंडस धोरणे फलद्रूप होतील.अन्यथा या क्षेत्रात गुणी व विद्वान मंडळी येणार नाहीत.आज चांगली माणसे या क्षेत्रापासून हळूहळू दुरावत चालली आहेत ते अधिकच दुरावतील व शिक्षणाचे कंबरडेच मोडेल. त्यासाठी आपण ‘बसवा अर्थव्यवस्थेचा मेळ व मिटवा पदभरतीचा घोळ’एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो.
प्रा.डॉ. रामकृष्ण बदने,
ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर,
ता.मुखेड जि.नांदेड.
भ्रमणध्वनी-९४२३४३७२१५