नवीन शैक्षणिक धोरणात भाषा सदृढ होण्यासाठी परिषदेची आवश्यकता – कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

नवीन शैक्षणिक धोरणात भाषा सदृढ होण्यासाठी परिषदेची आवश्यकता - कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

देवनी (रणदिवे लक्ष्मण) : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भाषा सदृढ होण्यासाठी परिषदेची आवश्यकता आहे. इतर विषयापेक्षा मराठी भाषेमध्ये चर्चासत्र घेणे हे अत्यंत अवघड आहे, राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून हे काम या महाविद्यालयाने यशस्वीपणे केले. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. कै. रसिका महाविद्यालयातील मराठी विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘साहित्य समीक्षा व मराठी साहित्य’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष गोविंदरावजी भोपणीकर उपस्थित होते. या परिषदेचे बीजभाषक म्हणून डॉ.पी. विठ्ठल (सदस्य, मराठी अभ्यास मंडळ स्वा.रा.ती.म विद्यापीठ,नांदेड), प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू मधुकर गायकवाड, संस्थासचिव गजाननजी भोपणीकर , प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, समन्वयक डॉ. प्रशांत भंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतानाप्रा.डॉ.प्रशांत भंडे यांनी परिषदेच्या आयोजना मागची भूमिका विषद केली. लेखक, वाचक आणि समीक्षक या तीन घटकांनी मिळून साहित्य व्यवहार परिपूर्ण होत असतो. या तिन्ही घटकांना एकत्र साधण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून केले आहे. परिषदेसाठी महाराष्ट्र,तेलंगणा कर्नाटक राज्यातून १४० हून अधिक शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. हा एक उच्चांक असल्याचे प्रतिपादन केले. हे शोध निबंध स्मरणिकेच्या तीन खंडामधून प्रकाशित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी प्रास्ताविकातून दिली.

या परिषदेचे बीज भाषण डॉ.पी. विठ्ठल यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, समीक्षेमुळे वाचकांचा नवीन वाङ्मयीन दृष्टिकोन तयार होतो. साहित्य समीक्षा ही अंतिमतः मानवी संस्कृतीची समीक्षा असते. समीक्षेमुळे वाचकांची अभिरुची समृद्ध होते. आजच्या काळात गंभीर साहित्य समीक्षा नाहीशी होत आहे. आजकाल समीक्षकाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. सांस्कृतिक व्यवहाराला समृद्ध करणारे लेखक आपल्याकडे खूप आहेत, पण त्या लेखकांची गंभीरपणे नोंद घेणारा समीक्षा वर्ग अल्प प्रमाणात आहे. ज्या समाजात समीक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तेथे सांस्कृतिक व्यवहार निकोप होत असतो, जोपर्यंत आपण आपल्या लेखकांना समजून घेणार नाही, तोपर्यंत आपले लेखक आपली कक्षा ओलांडून अन्य भाषेत लेखन करू शकणार नाहीत. म्हणून अशा लेखकांना समीक्षकांनी आधार देण्याची आवश्यकता आहे. साहित्य समीक्षा ही पूर्वग्रह दूषित नसावी. तटस्थपणे सांस्कृतिक व्यवहार समजून घेणाऱ्या समीक्षकाची आज गरज आहे, असे ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर (मराठी विभाग प्रमुख, दयानंद कला महाविद्यालय, लातूर) यांनी रसिका महाविद्यालयाने ग्रामीण भागामध्ये परिषद घेणे हे अत्यंत अवघड कार्य उत्तमपणे केले आहे, असे प्रतिपादन करून परिषदेच्या माध्यमातून साहित्याच्या चिंतकांना एकत्र केल्याबद्दल प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांचे कौतुक केले.स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुकर गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ‘साहित्य समीक्षा व मराठी साहित्य’ या शोधनिबंध स्मरणिकेचे प्रकाशन कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदरावजी भोपणीकर उपस्थित होते. त्यांनी या महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा आणि प्राध्यापकांच्या दर्जेदार संशोधनासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन केले. तसेच या परिषदेसाठी उपस्थित सर्व प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या शुभ हस्ते स्वा. रा. ती. म. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या प्रा. डॉ पी. विठ्ठल, प्रा. डॉ. कांत जाधव, प्रा. डॉ. संजय बालाघाटे यांचा सत्कार करण्यात आला.

या परिषदेतील दोन सत्रांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागातून उपस्थित असलेल्या संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी शोधनिबंधाचे वाचन केले. पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. अंकुशकुमार चव्हाण(लातूर) व दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. तुषार चांदवडकर (नाशिक)यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुलोचना डेंगाळे यांनी केले. आभार डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी व्यक्त केले.परिषदेचा समारोप कार्यक्रम संस्थासचिव गजाननजी भोपणीकर यांच्या अध्यक्षतेखाली व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आला. परिषदेत सहभागी सर्व संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी परिषदेत सहभागी प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या, यावेळी प्रा.अंगद भुरे म्हणाले, “प्रत्येक संशोधकांमध्ये उत्सुकता निर्माण करणे आणि त्यांना प्रेरणा देण्याचे काम या परिषदेने केले आहे. या परिषदेसाठी १४० शोधनिबंध प्राप्त होणे हे एक आश्चर्य आहे. ही परिषदेच्या यशाची खूप मोठी बाब आहे.प्रा. डॉ. बालाजी भंडारे म्हणाले, “महाविद्यालयाच्या नावातच रसिका आहे. इथल्या सर्व प्राध्यापकांनी प्रत्येक कामात रस घेऊन केले आहे. उत्तम आदरातिथ्य केले. सर्वच बाबतीत योग्य नियोजन केले.म्हणून ही परिषद सर्व गोष्टींमध्ये अतिशय उत्तम ठरली आहे. आमच्या पुढे परिषदेचे आयोजन कसे करावे याचा आदर्श या परिषदेतून आम्हाला मिळाला आहे. या परिषदेत प्राप्त झालेले १४० लेख हे प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांच्या वैयक्तिक कार्याचे फलित आहे. इथे सर्व वक्ते चांगले आहेत. त्यांनी अत्यंत उत्कट विचार मांडले आहेत. आणि यातून ज्ञानाची ज्योत जागृत करण्याचे काम या परिषदेने केले आहे.प्रा. राजू मोरे म्हणाले ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणे हे अत्यंत कठीण काम आहे, पण ते काम अतिशय उत्तमपणे या महाविद्यालयाने केले आहे. या परिषदेचे अत्यंत देखणे रूप इथे आम्हाला पाहायला मिळाले.समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांनी केले. ही परिषद यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.

About The Author