रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागातील विद्यार्थ्यांना मिळणार पावणेचार कोटीची शिष्यवृत्ती

0
रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागातील विद्यार्थ्यांना मिळणार पावणेचार कोटीची शिष्यवृत्ती

सांगली (प्रतिनिधी) : शिक्षण क्षेत्राला गुणवत्तेचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाने (सांगली) राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात ‘एनएमएमएस’ तसेच सारथीमध्ये लख्ख यश मिळवले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘एनएमएमएस’ परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाने नेत्रदीपक यश प्राप्त करून याही वर्षी आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. तब्बल ९६९ विद्यार्थी राष्ट्रीय तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या ५५ विद्यार्थ्यांसाठी २६ लाख ४० हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ‘सारथी’साठी पात्र ठरलेल्या ९१४ विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांकरिता ३ कोटी ५० लाख ९७ हजार ६०० अशी एकूण ३ कोटी ७७ लाख ३७ हजार ६०० रुपये शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रेरणेतून व विद्यालयाच्या मार्गदर्शिका सरोज पाटील (माई) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संस्थेच्या दक्षिण विभागांतर्गत कार्यरत राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ढवळी (ता. वाळवा) विद्यालयाने इयत्ता आठवीच्या ‘एनएमएमएस’ परीक्षेत भरारी घेतली असून विद्यालयाचे एकूण ७४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ५४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सुयश प्राप्त केले. मयुरी विशाल पाटील, अनुष्का काशिनाथ हाके यांच्यासह अन्य ५ विद्यार्थी सांगली जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकले तर ४१ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख ए. एस. कांबळे, मुख्याध्यापक व्ही. के. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
रुकडी (ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी विद्यालयाने ‘एनएमएमएस’ परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले असून विद्यालयाचा विद्यार्थी अभिलाष संजय कांबळे याची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून त्याने १३८ गुण प्राप्त करून कोल्हापूर जिल्ह्याच्या यादीत (राखीव संवर्गातून) १२ व्या स्थानी भरारी घेतली आहे. १६ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीधारक ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख एस. एस. कुंभार, मुख्याध्यापक एम. एस. हजारे यांनी मार्गदर्शन केले. नेहरू विद्यालय हिंगणगाव (बु.) विद्यालयातील अनुष्का पांडुरंग माने, प्रथमेश संतोष कदम यांच्यासह २२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेचा एकूण निकाल ८१.२५% लागला. मुख्याध्यापक एस. डी. अणेकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने हे यश मिळवले. न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) या विद्यालयाची दिक्षिता रोहन मातोंडकर या विद्यार्थिनीने सर्वसाधारण प्रवर्गातून तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावून बाजी मारली. तर मंथन महादेव परब हा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षिका अर्चना पाटील, मुख्याध्यापक व्ही. पी. मांजलकर यांना देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
दक्षिण विभागाच्या सडोली खालसा शाखेने चमकदार कामगिरी करत ८२.६५ % निकाल प्राप्त करून यशाला गवसणी घातली. हुपरी शाखेची विद्यार्थिनी काव्या राहूल मुद्राळे हिची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. दुधगाव शाखेतून वेदांत कुलदीप गुरवने इतर मागास प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. शिरोळची पूर्वा विजय मुडशिंगे ही विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली. आष्टा शाखेचे प्राचार्य व्ही. एम. महाडिक यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे निर्जरा सुदर्शन उपाध्ये हीने चमकदार कामगिरी करून जिल्हास्तरीय निवड यादीत आपली नाममुद्रा उमटविली. सियात आमीर तांबोळी हा ग्रामीण भागातील खरसुंडी शाखेत शिकणारा विद्यार्थी जिल्ह्यात २० व्या स्थानी पोहचला. साखरपासारख्या दुर्गम भागातील दक्षिण विभागाच्या अन्य ८५ शाखांतील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत धवल यश मिळविल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विभागीय अधिकारी विनयकुमार हणशी, सहाय्यक इन्स्पेक्टर ए. ए. डिसोझा, यू. बी. वाळवेकर, कार्यालयीन कर्मचारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

चौकट १ : संस्थेतील तज्ज्ञ शिक्षकांची मेहनत, योग्य मार्गदर्शन तसेच संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रूव्हन स्ट्रॅटेजीमुळे स्पर्धा परीक्षेत ‘रयत’मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानावर असलेल्या पहिल्या तीन विद्यालयांना ‘वात्सल्य फाउंडेशन’च्यावतीने हजारोंची बक्षीसे जाहीर केली आहेत. तसेच आगामी शैक्षणिक वर्षाचे अचूक नियोजन केले असून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करणे, त्यांची बौद्धिक-मानसिक तयारी करणे आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे हे आमच्या विभागाचे उद्दिष्ट आहे.
– डॉ. एम. बी. शेख, विभागीय चेअरमन, रयत शिक्षण संस्था, दक्षिण विभाग, सांगली.

चौकट २ : रयत शिक्षण संस्था स्थापन करून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार केले आहेत. कर्मवीर अण्णांचा वसा आणि वारसा पुढे चालवत संस्थेतील निष्ठावान शिक्षक विद्यार्थ्यांप्रती आपुलकीची भावना मनात ठेवून समतोल पद्धतीने विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहेत. ‘रयत’चा विद्यार्थी कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रांत पारंगत करण्यासाठी संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. यास्तव ‘रयत’मध्ये बहुगुणी विद्यार्थी घडतात अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे.
– विनयकुमार हणशी, विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था, दक्षिण विभाग, सांगली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *