धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा लढाईत मतदारांनी आमिषाला बळी पडू नये – माजी आ. भालेराव
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत होत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल केवळ पैशाच्या बळावर निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र आमच्याकडे सज्जनशक्ती आहे, जनशक्ती आहे. सर्वसामान्य मतदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचे चारित्र्यसंपन्न उमेदवार भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या पाठीशी संपूर्ण तालुक्यातील मतदार उभे राहिले आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आम्ही कोणावर टीका करण्यासाठी उमेदवारी दिलेली नाही, तर बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे भले झाले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या पाहिजेत. या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे माजी आ. सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेसाठी माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष बागबंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज चिखले, उदगीर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, दिनेश पाटील तीवटगालकर, मनोहर भंडे, बालाजी गवारे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. याप्रसंगी भगवानराव पाटील तळेगावकर यांनी सांगितले की, मी जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती होतो. तेव्हा केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवल्या, भविष्यात संधी मिळाल्यास ही शेतकऱ्यांसाठीच ही संस्था काम करेल, केवळ पैशाच्या जीवावर या निवडणुका लढण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धनशक्तीच्या आमिषाला मतदारांनी बळी पडू नये. असेही आवाहन त्यांनी केले. तसेच भावी काळातील आपल्या योजनाही त्यांनी स्पष्ट केल्या.