गोरक्षण संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) शहरालगत असलेल्या सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असलेले गोसेवेचे कार्य हे महान कार्य आहे. या संस्थेच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी दिली.
सोमनाथपुर येथील श्री गोरक्षण संस्था परिसरात गोमातेसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या निवारा शेडचा गोअर्पण सोहळा माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. गोविंदराव केंद्रे होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, रमेश अंबरखाने, सोमनाथपुरच्या सरपंच अंबिका पवार, माजी नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, प्रा. श्याम डावळे, उद्योजक सागर महाजन, पशुधन विकास अधिकारी विजयकुमार घोनसीकर, शिवयोगी तोंडारे, डॉ. रामप्रसाद लखोटीया, प्रशांत मांगुळकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोमातेच्या बाबतीत कायदा केला आहे, त्या कायद्याची सर्वांनी अंमलबजावणी करावी. असे आवाहन करून गोरक्षण संस्थेच्या परिसरात विकास कामे करण्यासाठी लागेल तेवढा निधी आपण देऊ, असे आश्वासनही यावेळी आ. बनसोडे यांनी दिले.
यावेळी गोसेवेसाठी योगदान दिल्या बद्दल समाजातील काही मान्यवरांचा माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नरसिंग कंदले व विक्रम हलकीकर यांनी केले. आभार मोतीलाल डोईजोडे यांनी मानले.