वाचता येतं पण वाचत नाहीत… अशांपर्यंत वाचन संस्कृती रूजवण्यासाठी ग्रंथालय काम करते

वाचता येतं पण वाचत नाहीत... अशांपर्यंत वाचन संस्कृती रूजवण्यासाठी ग्रंथालय काम करते

२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या प्रा. प्रमेश्वर इंगळेंशी बातचीत

अहमदपूर, ( गोविंद काळे ) : वाचता येत नाही, वाचनं शक्य नाही त्यांच्या पर्यंत आणि  वाचता येतं पण वाचत नाहीत… अशा दोघांमध्ये वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी  महात्मा फुले महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग व ग्रंथपाल इ.स. २००९पासून सातत्याने कार्यरत आहे.
     आजच्या काळामध्ये मोबाईल, फेसबुक, इन्स्टाग्राम, यु -ट्युब इंटरनेटचा अतिवापर होत असल्यामुळे ग्रंथ वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु , अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात वाचन संस्कृती जिवंत ठेवून वाचन चळवळ निर्माण करण्याचे कार्य प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
    २३ एप्रिल हा दिवस ३८नाटके लिहिणारा विश्वविख्यात नाटककार विलियम शेक्सपियर यांचा जन्मदिवस व मृत्यू दिवस एकच आहे. आणि हाच दिवस  ‘जागतिक पुस्तक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार महात्मा फुले महाविद्यालयात मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत भाषेच्या साहित्यासह विविध सामाजिक शास्त्राचे १७हजार ५५० ग्रंथ ज्ञान आणि मनोरंजनासाठी विद्यार्थी व वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वाचकांची वाचनाची आवड वाढावी व लेखकांचा सन्मान व्हावा यासाठी ग्रंथ प्रेमींना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी व वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी ग्रंथ भेट देण्याचे अवाहन केले. त्यास अनेक मान्यवर ग्रंथप्रेमींनी सकारात्मक प्रतिसाद देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५०० ग्रंथ महाविद्यालयाला भेट दिली.
    याबरोबरच महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र असून या अध्यासन केंद्राची ग्रंथसंपदा ६५० एवढी आहे, तसेच सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबई यांच्या पुस्तक पिढी योजनेतून १४७५ ग्रंथ महाविद्यालयाला प्राप्त झाले असून, यामुळे महाविद्यालयाचे ग्रंथालय अत्यंत समृद्ध बनले आहे. तसेच प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी नवोदित साहित्यकारांना पुरस्कार सुरू केले यातून ३५० ग्रंथ महाविद्यालयास प्राप्त झाले असून, लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या आमदार निधीतून २०० ग्रंथ महाविद्यालयाला नुकतेच प्राप्त झाले आहेत.
    या ग्रंथांसह महात्मा फुले महाविद्यालयाच्या ग्रंथालयात एकूण १७हजार ५५० ग्रंथ आज वाचकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांनी दिली.
*विविध संदेश घेऊन कार्यरत*
    ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे आमच्या प्रतिनिधीशी पुढे  बोलतांना म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या एकल विद्याशाखेच्या महाविद्यालयात एकमेव आमचे महाविद्यालय ‘जीवनाचा दोस्त पुस्तक’ ,’वाचन म्हणजे हवा’,’ पुस्तक म्हणजे आनंदाचा तास’ ,’वाचन एक अखंड यात्रा’ ,’पुस्तक वाचा हुशार व्हा’ ,’ पुस्तक वाचा जग वाचा’ ,’ पुस्तकं म्हणजे जगाची खिडकी’ , यासारखे कितीतरी संदेश घेऊन गत २५वर्षांपासून  सातत्याने वाचन संस्कृती रूजवते आहे.
   आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य मराठी साहित्याचे जेष्ठ समीक्षक तथा ललित लेखक डॉ. वसंत बिरादार पाटील यांना ग्रंथ वाचनाचा व लेखनाचा छंद असल्यामुळे  त्यांच्या अभिनव संकल्पनेतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा आज आमच्याकडे उपलब्ध आहे.
     या ग्रंथ वाचनाचा विनामूल्य लाभ आम्ही देतो. तसेच विविध पुरस्कार,वाड्.मयीन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शनं भरवून वाचक, लेखक आणि प्रकाशक यांना वाचन संस्कृतीचे बदलते आयाम लक्षात आणून देतो असेही, ते म्हणाले.

About The Author