आरोग्यमय दिवाळी
कोजागिरी पासून शरद ऋतूचा गारवा हळू हळू जाणवू लागत आहे. विंटर क्रिम्स, मॉईस्चरायजर्स, रुक्ष हातांवर ओढल्या जाणाऱ्या रेघांपासून ते दिवाळीच्या ठरलेल्या साबण, गिफ्ट हॅम्पर्स ते फराळासाठी लागणाऱ्या चिवडा मसाले, रेडी मिक्स इथपर्यंतच्या जाहिरातींमधून ही हिवाळा आणि दिवाळीची चाहूल आठवड्याभरापासून लागलीच आहे. शहरी भागांमध्ये आजच्या दिवाळीचं स्वरूप म्हणजे क्लिनींग, डेकोरेशन, शॉपिंग, गेट टूगेदर असा ठरावीक, सिमित झालाय. आपल्या भारतीय संस्कृती मधील सण, वार व त्यातील खाद्यसंस्कृतीची रचना ही आपल्याकडील ऋतू,त्यांच्यात होणारे बदल, व त्यानुसार शरीराच्या बदलणार्या गरजा याला पूरक आहे. वाढलेल्या वात/रूक्ष गुणांसाठी अभ्यंग स्नान ते पित्तशांती साठी तुपात बनविलेले गोड पदार्थ या सगळ्यांमध्ये आरोग्याचा विचार आहे. अभ्यंग किंवा अभ्यंगस्नान हे भिजविलेल्या, तांदुळ, तीळ,उटणे एवढ्यापुरतेच बर्याचदा मर्यादित रहाते. खरेतर अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीरास स्नेहन/मालीश करणे अपेक्षीत आहे. आणि ते फक्त दिवाळीच्या पहाटेपुर्तेच मर्यादित न राहता शरद ऋतुमध्ये नियमीतपणे, जमेल तेवढ्यांदा करणे हितकर ठरत असते. प्रत्येकाने आठवड्यातून एकदा का होईना अभ्यंग करावे , जमले च तर रोज च करावे. आयुर्वेद आणि भारतीय परंपरे अनुसार अंगाला तेल लावून चोळणे आणि जिरवणे व नंतर औषधीद्रव्यांपासून बनविलेले उटणे लावून गरम पाण्याने स्नान करणे याला अभ्यंगस्नान असे म्हणतात. भारतात वेगवेगळ्या भागात तेथील वातावरणाप्रमाणे, उपलब्धतेप्रमाणे तेल बदलतात, केरळात खोबरेल तेल, उत्तरप्रदेश पंजाबात राईच मोहरीचे तेल. महाराष्ट्र गुजरात भागात तिळाचे तेल अधिक वापरले जातात. तळपायांपासून डोक्याच्या केसा पर्यंत अभ्यंग केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होताना दिसून येतात. अधिक श्रम केल्याने आलेला थकवा दूर करते, सततच्या दगदगीमुळे थकवा जाणवत असेल तर तो थकवा दूर होतो.
अभ्यांग केल्याने झोप छान लागते. ज्यांना निद्रानाशाची तक्रार आहे,किंवा झोप लागत नाही,किंवा खूप कमी झोप, झोप सतत मोडते अशा तक्रारी आहेत त्यांच्यासाठी प्रभावी ठरतो अभ्यंग मांसपेशींना बळ मिळतो. तसेच ज्यांना सतत कामामुळे किंवा मानसिक तणावामुळे मांसपेशीही स्ट्रेसमध्ये असतात, जखडल्यासारख्या होतात व वेदनादायी होतात,अशांना अभ्यंगामुळे मांसपेशींना आराम मिळतो. वातावरणातील गारठा वाढल्यामुळे शरीरात रुक्षता वाढते, वातदोष वाढतो,त्याने अनेक तक्रारी उद्भवतात.या तक्रारी कमी करण्यासाठी नियमीत अभ्यंग केल्याने नक्कीच फायदा होतो.जर वेळ नसेलच तर डोके, कान, हात आणि पाय यांना तरी तेल लावावे. अभ्यंग करताना वयाचा विचार असावा. बाळाचे लहान पण हे कफ दोषाचे तर तरुणपणात पित्त दोषाचे अधिक्य, म्हातारपणात वात दोषाचे अधिक्य असते. लहान बाळाचे वाढते वय तसेच मांसपेशी त्वचा यांचे पोषण होण्याच्या दृष्टी ने तेलाची निवड असावी. बला तेल वापरु शकता. तरुणपणी ताणतणाव, वाढता थकवा, हालचाल, यामुळे मांसपेशींना होणारा त्रास दूर व्हावा यासाठीच्या औषधींनी सिद्ध तेल असावे. तर म्हातारपणात वयानुसार कमी होत असलेले बल टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने तेलाची निवड असावी.
आयुर्वेदात त्वचा हे वात दोषाचे स्थान सांगितले आहे. स्वेद बाहेर आणणाऱ्या स्रोतसांच्या अधिक कर्मशीलतेमुळे , वातावरण शुष्क कोरडे झाल्याने, त्वचा कोरडी पडत असते. अंगाला स्नेह चोळून तूप अथवा तेलाच्या स्निग्ध गुणाने त्वचेचा स्निग्ध पणा टिकविण्यास मदत होते.
आपली प्रकृती आयुर्वेद तज्ञाच्या मदतीने तपासून आपल्या प्रकृतीनुसार योग्य ते सिद्ध तेल अथवा तूप निवडून ते अपरोक्ष गरम करावे . सकाळी पोट साफ झाल्यावर सर्व अंगाला मालीश करून स्नेह अंगावर जिरवावा. तळवे, पाय,कंबर, पोट, छाती, मान, चेहरा, डोके या सर्व स्थानांवर खालून वर असा हात फिरवत मालीश करावी. हा विधी हवेचा झोत प्रत्यक्ष येऊ शकणार नाही अश्या जागी करावा.
कोमट तेलाने अभ्यंग केल्याने वात दोषाचे शमन होते .
अभ्यंगाच्या पुढील प्रक्रिया म्हणजे उद्वर्तन. उद्वर्तन म्हणजे सुगंधी/औषधी द्रव्यांच्या चूर्णाने शरीराला चोळणे/घर्षण करणे. शरीराचे स्नेहन झाल्याने क्लेद म्हणून शरीरातील मल रूपी पदार्थ बाहेर पडतो त्याला घर्षणाने त्वचे पासून दूर करायला मदत होते. तसेच या घर्षणाने त्वचे खालील मेद देखील कमी व्हायला मदत होते.
अभ्यांगाचे प्रकार आणि फायदे :
१. शिरोभ्यंग – शिरो भागाला तेल लावणे. ह्या मुळे डोकं शांत होते, मानसिक ताण तणावापासून आराम मिळतो, शांत झोप लागते, मन एकाग्र होण्यास मदत होते.
२. कर्ण पूरण – दोन्ही कानामध्ये तेल लावणे. सोबत दोन्ही कानाच्या पाळीला तेल चोळणे. कान हे ही आयुर्वेदामध्ये वाताचे स्थान सांगितले आहे. शिवाय कान सक्षम राहण्यास मदत होते. शांत झोप लागते.
३. नाभी पूरण – नाभी मध्ये मावेल एवढे कोमट तेल अथवा तूप सोडून मग तेच तेल अथवा तूप पोट आणि ओटी पोटावर हलक्या हाताने चोळून जीरवावे. पोट आणि आसमंतातील अवयवांचे त्रास कमी होण्यास मदत होते, अजीर्ण, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे ह्या तक्रारींवर हमखास चांगला परिणाम दिसून येतो.
४. पादाभ्यंग – दोन्ही पायांच्या तळव्यांना हाताने किंवा कांस्याच्या वाटीने घासून तेल चोळून लावावे. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, नेत्र दृष्टीला बल प्रदान होते, शरीर- मानस ताण तणाव कमी होतो, शरीरातील कोरडेपणा नाहीसा होण्यास मदत होते, झोप शांत लागते.
५. सर्वांग अभ्यंग – पूर्ण शरीराला तेलाने अभ्यंग करावे. या क्रियेत वात दोषाचे शमन होते, त्वचा टवटवीत दिसू लागते, प्रसन्न वाटते, त्वचा ही स्निग्ध आणि कोमल वाटू लागते.
उद्वर्तनाचे फायदे
१. त्वचा कोमल बनते.
२. त्वचेचा वर्ण उजळतो.
३. त्वचेवरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.
४. चेहरा तेजस्वी, प्रसन्ना दिसतो.
५. सुगंधी द्रव्यांमुळे मन प्रसन्न राहते.
६. शरीरातील अनावश्यक मेद (चरबी / वजन) कमी होण्यास मदत होते.
नियमित अभ्यंग स्नान आणि उद्वर्तन / उटणे वापरल्याने प्रत्येकाला तरुण राहणे, ताण तणावमुक्त राहणे आणि प्रसन्न राहणे सहज शक्य आहे.
अभ्यंगामुळे शरिराचा थकवा आणि वात दूर होतो. रंग सुधारण्यास आणि कांती येण्यास साहाय्य होते.
दृष्टी सुधारते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.अभ्यंगामुळे वाताचे विकार, उदा. सांध्यांचे दुखणे, अर्धांगवात, मांसपेशींची अशक्तता इत्यादी विकार क्षीण होतात.
स्नायूंमधील कडकपणा कमी होतो आणि अंग हलके होते.काम करण्याचे सामर्थ्य वाढते. शरीर पुष्ट आणि कणखर होते.
मन प्रसन्न आणि उत्साही रहाते.
नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते.
-स्वेदनकर्म हे कुठल्याही पंचकर्मातील शोधनकर्माच्या पूर्वकर्मात येते. यात सर्वात प्रचलीत असा बाष्पस्वेद steambath. यात व्यक्तीस स्वेदन कक्षात झोपवून अथवा बसवून ,बाष्प यंत्राद्वारे निर्मित औषधीयुक्त पाण्याची वाफ दिली जाते. व्यक्तीला असलेली रोगावस्था, त्याचे बल,वय यानुसार बाष्पस्वेद दिला जातो. स्वेदनाचे काही फायदे पुढीलप्रमाणे
-स्वेदनामुळे शरिरात साचलेले घातक द्रव्य,रोगोत्पत्तीकारक toxins शरीराबाहेर टाकले जातात
-शरीरातील जडपणा कमी होतो,लवचिकता वाढते
-त्वचाविकारांचा नाश होतो व त्वचा कांतीमय होते
-शरीरातील सर्व सांध्यामध्ये सक्रियता वाढते, सांध्यांच्या हालचाली सुलभ होतात
-सर्व स्त्रोतसांचे शोधन होते
रक्ताभिसरण सुधारते
-शरिरात वात संतुलीत राहतो,वातरोगांवर प्रभावी.
आहार-
दिवाळीमध्ये गोड पदार्थांचे वर्चस्व आहेच. आपल्या अग्नीप्रमाणे,पचनशक्तीप्रमाणे पदार्थ खावेत.फक्त तळलेलीच गोड पदार्थांऐवजी भोपळ्याची खीर,दुधीचा हलवा,पेठा, नवीन आलेल्या तांदळाची खीर यांनाही प्राधान्य द्यावे व त्यात साजूक तुपाचा नक्कीच शक्य तसा वापर असावा.
“यावत जिवेत् सुखम् जिवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ” हे आपण ऐकत आलोयंच. तुपाचे फायदे डालड्याला कुठे?
पित्तशांतीसाठी, शरीरातील स्नेह रिफील करण्यासाठी तुपच श्रेष्ठ. रुक्षतेमुळे त्वचानिस्तेज, काळवंडत असेल तर मॉइस्चराइजर विंटरक्रिमच्या आधी तीळतेलाने मालीश करून पहा. चेहरा धुण्यासाठी आपल्या स्कीनटाईपप्रमाणे उटणे,किंवा बेसनपिठ, तांदळाचे पिठ, मसूरडाळीचे पिठ, थोडीशी साय/ गुलाबजल हे
वापरून पहा.
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य व्याधी परमोक्षणम्।
स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व रोग झालेल्याला रोगमुक्त करणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. शरदऋतू हा शरीराचा बल वाढविणारा काळ आहे, पचनतंत्र बिघडणार नाही असा आहार आणि सोसेल असा व्यायाम करावा.
रोग झाल्यावरच चिकित्सेपेक्षा सर्वांनीच जेव्हा शक्य असेल तेव्हा तज्ञांकडून अभ्यंग व स्वेदन करवून घ्यावे. दैनंदिन जीवनात उत्साह कायम राहतो, रोग लांब राहतात, व तारूण्य टिकून राहते. हि दिवाळी सर्वांना आरोग्य, वैभव, समृद्धी देणारी असो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
शतायु भव।
डॉ भाग्यश्री घाळे
शतायु आयुर्वेद क्लिनीक,
उदगीर
तालुकाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल उदगीर
Mob.9765903818