निलंगा येथील वैद्यकीय अधिकारी निलंबित

निलंगा येथील वैद्यकीय अधिकारी निलंबित

निलंगा (नाना आकडे) : लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निलंगा येथील एका  मेडिकल चालकास हाताशी धरून कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी आवश्यक समजल्या जाणाऱ्या रेमडीसिविर इंजेक्शन उपजिल्हा रुग्णालयात असतानाही, बाहेरच्या औषधी दुकानातून खरेदी करायला लावून रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली. शासनाची दिशाभूल केली, प्रशासनाच्या आदेशाचे धिंडवडे काढले! या कारणाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 यासंदर्भात हाती आलेली माहिती अशी की, निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनकर पाटील यांनी निलंगा येथील ठराविक मेडिकल औषधी दुकानातून औषधी आणायला सांगितल्या कारणाने निलंगा तहसीलदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. सद्यस्थितीत निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक लोक या संसर्गाशी लढा देत आहेत. असे असतानांही वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांनी निलंगा येथील महाजन मेडिकल स्टोरला हाताशी धरून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकाला उपजिल्हा रुग्णालयात औषध पुरवठा मुबलक असताना देखील, बाहेरच्या औषधी दुकानातून औषध मागवायला लावून रुग्णांची फसवणूक केली आहे. या घटनेची कुणकुण लागताच तहसीलदार गणेश जाधव यांनी तात्काळ डॉ. दिनकर पाटील व महाजन मेडिकल स्टोअर वर धाड घालून चौकशी केली असता दोनशे पंधरा रुपयांचे बाहेरून औषध आणलेल्या पावत्या सापडल्या. यावरून तहसीलदार गणेश जाधव यांनी गुप्त अहवाल तयार करून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे पाठवला. सदरील अहवालावरून वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी संवेदनशील कार्यात निष्काळजीपणा, कामात टाळाटाळ करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, उपजिल्हा रुग्णालयातील दाखल असलेल्या रुग्णांना औषधे उपलब्ध असून देखील बाहेरून औषधे आणायला सांगणे, रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणे, कोरोना सारख्या महामारीच्या कामकाजात कुचराई करणे. अशा स्वरूपातील शासकीय अधिकाऱ्याला अशोभनीय असलेले वर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 चे नियम तीन चा भंग केल्याचे तहसीलदार निलंगा यांच्या अहवालातील संदर्भ क्रमांक एक अन्वये स्पष्ट झाले आहे. त्यानुसार 27 एप्रिल दोन हजार एकविस पासून डॉ. पाटील यांना निलंबित करून सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

 रेमडीसिवर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा करून वैद्यकीय अधिकारी यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीने अशा परिस्थितीतही गैरकृत्य करणे लाजिरवाणी आहे. निलंगा येथे उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचे 18 रुग्ण दगावली असून त्याचीही सखोल चौकशी करावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या किती रुग्णांनी औषधी बाहेरून खरेदी केल्या? याचीही चौकशी केली जावी, आणि शासकीय कोट्यातील रेमडीशिविर इंजेक्शन बाहेर गेले काय? हेही तपासावे. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

About The Author