नांदेड ते लातूररोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर रेल्वेमार्ग तातडीने मंजूर करा
रेल्वे संघर्ष कृती समितीची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला नांदेड ते लातूररोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर या नवीन रेल्वे मार्गाला तातडीने मंजूरी द्यावी सोबतच या भागातील रेल्वेच्या अखत्यारीत असलेले प्रश्न तातडीने सोडवावेत अशी आग्रही मागणी माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे तसेच माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे लातूररोड येथे एका निवेदनाद्वारे केली आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे काल लातूर दौऱ्यावर असताना लातूररोड येथे विशेष रेल्वेने ते स्टेशनवर दाखल झाले असता रेल्वे स्टेशनवर शिष्टमंडळाने ही धावती भेट घेतली. या वेळेस या भागातील रेल्वेच्या अखत्यारीत प्रलंबीत प्रश्ना बाबत रेल्वेमंत्रांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली.
रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,नांदेड ते लातूर रोड या नवीन मार्गाचा फेर सर्व्हे तातडीने करुन या मार्गाला मंजूरी द्यावी,घरणी ऐवजी दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या जंक्शन असलेल्या अष्टामोड येथे नव्याने रेल्वे स्टेशन मंजूर करावे,मूंबई- लातूर-हैद्राबाद व्हाया लातूररोड मार्गे वंदे भारत किंवा राजधानी सारख्या दोन गाड्या चालू कराव्यात,चाकूर ते लातूररोड दरम्यान रेल्वे ब्रीज उभा करावा,लातूररोड रेल्वे स्टेशन ते नॅशनल हायवे पर्यंतचा रस्ता तातडीने दुरूस्त करून घ्यावा,लातूररोड रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची सोय करणे,रेल्वे पोलीस चौकी मंजूर करणे आदी मागण्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
या प्रसंगी रेल्वे मंत्र्यानी सर्व प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे अश्वासन दिले. माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे यांच्या विनंती वरून रेल्वेराज्यमंत्री दानवे पाटील यांनी लातूररोड येथे विशेष रेल्वे थांबवून शिष्टमंडळाला वेळ दिला हे विशेष. या शिष्टमंडळात रेल्वे संघर्ष कृती समितीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, चाकूरचे नगराध्यक्ष कपिल माकणे,भाजपा चाकूर तालूकाध्यक्ष शिवाजीराव बैनगीरे,जि.प. समाजकल्याण माजी सभापती रोहिदास वाघमारे,सिध्देश्वर पवार, निळकंठ मिरकले,पत्रकार भरतसिंह ठाकूर,संतोष अचवले,संदिप अंकलकोटे, अजय भालेराव,त्रीशरण मोहगांवकर आदींसह मराठवाडा जनता परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.