विशेष संपादकीय ; लातूरकरांना गाजर दाखवणारे… उजनीचे पाणी पेटणार !! सत्तेतील बड्या धेंडांना कोण खेटणार ?

विशेष संपादकीय ; लातूरकरांना गाजर दाखवणारे... उजनीचे पाणी पेटणार !! सत्तेतील बड्या धेंडांना कोण खेटणार ?

सडेतोड ( गणेश डी.होळे ) : लातूरचा पाणीप्रश्न सतत चघळत राहणारा विषय बनला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून लातूरकर उजनीच्या पाण्याची मागणी करत आहेत. नेत्यांनी वेळोवेळी आश्वासनांची खैरात केली. मात्र लोकांच्या तोंडचे पाणी पळाले तरी उजनीचे पाणी आले नाही. आणि आता तर नवीनच गुर्‍हाळ सुरू आहे.

 ज्या पद्धतीने एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस प्रशासनाला प्रसिद्धीमाध्यमांनी त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारल्यास, पोलीस सांगतात “तपास चालू आहे……” तशाच पद्धतीने आता उजनीच्या पाण्याच्या संदर्भात राजकीय नेत्यांचा म्हणे अभ्यास चालू आहे!! लातूरकरांना इतिहासाची आठवण येऊ लागली आहे, भूक बळी च्या दरम्यान राजाकडे अन्नाची मागणी केली असता, “चटणी भाकरी मिळत नसेल तर शिरा पुरी खा”असे सांगीतले गेले होते म्हणे! याप्रमाणेच “नळाला पाणी येत नसेल तर रेल्वेने पाणी आणा!” असा प्रकार आता लातूरकरांना वाटू लागला आहे.

 लातूर शहरासाठी उजनी धरणातील पाणी आरक्षित करून  ते देण्यात यावे, अशी मागणी गेली कित्येक वर्षे चालू आहे. मात्र अजूनही हे घोंगडे भिजतच आहे (अर्थात उजनीच्या पाण्यात!) जलसंपदामंत्री यांनी लातूर दौर्‍यावर असतांना सांगितले की, या पाण्याच्या संदर्भात अभ्यास चालू आहे…. तज्ञ मंडळी सोबत मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीतील तज्ञांचे मत विचारात घेऊन नंतरच तोडगा काढता येऊ शकेल! असे सांगून लातूरकरांच्या तोंडचे पाणी पळवले.

 कृष्णा खोरेचे सात टीएमसी पाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांना पोहोचेल! अशी तरतूद राज्य शासनाने केली आहे.मग लातूरकरांनी काय घोडे मारलेय?

 लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोऱ्यातून 21 टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी मंजूर केले होते. मात्र लवादाच्या निर्णयात केवळ सात टीएमसी पाणी मंजूर झाल्याचा खुलासा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असून लातूर शहरासाठी सतत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उजनीच्या पाण्याला बगल दिल्यानंतर पाटील यांनी सांगितले की, जायकवाडी धरणात नाशिक परिसरातील वाया जाणारे पाणी मुकणे धरणात आणून सोडले जाईल आणि तेथून पुढे जायकवाडीत सोडले जाईल. यापैकी सुमारे 17 टीएमसी इतके पाणी मराठवाड्याला दिले जाईल आणि जे अतिरिक्त पाणी होईल, ते जायकवाडी धरणातून माजलगाव मार्गे बीड, लातूर, उस्मानाबाद साठी उपलब्ध केले जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करून जागतिक बँकेकडून कर्ज उपलब्ध केले जाणार असल्याची ही माहिती त्यांनी सांगितली. (आता हा भविष्यकाळातील विषय) कधी पूर्ण होईल? हे सांगता येत नाही.आब्बा मरेंगे,बैल काटेंगे…..तशी अवस्था आहे!जागतिक बॅंकेने कर्ज मंजुर केले तर…..आता हा जर तरचा विषय आला!

 एकंदरीत काय तर उजनीच्या पाण्याचा विषय आता लातूरकरांनी विसरलेले बरे!असे म्हटले तर वावगे होणार नाही. जीवन जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याला “जीवन” असेही नाव दिले गेले आहे! आणि असे असले तरीही हे “जीवन” लातूरकरांना देण्यामध्ये कोणी अडथळा करत आहे? हा संशोधनाचा विषय आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमितभैया देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आमची सत्ता आल्यास दोन महिन्यात उजनी धरणाचे पाणी लातूर शहरासाठी उपलब्ध करून देऊ. असे आश्वासन दिले होते. आता हे आश्वासन काही नवीन नव्हते, कारण गेल्या पंचवीस वर्षापासून लातूरकरांना उजनीच्या पाण्याचे गाजर दाखवणे चालू आहे. एकूण मराठवाड्याचा प्रश्न ऐरणीवर अणण्या एवढी किंमत कोणाकडेही शिल्लक राहिली नाही! आणि सत्तेतील बड्याबड्या नेत्यांना जाब विचारण्याची ताकद सामान्य जनतेत नाही.

 काल काय झाले? हे सामान्य जनतेला लक्षात राहत नाही. तिथे गेल्या निवडणुकीच्या वेळी काय आश्वासन दिले होते? हे कसे लक्षात राहील? आणि त्यामुळेच राजकीय नेते वेळोवेळी सोयीनुसार आश्‍वासनांची खैरात करत असतात. सामान्य जनता लगेच त्या आश्वासनाला भुलते आणि मत “दान” करत असते!

 लातूरकरांसाठी दुसरा एक आशेचा किरण होता, तो म्हणजे लिंबोटी धरणाचे तरी पाणी उपलब्ध होईल का? मात्र नांदेड येथील पत्रकार परिषदेमध्ये जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले की, पाणी प्रश्नावरून कुठेही तंटा निर्माण होऊ नये. याची खबरदारी घेत लिंबोटीधरणाचे पाणी लातूरला न देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल! म्हणजे लिंबोटीच्या पाण्याचाही प्रश्न कायमचा निकाली काढण्यात आला आहे! आणि लातूरकरांच्या नशिबी पुन्हा “येरे माझ्या मागल्या……” म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या दिवशी सामान्य माणूस आपल्या अत्यावश्यक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून नेत्याला जाब विचारेल, त्यादिवशी जीवनावश्यक असलेल्या पाण्याच्या प्रश्नाला दिशा आणि गती मिळू शकेल. नाहीतर मग “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी…. “हे  असेच चालणार आहे.

 उदगीरसाठी सुद्धा लिंबोटी पाण्याचा आरक्षणाचा प्रश्न प्राध्यापक मनोहर पटवारी आमदार असताना पाणी आरक्षित करून घेतले होते. मात्र प्रत्यक्ष पाणी यायला तब्बल वीस वर्ष जावी लागली. त्यादृष्टीने लातूरकरांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवल्यास कुठेतरी मार्ग निघू शकेल, मात्र सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेले पुढारी आपली जीभ कधी उचलणार? हा मोठा प्रश्न आहे !

About The Author