विकासाभिमुख नेतृत्व : आ.बाबासाहेब पाटील
५ डिसेंबर २०२१ रोजी अहमदपूर -चाकूर विधानसभा परिक्षेत्राचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकृर्तत्वावर टाकलेला हा शब्द प्रकाश.)
मानवी जीवनात विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. मग तो विकास बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भौतिक स्वरूपाचा असू शकतो.हा विकास घडविण्यासाठी अनेक पद्धतीने प्रयत्न केले जातात. ज्यात सामाजिक, शैक्षणिक,वैद्यकिय, धार्मिक व राजकीय या माध्यमांचा वापर केला जातो. मानवाचा भौतिक विकास घडविण्यात लोकशाहीत राजकारणाचा सर्वाधिक वाटा दिसतो. काही व्यक्तिमत्त्वे ही या सर्व आयुधांचा वापर करून समाजाचा सर्वांगीण विकास घडविण्याचा प्रयत्न करतात. त्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आमदार बाबासाहेब पाटील होत.
त्यांचा जन्म ०५ डिसेंबर १९५८ रोजी शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर येथे झाला. लहानपणापासूनच समाजसेवा करण्याचा त्यांना छंद होता तसे घरात वातावरण ही होते. वडील, चुलते व त्या पूर्वीपासूनच घरात समाजसेवेचा वसा चालत आलेला. माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे बाळकडू घेतले. सुरुवातीला बी.ए.पर्यंत शिक्षण प्राप्त केले. याच काळात त्यांचे अधिकचे लक्ष आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त शेती करण्याकडे होते. वाचनाची,खेळाची आवड त्यांनी जोपासली व ती वाढविण्याचा प्रयत्न केला. आजही ते हे छंद जोपासताना दिसतात.कोल्हापूर येथे त्यांनी मल्लाचे (कुस्तीचे) प्रशिक्षण घेतले. यामुळे राजकारणातही कुस्तीतले डाव कसे टाकायचे हे त्यांना माहीत असल्यामुळे विरोधकांना चारीमुंड्या चीत करून जनतेच्या आशिर्वादाने त्यांनी राजकारणात २००९ ते २०१४ पर्यंत अहमदपूर -चाकूर विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून नेतृत्व केले व तदनंतर २०१९ पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.याच बरोबर विविध निवडणुकांना ते नेहमीच सामोरे गेले. शिरूर ताजबंद सोसायटीत ते १९८५ ला ते पहिल्यांदाच बिनविरोध निवडून आले. तसेच १९९२पासून सलग १५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.१९९२ ते ते १९९७ या कालावधित लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.एवढेच नाही तर सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँके तीचे ते सलग पाच वेळा संचालक म्हणून १९८७ पासून कार्यरत आहेत.याच बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी १९९०-९१ या काळात कार्य केले तर १९९७-९८ या वर्षात याच बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केले.१९८८ पासून महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून कार्य करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात प्रस्तुत स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत ही त्यांनी विजय प्राप्त करून २००८ ते २०१२ या कालावधीत कार्य केले. याच काळात ते व्यवस्थापन परिषद सदस्य होते.राजकारणात कार्य करताना त्यांच्यावर सतत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे दिसून येते. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक योजना मतदारसंघात खेचून आणल्या असून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.रस्ते, वीज, आरोग्य, पाणी व अन्य महत्त्वाच्या प्रश्नासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांनी अनेकांना वेळोवेळी आधार दिल्याचे दिसते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की ते ‘बहुतजनांसी आधारू’ आहेत. ते प्राधिकृत अधिकारी म्हणून दि. महाराष्ट्र स्टेट को -ऑफ मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई येथे ही कार्यरत आहेत.
याचबरोबर त्यांनी सहकाराच्या माध्यमातून समाज विकासाचा प्रयत्न केल्याचा दिसतो.जसे त्यांनी १९९४ ला महेश अर्बन को ऑप बँकेची स्थापना करून त्याला चालना दिली आहे. तसेच महेश वस्त्र उद्योग उभारून चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. साखर कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघातील ऊस उत्पादकांना न्याय देण्याचे काम सिद्धी शुगर अँड अलाईन इंडस्ट्रीजच्या माध्यमातून २०११ पासून ते चेअरमन या नात्याने करताना दिसतात. शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करण्यास प्रोत्साहन व अन्य सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या जीवनात क्रांती घडविण्याचे काम केले आहे.
शेतीनिष्ठ शेतकरी असा त्यांचा उल्लेख केला तर ते चुकीचे ठरणार नाही.कारण सुरुवातीपासूनच आधुनिक पद्धतीने शेती करण्याची त्यांना आवड आहे.त्यामुळे त्यांनी शेतीत नव तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तंत्रशुद्ध शेती करणारे शेतकरी निर्माण व्हावेत म्हणून शेतीचे शिक्षण देणारे महाविद्यालय व विद्यालय ही उभारले आहेत तसेच त्यांनी शेती क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल १९८८ साली शासनाचा शेतीनिष्ठ व वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त झाला आहे. हे त्यांचे शेती क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाचे फलित होय.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी देत असलेले योगदान हे भरीव स्वरूपाचे आहे.त्यांना माहिती आहे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडविण्यात सर्वात मोठा वाटा शिक्षणाचा असतो. मागासलेल्या मराठवाड्याला तसेच निजामाच्या गुलामीत अनेक वर्षे खितपत पडलेल्या मराठवाड्याला जर खर्या अर्थाने विकासाकडे न्यावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घेऊन आपले काका माजी मंत्री बाळासाहेब जाधव व भगवान सिंग बायस गुरुजी यांच्या मार्गदर्शना प्रमाणे शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. पहिलीपासून ते पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण त्यांच्या संस्थेत दिले जाते. आनेक हायस्कूल्स खेडोपाड्यात उभे करून खेड्यातल्या मुला मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नाही तर वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी ही त्यांनी महाविद्यालये उभी केली आहेत ज्यातून हजारो विद्यार्थी वैद्यकिय शिक्षण घेताना दिसतात. अभियांत्रिकी महाविद्यालय उभे करून अनेक अभियंते निर्माण करण्याचे काम ते करताना दिसतात.आपल्या बाळ भगवान या शैक्षणिक संस्थेच्या वाढीसाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे. संस्थेचे सचिव म्हणून संस्था उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.बाळ भगवान शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून मागील १९८६ पासून अंत्यंत समर्थपणे ते धुरा सांभाळताना दिसतात.त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून संस्थेला अद्ययावत सुविधा पुरविल्या आहेत. तसे शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे १९९०पासून सचिव म्हणूनही त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे राहिले आहे. शिक्षणाची जाण असलेले हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या या शिक्षण संस्थांचा फायदा घेऊन समाजात हजारो व्यक्ती नौकरीच्या माध्यमातून आपल्या पायावर उभी राहिली आहेत. काळाची पावले ओळखून त्यांनी शिक्षण संस्थेत काही नवीन कोर्सेस व इंग्रजी माध्यमाचे शिक्षणही देण्यास सुरुवात केली आहे.
अध्यात्मिक क्षेत्राची आवड ही त्यांना आहे. शिरूर ताजबंद ता. अहमदपूर येथील महेश मंदिर देवस्थान ट्रस्टचे सन २००० पासून ते अध्यक्ष म्हणून कार्य करतात. विविध धार्मिक कार्यक्रमांचे या माध्यमातून आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो. वारकरी संप्रदायावर ही त्यांचे जीवश्चकंठश्च प्रेम आहे. माझे गाव मौजे देवकरा ता. अहमदपूर जि. लातूर येथे त्यांनी हनुमान मंदिराचे सभामंडप व अन्य काम स्वतःच्या खर्चातून केले आहे.या माध्यमातून त्यांनी गावकऱ्यांसाठी मोठी देणगीच दिली आहे. हे एक मला माहित असलेले काम.याशिवाय अनेक गावांच्या मध्ये तसे भरीव कार्य त्यांनी स्वखर्चातून केली आहेत कर्मचाऱ्यावर ते पुत्रवत प्रेम करतात. कुठल्याही कर्मचार्याला कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची नेहमी काळजी घेताना दिसतात.माझे चुलतभाऊ त्यांच्या संस्थेत कार्यरत आहेत. आपल्या कर्मचाऱ्याला मोठे होताना पाहून त्यांना मनस्वी आनंद होतो.त्यासाठी परोपरीने ते त्याला सहकार्य करताना दिसतात. असे संस्थाचालक अलीकडच्या काळात पहावयास मिळत नाहीत परंतु साहेबांकडे हा गुण प्रकर्षाने पहावयास मिळतो. प्रत्येकाच्या सुखदुःखात हिरीरीने सहभाग घेऊन त्याला आपल्या पद्धतीने ज्या स्वरूपाची मदत लागते ती मदत तात्काळ देण्याचे काम करताना मी अनेक वेळेस पाहिले आहे. चांगल्या कामास सढळ हाताने मदत करणे हे जाधव परिवाराचे गुणवैशिष्ट्ये आहे. परवाचेच उदाहरण आहे माजी मंत्री बाळासाहेब जाधव(पाटील) यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमात बाळासाहेब जाधव आणि आमदार बाबासाहेब जाधव (पाटील) यांनी त्यांना पुरस्कार स्वरूपात मिळालेली पंचवीस हजार रुपये व त्यासोबत स्वतःचे पाच लक्ष रुपये टाकून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पाच लाख पंचवीस हजार रुपयांचा चेक विद्यापीठाला त्यांनी सुपूर्द केला व त्यांची गोरगरिबांच्या शिक्षणासाठी असलेली आंतरिक तळमळ तिथे दिसून आली. अशी कितीतरी उदाहरणे या निमित्ताने देण्यासारखी आहेत.या परिवाराचे एक गुणवैशिष्ट्ये हे ही आहे की त्यांचा पूर्ण परिवार संयुक्त असून आजच्या ‘हम दो हमारे दो’ च्या जमान्यात त्यांचा हा आदर्श समाजाने घ्यावा असा आहे. अत्यंत मितभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असून कमी बोलणे काम जास्त करणे अशी त्यांची वृत्ती आहे. विद्वानांची कदर करणे हा त्यांचा अत्यंत वाखाणण्यासारखा गुण आहे. अशा या व्यक्तिमत्त्वावर कितीही लिहिले तरी ते कमी आहे. शब्दाचे पक्के असा त्यांचा नावलौकिक आहे. एकदा शब्द दिला की तो पाळायचाच असे वर्तन त्यांचे दिसते. पक्षनिष्ठा ही त्यांच्याकडे पाहायला मिळते. स्वार्थासाठी पक्ष बदलणे ही वृत्ती त्यांच्याकडे नाही. खोटी आश्वासने देणे त्यांना आवडत नाही. अशा या विकासासाठी सतत धडपड करणाऱ्या निगर्वी व्यक्तिमत्त्वाबद्दल एवढेच म्हणता येईल की ते विकासाभिमुख नेतृत्व करणारे नेते आहेत. त्यांच्याकडून भविष्यात अशी सर्वच क्षेत्राच्या माध्यमातून समाजाची सेवा घडावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व ईश्वर त्यांना दीर्घायुष्य आरोग्य देवो अशी ईश्वराकडे अपेक्षा व्यक्त करून थांबतो.
प्रा.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड
भ्रमणध्वनी-९४२३४३७२१५