उदगीर (एल पी उगीले)
"उदगीर हे केवळ शहराचे नाव नसून ते शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळींचे मुख्य केंद्र आहे. या संपूर्ण चळवळीचे ऊर्जास्रोत आणि प्रेरणास्थान डॉ. ना. य. डोळे होते. त्यांनी निर्माण केलेला विचार आणि सामाजिक मूल्यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल," असे गौरव उद्गार राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ विचारवंत दिगंबरराव बुरसपट्टे यांनी काढले.
स्थानिक साने गुरुजी विद्यालयात आयोजित डॉ. ना. य. डोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी आणि डॉ. ना. य. डोळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. डॉ. डोळे सरांच्या स्मृती जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी डोळे परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी वक्त्यांनी डॉ. डोळे सरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अलौकिक योगदानावर, त्यांच्या ध्येयवादी जीवनशैलीवर आणि विद्यार्थ्यांवरील संस्कारांवर सखोल प्रकाश टाकला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून ज्योतीताई डोळे, प्राथमिक विभागाच्या प्र. मुख्याध्यापिका अनिता आकडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुशांत कोंडेकर, तसेच जशन डोळे व सई डोळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास खिंडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनील कल्लूरकर यांनी मानले.













Responses (0 )