संघर्षाचा महामेरू – धनराज विक्रम गुट्टे
भाजपा नेते व भारतीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मा.धनराज गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षाचा अल्पपरिचय.
भारत सरकारच्या रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सचिव मा.धनराज विक्रम गुट्टे यांचा आज वाढदिवस.धनराज गुट्टे हे नाव आज महाराष्ट्रातील बहुतांश तरुणांना परिचित आहे.युवकांसाठी झटणारा नेता म्हणून आज धनराज गुट्टे यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख होत आहे.त्याचे कारणही स्वाभाविकच आहे,जेथे जेथे समाजबांधवांवर,तरुणांवर अन्याय होतो,तेथे हा लातूर जिल्ह्याचा, अहमदपूर तालुक्याचा सुपुत्र सर्वात अगोदर त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी तयार असतो.
लहानपणापासूनच धनराजभाऊंना राजकारणाची आवड निर्माण झाली होती ती फक्त एका व्यक्तीमुळे ते म्हणजे महाराष्ट्राचे लोकनेते केंद्रीयमंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब.मुंडे साहेबांचा धनराजभाऊंवर लहानपणी एवढा प्रभाव पडला होता की आपल्याला सुद्धा भविष्यात मुंडे साहेबांसारखे राजकारणातच उतरायचे आहे हे त्यांनी तेव्हाच ठरवले होते.वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांना भाजपच्या विद्यार्थी आघाडीचे पद मिळाले होते.वयाच्या 17 व्या वर्षापासून ते आज वयाच्या 34 व्या वर्षापर्यंत जवळपास 17 वर्षे ते भाजपचे एकनिष्ठेने काम करत आहेत आणि राज्यस्तरावर पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
अगणित संकटांचा सामना करत त्यांनी इथपर्यंतचा प्रवास साध्य केला आहे.एका सामान्य कुटुंबात एका शिक्षकाच्या घरात जन्मलेला पोरगा ,येलदरवाडी सारख्या एका छोट्याशा वाडीतून आलेला पोरगा, कसलाही राजकीय वारसा नसताना आज स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीच्या बळावर
भारत सरकारच्या रेल्वे बोर्डाचा सदस्य होतो,ही सामान्य कुटुंबातील तरुणांसाठी प्रेरणादायक गोष्ट आहे.पण येलदारवाडी ते दिल्ली हा त्यांचा प्रवास काट्यांनी भरलेल्या संघर्षाच्या वाटेवरून झालेला आहे हेही विसरून चालणार नाही. तरीही न डगमगता स्वतःच्या आरोग्याची कसलीही पर्वा न करता जर माझ्या समाजबांधवांवर अन्याय होत असेल तर मी शांत बसणार नाही हा ध्यास घेऊन ते आज आपल्या समाजबांधवांसाठी झटत आहेत.त्यामध्ये सामाजिक कामांसाठी अनेक ठिकाणी आंदोलने,मोर्चा,अटक,सुटका ह्या गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो.परंतु ह्या कसल्याही गोष्टीची पर्वा न करता ते त्यांचा कार्याचा ध्यास अविरतपणे सूरू ठेवतात. मग त्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही मुंडे साहेबांच्या चौकांसंबंधी,पुतळ्यासंबंधी वाद असोत की कोणत्याही परीक्षेत समाजबांधवांसाठी आरक्षणानुसार जागावाटपाचा तिढा असो,जेथे जेथे गरज वाटेल तिथे हा अवलिया आक्रमक आंदोलनासाठी तयार असतो.
स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती असो वा पुण्यतिथी महाराष्ट्रात गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंत आणि धुळे नंदूरबारपासून ते सिंधुदुर्ग सावंतवाडी पर्यंत हा मुंडे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता कसलाही स्वार्थ,कसलीही अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने साहेबांची जयंती,पुण्यतिथी साजरी करायला त्या ठिकाणी जातो.म्हणूनच आज वंजारी समाजात ‘समाजभूषण’ ही उपाधी त्यांना लोकांकडून मिळत आहे.हे त्यांच्या 17 वर्षांपासून समाजासाठी केलेल्या कार्याचे फळ आहे.
अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी त्यांचे जाळे निर्माण केले आहे.महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणालाही अडचण आली आणि त्यांनी धनराजभाऊंसोबत संपर्क केला आणि ती अडचण दूर झाली नाही ,असे आजतागायत झाले नाही. कारण त्यांचं संघटनच एवढं मजबूत आहे की त्यांच्या एका फोनवर त्यांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागते आणि समोरच्या व्यक्तीला मदत करते.या 17 वर्षात महाराष्ट्रातील एक ना एक जिल्हा एक ना एक तालुका पालता घालून त्यांनी हे संघटन संपूर्ण महाराष्ट्रात तयार केले आहे.
आज अनेकजण आपापल्या वैयक्तिक कामासाठी मंत्रालयात जात असतात पण प्रशासकीय कामांचा अनुभव नसल्याने त्यांना अनेक अडचणी तेथे उदभवतात.या सर्वांसाठी आता मंत्रालयात सुद्धा धनराज गुट्टे हे हक्काच व्यासपीठ तयार झाले आहे. काम झाल्यानंतर जेव्हा लोक, धनराज भाऊ तुमच्यामुळेच काम झाले तुमचे हे उपकार कधीच विसरू शकणार नाही ,हे उद्गार त्यांच्या तोंडून काढतात तेव्हा हेच उद्गार धनराजभाऊंसाठी अजून काम करण्याची शक्ती त्यांना देतात.
आज संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना सततच्या प्रवासामुळे त्यांना बऱ्याचदा अनेक आरोग्य समस्या उदभवतात.चार चार दिवस दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागते.तरीपण पाचव्या दिवशी हा माणूस लोकांच्या कामांसाठी तयारच असतो.त्यांची हीच काम करण्याची धडपड,जिद्द आणि त्यांचे संघटनकौशल्य पाहून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब,लोकनेत्या पंकजाताई मुंडे या त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवत असतात.आणि धनराजभाऊ सुद्धा त्या जबाबदाऱ्या तितक्याच शिताफीने पार पाडत असतात.
येणाऱ्या काळातसुद्धा त्यांना अशाच जबाबदाऱ्या मिळाव्यात व त्यांनी महाराष्ट्राची सेवा करावी आणि विशेषतः जे तरुण आज त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहेत त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सदैव तत्पर राहोत हीच अपेक्षा.
मा.धनराजभाऊनां निरोगी, आरोग्यसंपन्न दिर्घायुष्य लाभो याच संपूर्ण समाजबांधवांकडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
डॉ.अजय गोपीनाथ दराडे.