लातूर (एल पी उगीले) बाजार समित्या, ग्रामीण चौक आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये सुरक्षित डिजिटल बँकिंगबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला असून अनेक गावांमधून ही मोहीम राबवली जात आहे.
दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे स्वरूप बदलत असून, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १ ऑक्टोबरपासून संपूर्ण जिल्ह्यात ‘सायबर जनजागृती महिना’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत आज, ९ ऑक्टोबर रोजी ‘व्यापारी व कृषी फसवणूक सुरक्षा अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या माध्यमातून व्यापारी, शेतकरी, शेतमाल खरेदी-विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये येणारे नागरिक तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सुरक्षित डिजिटल बँकिंगवर भर
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्या, ग्रामीण भागातील प्रमुख चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी संवादात्मक जनजागृती उपक्रम आयोजित करून सुरक्षित डिजिटल बँकिंगचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. यूपीआयद्वारे होणारी आर्थिक फसवणूक, बनावट पेमेंट स्क्रीनशॉट, संशयास्पद लिंक, अनोळखी व्यक्तींनी पाठवलेले संदेश तसेच घातक मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.
याशिवाय ग्रामपंचायत कार्यालये, स्थानिक नागरी प्रभाग कार्यालये आणि अन्य प्रमुख प्रशासकीय ठिकाणी भेटी देऊन सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहार करताना कोणती खबरदारी घ्यावी, आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता कशी जपावी आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास काय करावे, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
अज्ञानाचा फायदा घेऊन होते आर्थिक फसवणूक
अनेक नागरिकांना डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे सायबर भामट्यांकडून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ तांत्रिक उपाययोजना पुरेशा नसून, प्रत्येक नागरिकाने सायबर सुरक्षेचे प्राथमिक नियम समजून घेणे गरजेचे आहे. जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लातूर पोलीस दल प्रयत्नशील आहे.
नागरिकांनी लक्षात ठेवाव्यात या महत्त्वाच्या गोष्टी :
- यूपीआय पिन, ओटीपी, एटीएम पिन किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही सांगू नये.
- पैसे प्राप्त करण्यासाठी यूपीआय पिन टाकण्याची आवश्यकता नसते; पैसे पाठवताना योग्य ती खातरजमा करावी.
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच संशयास्पद ॲप्स डाउनलोड करणे टाळावे.
- ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी पैसे पाठवणाऱ्या किंवा मागणाऱ्या व्यक्तीची खातरजमा करावी.
- सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
सायबर सुरक्षिततेसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित डिजिटल व्यवहारांची सवय लावणे आणि फसवणुकीच्या संभाव्य प्रकारांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. व्यापारी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी या जनजागृती उपक्रमाचा लाभ घेऊन स्वतःसह इतरांनाही सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूक करावे, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.














Responses (0 )