मेहुणी मुळे बायको बिघडेल असे त्याला वाटले!! ज्ञानेश्वर ने उषाला रस्त्यातच मारून टाकले!!!
तसे तर तो आपल्या मेहुणी वर बारकाईने लक्ष ठेवून होता. ती आपल्या ऐकण्यात असली पाहिजे. असे त्यांना सतत वाटायचे. काही दिवस तिनेही त्याच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचे ठरवले. मात्र सतत त्याची दादागिरी तिला सहन होत नव्हती. त्यामुळेच थोडी मनमोकळी वागायला लागली. याचा राग त्याला आला. तसेच ती बिनधास्त वागू लागल्याने तिच्यामुळे आपली बायको देखील बिघडून जाईल! या भीतीपोटी,” ना रहेगा बांस न बजेगी बासुरी” या विचाराने त्याने तिला भररस्त्यात चाकूने सपासप वार करून जीवे मारले. याप्रकरणी त्याला नुकतीच लातूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक नवले, त्यांना सहकार्य करणारे पोलिस कर्मचारी नराळे, राठोड यांनी उत्कृष्ट तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. सरकारी पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासल्यानंतर सरकारी वकील एस व्ही देशपांडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
एक वेळ माणसाच्या मनात चारित्र्यावर संशय घेऊ लागला, तर हे संशयाचे भूत कधी मानगुटीवर कधी बसेल याचा नेम नसतो! अगदी बेशरम त्यापेक्षाही जास्त गतीने हे संशयाचे जाळे पसरत जाते. अशा संशयाच्या कारणाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत चालले आहेत. समाजात अशा घटना सतत घडत असतानाही संशयाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडत नाहीत. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
वास्तविक पाहता भारतीय संस्कृती ही विवाह संस्थेवर अवलंबून आहे. असे असले तरीही पती-पत्नीमध्ये जर संशयाचे वातावरण निर्माण झाले तर त्या सुखी परिवाराला सुरुंग लागायला वेळ लागत नाही. एखादी भरल्या अंगाची तरूणी, तीदेखील नाकी डोळी नीटस असेल तर कोणत्याही पुरुषाला सहजच आकर्षित करत असते. तशात जर एखाद्या तरुणीला या नाहीतर त्या कारणाने पती पासून दूर राहावे लागत असेल, तेव्हा समाजातील तरुण तिच्याकडे आशाळभूत नजरेने पाहत असतात. अशा परिस्थितीत तीने थोडेसे खुलेपणाने, मोकळ्या मनाने कोणाशी सहज जरी संवाद साधला तर इतरांचे डोळे लगेच विस्फारले जातात. समाजातील हे चित्र बदलायला हवे. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. मात्र हे सर्वांना कळत असले तरी दुर्दैवाने कोणालाही वळत नाही असेच म्हणावे लागेल. समाजातील भर जवानीत विधवा झालेली स्त्री असेल नाहीतर पतीपासून वेगळे राहणारी तरुणी असेल! तिने शरीर सुखाचा आनंद उपभोगला असतो. तिला त्या सुखाची ओढ देखील असणे नैसर्गिक आहे. तरी देखील अनेक स्त्रिया समाजातील आदर्श संकल्पना आणि सामाजिक जाणीव जोपासत आपल्या मनातील ती ओढ शरीरातच जाळून जगत असतात. बोटावर मोजण्याइतक्या महिला आपल्या मर्जीप्रमाणे मनसोक्त जगतात. पण त्या अपवाद असतात! त्यांना सामाजिक बांधिलकीचे काहीच देणे घेणे नसते. इतकेच नाही तर पत प्रतिष्ठा याचेही त्यांना काहीच देणे घेणे नसते. ज्याप्रमाणे वृक्षाची मुळे पाण्याचा शोध घेत खोलखोल जातात तशाच पद्धतीने एकादी अडचणीतील पडलेल्या काही स्त्रिया प्रेमाच्या ओढीने आजूबाजूला पर पुरुषाकडे आकर्षित होत असतात. प्रेमाचा शोध घेत असतात. मात्र याचा अर्थ सर्व स्त्रिया तशाच असतात असे समजणे देखील चुकीचे आहे. अनेक स्त्रिया या मार्गावर इमानदारीने मेहनत करून जीवन जगण्यात सार्थक समजतात. परंतु दुर्दैवाने अनेक वेळा त्यांच्या प्रमाणिक प्रयत्नदेखील चुकीच्या नजरेने पाहिले जाते आणि बदनाम केले जाते. त्या बिचारीची बाजू विचारात घेणारा कोणीही नसतो म्हणून त्या बदनाम होतात, आणि दुर्दैवाने जर त्यांची बाजू घेण्यासाठी कोणी आला तर मग तिच्या बदनामी वर शिक्कामोर्तब व्हायला वेळ लागत नाही. लातूर शहरात घडलेल्या घटनेला अशाच पद्धतीच्या विचारधारेचा आधार आहे. एखादी तरुणी संशयाच्या भोवर्यात आली की मग तिचे स्वातंत्र्य संपून जाते. तिला दुसऱ्याचे ईशार्यावरच नाचावे लागते.
लातूर शहरात राहणाऱ्या गरीब परिवारातील ही घटना आहे. रोजीरोटीसाठी हाताला मिळेल ते काम करणारे हे कुटुंब! घरी अठराविश्व दारिद्र्य असले तरी त्या पती-पत्नीला तब्बल पाच मुली होत्या. मुलींच्या लग्नाची चिंता कोणत्याही आई-वडिलांना असणे स्वाभाविक असते. तशी चिंता या कुटुंबांना वाटत होती. आपल्याच बरोबरीच्या बिरादरी मधील त्यांनी मोठ्या मुलीचा विवाह मुरुड येथे करून दिला. काही दिवस त्यामुळे त्यांचा सुखाचा संसार चालला. एक मुलगाही त्यांच्या संसारवेलीवर आला. त्यानंतर मात्र पती-पत्नीत मतभेद होऊ लागले, थोडीशी चिडचिडी बनल्यामुळे ऊषाने पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. जवानीत एका चिमुकल्या पोराला घेऊन जावे तरी कुठे? असा प्रश्न होता. तरी हिम्मत करून ती लातूरला आली. आई-वडील राहत असलेल्या कॉलनीत अर्थात मंत्री नगर भागात एका भाड्याच्या खोलीत राहू लागली. धुणीभांडी करून उदरनिर्वाह भागवत होती. या भागात घर काम करत असल्यामुळे ही बराच लोकांच्या ओळखीची झाली होती. ती लोकांशी हसून खेळून बोलत होती. सर्व काही सुरळीत चालू होते. त्याच दरम्यान उषा ची छोटी बहिण मनीषा आणि तिचा नवरा ज्ञानेश्वर काटेकोर हे देखील मंत्री नगर भागातच राहिला आले. ज्ञानेश्वर याने या भागातील लॉंड्रीचे दुकान टाकले. आपली बहिण मनीषा कडे अधून-मधून उषा येऊ लागली, तशी ज्ञानेश्वर आणि उषाची जवळीकता वाढत गेली. उषा च्या पाठीमागे कोणीच नाही म्हणून तिने आपण सांगितले तसेच राहावे. असा ज्ञानेश्वर सांगत होता. काही दिवस उषाला ते बरे वाटले की, ज्ञानेश्वर सांगेल तशीच वागत होती. मात्र तिने कोणाशी बोलू नये, गुमान आपले काम करावे. ही सक्ती तिला बोचू लागली आणि इथूनच मग उषा आणि ज्ञानेश्वर मध्ये वाद सुरू झाला. ज्ञानेश्वरला उषा बद्दल काही लोकांनी चुकीची माहिती सांगितली.ती आवारा आहे. असा त्याचा विश्वास झाला. त्याने आपली पत्नी मनीषाला उषा बद्दल सांगितले. बदचलन असल्याची तक्रार त्यांनी केली होती पण मनीषाला त्यावर विश्वास वाटत नव्हता. ती उषाला चांगली ओळखुन होती. शिवाय तिच्या उदार स्वभावाची तिला माहिती असल्याने ती फक्त ऐकून घेत होती. याच काळात उषाने मनीषाला घरगुती मेस चालू करण्याचा सल्ला दिला. तो सल्ला मनीषाला आवडला, घरबसल्या चार पैसे मिळतात. म्हणून घरीच मेस सुरू केली. मेस सुरू झाल्यानंतर घरी कॉलेजच्या मुलांची ये-जा वाढू लागली. आपण लॉंड्रीवर कामाला गेल्यानंतर तरूण पोरं आपल्या घरी येतात. यामुळे अगोदरच शंकेखोर असलेल्या ज्ञानेश्वरीच्या डोक्यात आता आपल्या पत्नीबद्दल शंका वाटू लागली. उषाने आपल्या पत्नीलाही चुकीच्या मार्गाला अर्थात वाममार्गाला लावले की काय? अशी शंका त्याच्या मनात येऊ लागली. यातच ज्ञानेश्वर आणि मनीषा यांच्यातही रोज रात्री वाद होऊ लागला. वेळप्रसंगी तो तिच्यावर हातही उचलू लागला. तेव्हा शेजारीच असलेली उषा घरी येऊन त्यांचे भांडण सोडवायची. ज्ञानेश्वरला उषाचे घरी येणे हे आवडत नव्हते .तू वाईट चालीची आहेस तू अशी आहेस, तशी आहेस. आता तुझ्या बहिणीला वाईट मार्गाला लावतेस की काय? असे तो फटकळपणे उषाला बोलून दाखवत होता. पण उषा गप्प बसायची. आपल्या पोटच्या पोरासाठी ती हे सर्व सहन करून मूग गिळून गप्प राहायची. मनीषाला दोन लेकर आहेत. त्यांच्या भविष्यासाठी तीने ते चार पैसे मिळवून ठेवावेत असे तिला वाटत होते. म्हणूनच ती मनीषाला खानावळी लावण्याचा सल्ला देत होती. भले ज्ञानेश्वर विरोध करत असला तरीही मनीषाने खानावळ चालू ठेवली.
दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री ज्ञानेश्वर आणि मनीषा मध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण सुरू झाले. विषय तोच चारित्र्यावर संशय घेणे! मेस बंद करणे! वाद चांगलाच वाढला, गोंधळ झाल्याने उषा धावतच मनीषा च्या घरी आली. ते भांडण सोडवले. मनीषाचे सांत्वन केले, पण मनीषा चांगलीच घाबरली होती. आज रात्री उषा वेळेवर आली नसती तर आपली खैर नव्हती. अशी तिला खात्री झाली होती. तीदेखील उषा बरोबर घराबाहेर पडली. मनीषा रात्री गेली ती पुन्हा परत आलीच नाही. उषाने आपल्या बायकोला कुठेतरी पाठवले? त्याचा राग त्याला अनावर होत होता. रात्रभर तो घरात गोंधळ घालत होता. सकाळी सकाळी तो उषा आणि मनीषा चा शोध घेऊ लागला.
सासरवाडी मध्ये जाऊन चौकशी केली. पण रात्री मनीषा इथे आली नव्हती. यावर ज्ञानेश्वरचा संशयाचा पारा चांगलाच वाढला होता. या सर्व प्रकाराचे मूळ उषा आहे. असे म्हणून जर उषाच नाही राहिली तर आपल्या संसारात कुठलाच आडथळा येणार नाही. असे त्याला वाटू लागले. अगोदरच रागाचा पारा तर पाया पासुन मस्तका पर्यंत पोहोचलेला असताना, उषा आणि मनिषा सापडत नव्हत्या. उषा कोणा कोणाच्या घरी धुणीभांडी करते याची माहिती ज्ञानेश्वर ला होती उषा आदर्श कॉलनीत कामाला जाते याची माहिती असल्याने तो हातात सत्तूर घेऊन अर्थात मटण कापण्याचा सुरा आदर्श कॉलनीत दबा धरून बसला. थोड्यावेळात उषा आदर्श कॉलनी येथील एका घरातील काम आटोपून घराबाहेर आली. आदर्श कालणीतील घरातुन आपल्या घरी जाण्यासाठी पायी चालत निघाली होती.
शिकार समोर दिसताच ज्ञानेश्वर मधील सैतान जागा झाला.मोटार सायकल काढली आणि घाईघाईने तिच्यापुढे जाऊन थांबला. अनपेक्षितपणे ज्ञानेश्वर ला आपल्या समोर पाहून उषा गोंधळली. मात्र लगेच तिने स्वतःला सांभाळून घेतले, माझी बायको कुठे आहे ?असे त्याने विचारले. तिने अनभिज्ञता दाखवताच दोघात पुन्हा वाद सुरू झाला. तुच माझ्या बायकोला बिघडवतेस, तुझ्यामुळे आमच्या संसाराचे वाटोळे झाले आहे. असे म्हणतच रागाच्या भरात उषाच्या पोटात, छातीवर, हातावर, गळ्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. सतूर च्या वाऱ्यामुळे उषाच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. गल्लीत गोंधळ झाल्याने बघे जमा झाले. पण कोणालाही या वादात कशाला पडावे? अशी भावना झाल्याने कोणीही मध्ये पडले नाही. परिणामत: उषा जागेवरच मरण पावली. उषा मरण पावली हे पाहिल्यावर ज्ञानेश्वरचा राग शांत झाला. या खून प्रकरणात पोलीस आज नाहीतर उद्या आपल्यालाही शोधून काढणारच! याची खात्री असलेले ज्ञानेश्वर स्वतःहून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हजर झाला, आणि आपणच आपल्या मेहुणीचा खून केल्याची कबुली दिली.
पहिल्यांदा पोलिस स्टेशनमध्ये एकच खळबळ सुरू झाली. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लाकाळ, उपनिरीक्षक घवले, पोलीस हेडकॉन्स्टेबल बिल्लापट्टे ,वाहिद शेख, बेल्लाळे, येनपुरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी अधिक तपास करत होते. दरम्यान या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक नवले, पोलीस अमलदार नराळे, हवालदार राठोड यांनी विशेष सहकार्य करून दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
एल पी उगिले
सुनील आडरंगे