भाषेपेक्षा नाविन्यतेला पेटंटमध्ये महत्त्व – प्राचार्य डॉ.एम.एम.बेटकर
उदगीर : शैक्षणिक, सामाजिक, कृषी व आरोग्याच्या स्वास्थ्यासाठी पेटंटला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पेटंटमुळे माणसाची उच्च प्रतिमा तयार होते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात संशोधन करणे गरजेचे आहे. पेटंटमध्ये भाषा महत्त्वाची नसून नाविन्यपूर्ण शोध महत्त्वाचे आहे असे विचार प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने बौद्धिक संपदा हक्क आणि पेटंट दाखल करणे या विषयावर गुगलमीट द्वारे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे
प्र.प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे तर प्रमुख वक्ते म्हणून औसा येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एम.बेटकर उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय आयक्यूएसी समन्वयक डॉ.सुनिता लोहारे यांनी करून दिला.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ.बेटकर म्हणाले, समाजहित लक्षात घेऊनच पेटंटला मान्यता दिली जाते. संशोधनातून निर्माण झालेल्या वस्तूमुळे समाजाची पिळवणूक होत असेल, तर अशा पेटंटला परवानगी दिली जात नाही. मानव, पशू -प्राणी,वातावरण,पर्यावरण व आरोग्याची हानी होणार नाही याची काळजी पेटंट देत असताना घेतली जाते. पेटंट विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासक यांनाच मिळतात किंवा पेटंट साठी त्यांनीच प्रयत्न करू शकतात असे नाही, तर असूशिक्षित किंवा कोणत्याही क्षेत्रातील माणसांनी जर नवीन शोध लावलेला असेल, तर त्यालाही पेटंट मिळू शकतो. यावेळी त्यांनी पेटंटचे अधिकार व फायदे काय असतात, कोणकोणत्या विषयावर पेटंट घेतले गेलेले आहेत, कॉपीराईट काय आहे, कशाचे पेटंट घेतले जाते व घेता येत नाही यासंदर्भात विस्ताराने पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे म्हणाले, पेटंट साठी अभ्यासकाला स्वतःला वाहून घ्यावे लागते. सतत नाविन्यतेचा शोध घ्यावा लागतो. उत्तम रिसर्च करणाऱ्यांनाच पेटंट मिळत असतात.
सदरील वेबिनारला प्राध्यापक, संशोधक व कर्मचारी उपस्थित होते. या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य
डॉ. अप्पाराव काळगापुरे, संयोजन समितीतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मनोहर भालके तर आभार प्रा.जे.डी. संपाळे यांनी मानले.