उदगीर (प्रतिनिधी) सध्या पुण्यामध्ये सुरू असलेल्या एमपीएससी परीक्षा पद्धती तसेच पेपर फुटी आणि घोटाळ्याच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदरील आंदोलन हे रास्त आणि हक्कासाठी आहे. विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत, देशाचे भवितव्य आहेत. असे असताना त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी भाजपच्या एका युवा कार्यकर्त्याकडून उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा घाट घातला आहे. भाजपचा हा घाट हाणून पाडला पाहिजे. विद्यार्थी आपल्या भवितव्याच्या दृष्टीने नियोजन शून्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत, सदरील आंदोलनाच्या संदर्भामध्ये कोर्टाने देखील हक्कासाठी आंदोलन करता येते असा इशारा दिला आहे. तरी देखील काही टुकार प्रवृत्तीचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना बदनाम करत आहेत, हे थांबले पाहिजे. असे विचार युवा नेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहेत.
पुणे येथील एस एम जोशी पुलाजवळ रस्त्यावरच विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सदरील आंदोलनाच्या संदर्भामध्ये विवेकानंद पाटील यांनी महाऊर्जा व परीक्षा प्रक्रियेतील त्रुटीच्या संदर्भामध्ये आवाज उठवला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबात दाखवून आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थिती नोंदवलेली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी देखील या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. असे असताना सुद्धा हे आंदोलन राजकीय आहे, असे म्हणणे म्हणजे निव्वळ पोळकटपणाचे आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे तसेच मराठा आरक्षणांचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे, आणि शासनाने तात्काळ एम पी एस सी चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी केलेली आहे.
परीक्षा पद्धतीतील विविध मागण्याच्या संदर्भामध्ये हे आंदोलन चालू आहे. त्यामुळे या प्रक्रियेला कारणीभूत असलेले अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. असा निर्धार युवकांनी घेतलेला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. योग्य आणि हक्काच्या मागणीसाठी जर कोणी आंदोलन करत असेल तर सदैव आपण त्यांच्या पाठीशी आहोत. असेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी जाहीर केले आहे.














Responses (0 )