‘ज्ञानपंढरी’ बरोबरच अहमदपूरचे महात्मा फुले बनले ‘ग्रंथ पंढरी’चे महाविद्यालय…!
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे वय हे अवघे २२वर्षाचे. परंतु, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात बद्दल नेहमीच चर्चेत असते. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या शैक्षणिक हितासाठी दृष्टीकोनातून व शिस्त प्रिय नेतृत्वातून या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातील व छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातील ग्रंथांची संख्या २३हजार ३२० एवढी असून विद्यार्थ्यांना हवी ती पुस्तके उपलब्ध आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ; गुणवत्ता, सामाजिक कार्य, राष्ट्रीय जडण घडण संबंधी कार्य, पर्यावरण संवर्धन, क्रीडाक्षेत्र, सांस्कृतिक चळवळीत वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवितात. त्याचाच एक भाग म्हणजे, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रंथालय समृद्ध करण्याबरोबरच वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी लोकसहभागातून ग्रंथसाठा जमा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. हा उपक्रम नसून वाचन चळवळच होती.
अहमदपूर शहराह देगलूर, बैंगलोर, लोहा, कंधार, देगलूर, नांदेड, लातूर,उदगीर आदी परिसरातील ग्रंथप्रेमींना संपर्क करून प्रत्येकी ७५ ग्रंथांची मागणी करण्यात आली. या परिसरातील ७५ ग्रंथ प्रेमींनी महाविद्यालयाला प्रत्येकी ७५ ग्रंथ भेट दिले.काहींनी आपल्याकडे असतील तेवढी ग्रंथ दिली. प्रथम स्वतः केले नंतर इतरांना सांगितले या उक्तीप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी १ हजार १११ ग्रंथ भेट दिली. तसेच, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी ही प्रत्येकी ७५ ग्रंथ भेट देऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५०० ग्रंथ जमा केले. तसेच नांदेड येथील इसाप प्रकाशनाने सवलतीत ग्रंथ तर दिलेच दिले शिवाय विश्वकोशासह ऐतिहासिक, सामाजिक चरित्रात्मक ग्रंथही भेट म्हणून या महाविद्यालयास दिले.तसेच अहमदपूरसह, लातूर, उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांनी ग्रंथभेट दिले. तसेच मुंबई येथील सिद्धिविनायक पुस्तक पेढीकडून ४ हजार ग्रंथ महाविद्यालयास मिळाली आहेत. आज मितीला फुले महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये विविध विषयाची जवळपास २३ हजार ३२० ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये लोकसहभागातून नवीन आलेली ग्रंथसंपदा १ हजार ७५० तर छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची ग्रंथसंपदा आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ग्रंथालयाचे ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे म्हणाले की, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीतच आमचे ग्रंथालय ग्रंथांनी समृद्ध झाले असून, वायफायच्या माध्यमातूनही आम्ही ई-बुक्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतो. विद्यार्थ्यांना जे पुस्तक हवे आहे ते पुस्तक तात्काळ मिळवून देण्यात साठी महाविद्यालयाचे प्रशासन तत्पर असते. या तत्परतेतून आज आमच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे ग्रंथालय ग्रंथांनी समृद्ध झाले आहे. आजच्या मोबाईलच्या युगामध्ये वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे हा आरोप आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वाचनाच्या आवडीकडे पाहिले असता ते फारसे पटत नाही.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रंथ वाचनातून जे ज्ञान मिळते ते आभासी माध्यमाच्या पद्धतीतून मिळत नाही. म्हणून ही वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून ग्रंथालय समृद्ध करण्याबरोबरच वाचन चळवळ निर्माण करण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे, यासाठी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव , सहसचिव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य पार पाडता आले असेही ते म्हणाले.