जीवनात कामाला, रामाला आणि दानाला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या : सौ.अयोध्याताई केंद्रे
आज दिनांक २७ जूलै २०२१ रोजी सौ.अयोध्याताई अशोकराव केंद्रे यांचा वाढदिवस.त्या निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर टाकलेला हा शब्दप्रकाश.
मानवी जीवन हे जगातील सर्वश्रेष्ठ जीवन आहे. ज्याला याचे मोल कळाले त्याने आयुष्यातला प्रत्येक क्षण व कण सार्थकी लावल्याचे दिसते. माणसाने सर्वप्रथम आपल्या कामाला महत्त्व दिले पाहिजे म्हणून संतांनी’कर्मे ईशु भजावा’ असे म्हटले तर माऊलीने ‘तया सर्वात्मका ईश्वरा lस्वकर्म कुसूमांचिये वीरा l पूजा केली हो अपारा l तोषालागी ll’ म्हणून कर्माचे महत्त्व विशद केले. सर्व संत हे काम करून ईश्वरभक्ती करत होते.नंतर माणसाने महत्त्व दिले पाहिजे ते रामाला म्हणजेच ईश्वराला.कारण त्याच्या मुळे आपणास हा नरदेह मिळाला. आपण तदनंतर जे काही ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे l उदास विचारे वेंच करीll’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सन्मार्गाने मिळविलेले धन असेल तर त्यातील काही वाटा हा दान म्हणून दिला पाहिजे. ही त्रिसूत्री घेऊन जी माणसे जीवन जगतात ती दिसायला व वागायला जरी सामान्य असली तरी ती असामान्य असतात. अस्या त्रिसूत्रीला जीवनात उतरवून जीवन जगणारे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे मा.सौ.अयोध्याताई केंद्रे होत.
अयोध्याताईंचा जन्म अहमदपूर तालुक्यातील एका छोट्याशा कोळवाडी नामक वाडीत शेतकरी कुटुंबात २७ जुलै १९६९ रोजी वारकरी सांप्रदायावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईवडिलांच्या पोटी झाला.ताईंचा जन्म जणू आई-वडिलांना प्रभू रामचंद्राच्या जन्मभुमीचे अयोध्येचे सुख देऊन गेला असावा म्हणूनच की काय त्यांनी त्यांचे नाव अयोध्या ठेवले. घरातील व गावातील वारकरी संप्रदायाचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर होत गेले. संतांचे हे वचन ‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे lउदास विचारे वेंच करी l’त्यांच्या मनःपटलावर पक्के बिंबले.तसेच ‘बहुत जन्माअंती जन्मलासी नरा l देव तो सोयरा करी बापा ‘हा विचारही त्यांना प्रेरणा देणारा ठरला. संतांनी आपले आयुष्य जसे परोपकारासाठी घालवले तसेच आपणही आपल्या जीवनात परोपकार केला पाहिजे असा विचार त्यांच्या मनात सतत येत राहिला. त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्याच काळात देशसेवेसाठी सैन्यात दाखल झालेल्या अशोकरावांसी त्यांचा विवाह झाला.एकीकडे मनात संत विचारांचे संस्कार तर दुसरीकडे पतीची देशसेवा.याचा संगम घालत त्यांनी हा विचार केला की पती देशसेवा करत आहेत तर आपण समाजसेवा करावी. यातून त्यांनी हळूहळू समाज सेवेला प्रारंभ केला. समाजाच्या विकासासाठी लोकशाही व्यवस्थेत राजकारणाच्या माध्यमातून विविध योजनांच्याद्वारा आपणास वंचितांचा लवकर विकास साधता येईल या उद्देशाने तसेच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा लोकसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या राजकारणात आल्या. तोपर्यंत पती अशोकरावजी ही सैन्याची सेवा करून परत आले होते. त्यांनीही राजकारणाच्या माध्यमातून सेवा करण्याचे ठरवले. त्यापूर्वी त्यांनी व त्यांचे मोठे बंधु अनिरूद्धजी यांनी सैन्यात नौकरी केली असल्यामुळे ठरवले की आपण देशसेवेसाठी भरती होणार -या मुलांसाठी एखादे प्रशिक्षण केंद्र काढावे व त्यातूनच त्यांनी अहमदपूर लगतच साई मिल्ट्री फाउंडेशनची स्थापना केली व दरवर्षी शेकडो विद्यार्थी येथून सैन्यात पाठविण्याची पवित्र काम सुरू केले. राजकारणातही या पती-पत्नींना सत्तेच्या माध्यमातून किती मेवा मिळतो हा विचार महत्त्वाचा वाटला नाही तर यातून आपणास जनतेची किती सेवा करता येईल हे महत्त्वाचे वाटले. सरकारी योजना तर त्यांनी निस्वार्थपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविल्याच पण अनेक ठिकाणी स्वखर्चातून लोकोपयोगी कामे केली. त्यामुळे अयोध्याताईंना राजकारणातील केंद्रेवाडीचे उपसरपंच, सरपंच, किनगाव गटाच्या पंचायत समिती सदस्या, खंडाळी गटाच्या पंचायत समिती सदस्या, नंतर अहमदपूर पंचायत समितीच्या सभापती अशा विविध पदांवरती काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी या संधीचे सोने केले. सभापतीपदी असताना त्यांना मिळणारे १०,००० रुपये मानधन त्यापैकी ५,००० रुपये त्यांनी सुखमनी वृद्धाश्रमास दान देण्याचा निर्णय घेतला तर उरलेले ५,००० रुपये अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी देण्याचे निर्णय घेतला व शेवटपर्यंत पाळला. खऱ्या अर्थाने ‘जे का रंजले गांजले l त्यासी म्हणे जो आपुले l तोचि साधु ओळखावा l देव तेथेची जाणावा ll या संत तुकारामांच्या अभंग उक्तीप्रमाणे त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून रंजल्या-गांजल्याची सेवा करणे आरंभिले.
त्यांच्या सामाजिक कार्याचे वर्णन एका लेखात मावेल इतके छोटे नाही. ते खूप मोठे आहे. ताई या धनापेक्षाही मनाने मोठ्या आहेत. समाजात ताई पेक्षा धनवान खूप असतील पण दानवान व गुणवान फार कमी दिसतात. १७ मे २०१७ रोजी आपले पती अशोकरावजी व कुटुंबीयांच्या मदतीने त्यांनी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा हा भव्यदिव्य स्वरूपात घडून आणला त्यात गरिबांच्या नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले (रुखवत )यात १०२ मुलींचा विवाह सोहळा संपन्न केला. तसेच त्यांनी १९ अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन,शिक्षण व नंतर विवाह लावले या कामी ताई या मुलांसाठी अनाथांची आई सिंधुताई बनल्या.पंचक्रोशीत दुष्काळाच्या झळा जाणवू लागताच या मातेच्या मनाला मायेचा पाझर फुटला व त्यांनी माणसांना या काळात मदत तर केलीच पण या माऊलीने पशुंसाठी चारा छावण्या स्वतःच्या पैशातून उभ्या केल्या व याचे उद्घाटन तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले.त्यावेळी फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणाले की महाराष्ट्रात एकच चारा छावणी असी आहे की जी स्वखर्चातून उभी राहिली आहे. यातूनच ताईंचे मोठेपण दिसून येते. महिलांना सक्षम करण्याचा मार्ग म्हणजे बचतगट.ही बचत गटाची चळवळ विस्तारित करून त्यांच्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली.तालुक्यातील ३०,००० महिलांचा अपघात विमा त्या भरतात. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले आहेत.शासकीय योजनेतून ५०० मुलींना सायकलींचे वाटप केले आहे तर २५ अपंगांना मिरची कांडप यंत्राचे वाटप केले आहे.जे लोक अनाथ, अपंग आहेत जे लोक शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांना मोफत भोजनाची व्यवस्था करून खऱ्या अर्थाने धार्मिक कार्य त्या करताना दिसतात. हे कार्य अव्याहतपणे अनेक वर्षे त्या करत आहेत. अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अनेक वेळेस आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते.त्याच्या मनात नैसर्गिक आपत्तीमुळे जीवन संपवण्याचा विचार येऊ नये म्हणून त्या अशा नैसर्गिक संकटाने पीडित व्यक्तीच्या घरी भेट देऊन त्यांना संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य पुरवितात. त्यातूनही एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे कळले तर त्यांच्या मनाला फार वेदना होतात कारण त्या अत्यंत हळव्या मनाच्या आहेत. अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाला नुसती सांत्वना देत नाहीत तर सर्वतोपरी मदत करतात. मी ज्या गावात राहतो त्या देवकरा या गावापासून अहमदपूरला येणा-या मुख्य महामार्गावर व अन्य ठिकाणी त्यांनी स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावे त्यांच्या स्मरणार्थ २५ प्रवासी निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे १४७ अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणही त्यांनी अनेक गावात केले आहे. राजकारणातील नेतृत्व करणारे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार ही त्यांनी केला आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात गुणानुक्रमे चांगले गुण प्राप्त करणाऱ्या व विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ही ते दरवर्षी घेतात व त्यातून या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती त्या कौतुकाची थाप मारतात व त्यांना विविध शैक्षणिक साहित्य पुरवितात. त्यांनी अमदपुरकरांसाठी वैकुंठ रथ ही समर्पित केला आहे. सर्वधर्मसमभाव ही वृत्ती या दाम्पत्याकडे पहावयास मिळते.त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या ईद सणाला अहमदपूर अथवा किनगाव येथील मुस्लिम भगिनींना साड्या व फराळाचे वाटप करण्याचा उपक्रम दरवर्षी त्या करतात तर हिंदू महिलांसाठी मकर संक्रातीला तीळगुळा सोबत कपडे व इतर साहित्याचे वाटप त्या करतात.तर बौद्ध भगिनींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भेटून साड्यांचे वाटप करून मायेचा आधार देतात.
नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे काम हे दांपत्य करताना दिसते. ताईंनी अहमदपूर तालुक्यात सहा ते सात फूट उंचीची फळांची ५१,००० हजार वृक्षांचे रोपण केले. राज्याचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसा पासून ते 26 जुलै माजी मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या वाढदिवसा पर्यंत हा सलग उपक्रम त्यांनी राबविला. त्यांचा या वर्षी ५२ वा वाढदिवस.त्या निमित्ताने वाढदिवस संयोजन समिती वर्षभरात ५२,००० वृक्षांचे रोपण करणार आहेत. जिथे जिथे ताईंचे पाय लागले व परिसरूपी हाताचा स्पर्श झाला. त्या त्या ठिकाणचे सोने झाले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर कुठल्याही शासकीय कार्यालयांची अवस्था काय असते आपण याचा अनुभव घेतोच. तशीच अवस्था अहमदपुर पंचायत समितीच्या सभापती निवासस्थानाची झाली होती पण ताई सभापती झाल्या आणि त्यांचा पाय या वास्तूला लागला आणि या वास्तूचे भाग्य उजळले. या वास्तूने वृक्षवेलींनी हिरवे रूप धारण केले, माणसांनी ही वास्तू गजबजू लागली. एक आदर्श सभापती निवास म्हणून या वास्तूने अल्पावधीतच नावलौकिक मिळविला. तिथे जाण्याचा मलाही अनुभव आला. मन प्रसन्न करणारी ही वास्तू बनली. त्यांनी वृक्ष लागवडीसाठी आपली जन्मभूमी केंद्रेवाडी,कर्मभूमी साई मिल्ट्री कॅम्प, रुध्दापाटी व तालूकाभर अगणित वृक्ष लावले याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली.तसेच कृषी क्षेत्रात सेंद्रिय शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला या सर्व कार्याची दखल घेऊन २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘कृषिरत्न’ पुरस्कार देऊन गौरविले.
ताईंचे धार्मिक कार्य ही वाखाणण्याजोगे आहे.अनेक गावात हरिनाम सप्ताह, शिवनाम सप्ताहाला त्या आवर्जून उपस्थिती लावतात. केवळ उपस्थितीच न लावता भरल्या हाताने जाऊन त्या कार्यात भरीव मदत करतात. अनेक सप्ताहाच्या शेवटच्या महाप्रसादाचे जबाबदारी स्वीकारून अन्नदान करणे, मूर्ती स्थापना कलशारोहण, वस्त्रदान, भजन साहीत्य दान,ग्रंथदान, मंदिर उभारणी, कमान बांधकाम ,महाराज मंडळींचा आदर-सत्कार यापासून सर्व धार्मिक कामात ताई सक्रिय सहभागी असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक आध्यात्मिक क्षेत्रातील महाराजांचे आदरातिथ्य आपल्या आई-वडिलांच्या आदराने त्या पार पाडतात. अनेक धार्मिक कार्यक्रमात कीर्तन, प्रवचन, भागवत कथा,रामकथा यांचे आयोजन करून अन्नदान व ज्ञानदान करण्याचे महत पुण्याचे काम त्या करताना दिसतात. बोलण्यातील मधुरता,वागण्यातील विनम्रता, पतिपरायणता हे काही दैवी माणसांची गुण त्यांच्या अंगी आहेत. मी त्यांना कधी चिडलेले पाहिले नाही. अत्यंत संयमीपणा त्यांच्या ठिकाणी आहे.संयुक्त कुटुंब पद्धतीने त्या सगळ्यांसोबत अत्यंत आनंदाने राहतात.आपल्या माते इतकेच त्या गोमातेवरती प्रेम करतात.त्यांनी शेकडो गाई आपल्या पदरी सांभाळल्या असून त्यांची सेवा त्या जिवापाड करतात. लग्न समारंभात त्या आवर्जून उपस्थित राहून नवदांपत्यास नुसताच फोटो काढण्या पुरती भेट न देता त्या दांपत्याला भर आहेर घेऊन येतात. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हे ब्रीदवाक्य खरे तर या परिवारा जवळ आहे. महाराज मंडळीची पाद्यपूजा करणे, त्यांची ग्रंथतुला करणे,त्यांना वस्त्रदान देणे असे कार्यक्रम त्या नेहमीच करतात.शिवाचार्य महाराज अहमदपुर यांचे आशिर्वाद ही त्यांना प्राप्त होते.
त्यांच्या या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ज्यात ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ ‘अहमदपूर भूषण पुरस्कार’ ‘कृषीमित्र पुरस्कार’ ‘सावित्रीबाई समाज भूषण पुरस्कार ‘संत वाड्मयीन राज्यस्तरीय पुरस्कार’ व अन्य काही पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्या सर्वदूर ‘ काकू ‘ या नावानेच प्रसिद्ध आहेत. ज्या कुठल्या ही चांगल्या कामाला का आणि कु करत नाहीत अशा त्या काकु. आयोध्याताईंनी ‘ बेटी बचाव बेटी पढाव ‘लेक वाचवा’अभियानात ही मोठे योगदान दिले आहे.
‘पाहणारे डोळे मदत करणारे हात’ या कार्यक्रमात महादेव गुरुजी केंद्रे यांच्या सोबतीने त्या दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एक आदर्श शिक्षकांना पुरस्कार देतात तसेच अनाथ, अपंग, निराधार आहेत अशांना काही रक्कम व ब्लँकेट व अन्य साहित्याचे वाटप करतात.
त्यांना हे सर्व काम करणे यामुळे शक्य झाले की त्यांना मिळालेला त्यांच्याच विचारांचा जोडीदार माननीय अशोकाका केंद्रे. काकांनी काकूंना याकामी मदत केली नसती तर हे काम होणे अशक्य होते म्हणून या कामासाठी ताई इतकेच नव्हे तर थोडे अधिकचे श्रेय काकांना द्यावे लागेल. तसेच काकांचे मोठे बंधू अनिरुध्दजी व त्यांच्या सौभाग्यवतीचे योगदानही विसरून चालणार नाही. या चौघांनी चार खांब बनुन मानवतेची ईमारत उभी करण्याचे जे काम आरंभिले आहे.ते वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या या कामाला कोणाची दृष्ट लागू नये असे या वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वराकडे प्रार्थना करतो व ताईला या वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा देतो. ईश्वराने त्यांचे आयू व आरोग्य अबाधित राखावे व त्यांच्याकडून अशीच समाजाची सेवा करवुन घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.
प्रा. डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड.