कृषि विकास पॅनलच्या जाहीरनामा बाबत गावागावात आणि मार्केट यार्डात सकारात्मक चर्चा
लातूर (प्रतिनिधी) : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरची निवडणूक – २०२३ ची रणधुमाळी सुरू असून या निवडणूकीत कृषि विकास पॅनलच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या सकारात्मक जाहीरनामा चांगलाच चर्चेत आला असून जाहीरनामातील प्रत्येक आश्वासनांची अमंलबजावणी करण्यात येणार असल्याची ग्वाही, प्रचार सभामधून माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व इतर नेते देत आहेत. त्यामुळे गावपातळीवर तसेच बाजार समिती परिसरात त्या संदर्भाने चांगल्या प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत.
कृषि विकास पॅनलच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आलेल्या जाहीरनामात प्रारंभीच मागच्या कार्यकाळात केलेल्या वचनपूर्तीची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर विदयमान बाजार समितीच्या पुनर्विकासाच्या योजना सांगण्यात आल्या आहेत. एमआयडीसी परिसरात १५० एकरवर आतंरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुवीधासह नव्याने विकसीत होणाऱ्या बाजार समितीची माहिती या जाहीरनाम्यात असून शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, गुमास्ते या सर्व घटकांसाठी राबवण्यात यावयाच्या योजनांचे आश्वासनेही जाहीरनाम्यात समावीष्ट करण्यात आली आहेत. सदररील जाहीरनामा प्रत्येक मतदारांच्या हातात पोहचेल, अशी व्यवस्था कृषि विकास पॅनलने केली आहे. शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी व गुमास्ते यांच्या सुचना घेऊन आगामी काळात राबवयाच्या योजना संदर्भात जाहीरनामात आश्वासन देण्यात आले असल्यामुळे सर्वजण उत्सुकतेने या जाहीरनाम्यावर चर्चा करीत आहेत.
या जाहीरनाम्यात प्रारंभीच वचनपूर्तीमध्ये लातूर उच्चतम कृषि उत्पनन बाजार समितीमध्ये तारण योजना प्रभावीपणे राबविल्याबददल कृषि पणन मंडळाकडून व्दितीय पुरस्काराचा उल्लेख झाला आहे. शेतकऱ्यांच्या मुलीसाठी उभारलेले १८० निवास क्षमतेचे स्वतंत्र, सुसज्ज वसतिगृह, मुरूड उपबाजारपेठेत तारण योजनेसाठी उभारलेले १ हजार मे. टन क्षमेतेचे गोदाम, प्रभावी प्रकाश योजनेसाठी बाजार समिती व उपबाजारपेठेत हायमस्ट दिव्यांची केलेली उभारणी, शेतकऱ्यांसाठी बाजार समिती परिसरात केलेली ५ रुपयात पोटभर भोजनव्यवस्था, कोरोना काळात विलासराव देशमुख वैद्यकीय महाविदयालयास १० व्हेन्टिलेटरचे केलेले लोकार्पन, शेतीमालाची नासाडी होऊ नये म्हणून ५० टक्के अनुदानावर ५४५५ ताडपत्रीचे केलेल वाटप आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवारसाठी ११ लक्ष रु चा निधीची दिलेली देणगी याचा प्रामुख्याने या वचनपूर्तीमध्ये समावेश आहे.
विदयमान बाजार समितीचा पुनर्विकास
एमआयडीसीमधील नवीन बाजारपेठ विकसीत होईपर्यत सध्याच्या बाजारपेठेत मूलभूत सोयीसुविधांचा पुनर्विकास करण्यात येईल असे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. या पुनर्विकासामध्ये मुख्य बाजारपेठ व इतर उपबाजारपेठांमध्ये रस्ते व नाल्यांची पुनर्बांधणी, वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेता भूमिगत वीजवाहीन्या टाकून वीजपुरवठा, मार्केट साफसफाईसाठी विदयमान व्यस्थेचे मूल्यमापन करून नवीन व्यवस्थेची उभारणी, कचरा व्यवस्थापनासाठी अदययावत व्यवस्थेची उभारणी, धुळीवर नियंत्रण मिळवणेसाठी वैशिष्टयेपूर्ण यंत्रणा उभारणी, बाजार समिती परिसरात पाईप लाईन व नळांव्दारे पाणीपुरवठा, आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी शौचालय बांधणी, सीसीटीव्हीची व्याप्ती वाढवून वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण, शेतकरी, व्यापारी व इतर सर्व घटकांसाठी प्रथमोपचार आरोग्य केंद्राची उभारणी, सुरक्षाव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी, वाहन पार्किंगची वाढती गरज लक्षात घेता अतिरिक्त व्यवस्थेची ऊभारणी, राज्यभरातील बाजारभाव कळण्यासाठी ठिकठिकाणी इंटरनेट टीव्हीची उभारणी, बाजर समिती परिसरात मोफत वायफाय, मुरूड येथील उपबाजारपेठेत रेशीमकोष खरेदी केंद्र सुरू करणे आदी प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत.
एमआयडीसी परिसरात १५० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाची अदययावत बाजारपेठ ऊभारणी
माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर येथे एमआयडीसी परिसरात १५० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अदययावत बाजारपेठ उभारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, निवडणुकीनंतर लगेच निविदा निघणार असल्याचे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. या मार्केटमध्ये पहिल्या टप्प्यात १२५० आडत दुकानांची ऊभारणी, धान्य, गूळ, भाजीपाला, फुले व फळे तसेच कडबा मार्केटची स्वतंत्र व्यवस्था, होणार, संपूर्ण बाजार परिसरास संरक्षण भिंत व स्वंयचलित प्रवेशव्दार उभारणी, संरक्षण भिंतीस लागून बाहेरच्या बाजूस ७५० शेतीपूरक व्यवसायाच्या दुकानांची उभारणी, अदययावत प्रशासन कार्यालय इमारत उभारणी व सभागृह बांधकाम, धान्य व गूळ खरेदी तसेच विक्रीसाठी लिलावगृह उभारणी, शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुसज्ज शेतकरी निवास, हमाल, मापाडी, गुमास्ते यांच्यासाठी गृहनिर्माण योजना़, हमाल, मापाडी, गुमास्ते यांना बाजार समितीकडून मोफत वाहनव्यवस्था, स्वतंत्र हमाल भवन, गुमास्ता भवनची उभारणी, शेतीमालाच्या वर्गीकरणानुसार स्वतंत्र पार्कीग व्यवस्था, भाजी, फुले व फळासाठी शीतगृहाची सुविधासह अनेक सुवीधाचे आश्वासन देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी योजना
कृषि उत्पन्न बाजार समितमध्ये विविध सोयीसुवीधा उभारणीच्या आश्वासना सेाबतच ज्याच्या जीवावर बाजार समिती चालते त्या शेतकऱ्यासाठी व शेती विकासासाठी अनेक योजना राबवण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. कृषि परिषद, शेतकरी मेळावे, शिवारफेरी आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पारंपरिक बियाण्याच्या बॅंकेची ऊभारणी, अदययावत कृषि अवजारांची उपलब्धता, सेंद्रींय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन, सेंद्रींय भाजीपाला विक्रीसाठी प्रायोगिक तत्त्वावर डायल फॉर भाजीपाला योजना, कृषि क्षेत्रातील माहिती व घडामोडी कळण्यासाठी कृषि ग्रंथालय, कृषिमाल साठवणुकीसाठी कार्यक्षेत्रात विभागनिहाय गोडाऊन, शेतीमाल वर्गीकरण, स्वच्छता व पॅकेजिंग युनीट, ई मार्केट कृषि माल विपणन सेवा, निर्यात मार्गदर्शन व सुविधा केंद्र, शेतकरी, गुमास्ते, हमाल, माफाडी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्या संबंधी आश्वासन या जाहीरनामात आहे.