हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानास सुरवात
अहमदपूर ( गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून शहरातील बस आगारात शनिवारी (ता. तीन) बस स्थानकावरील स्वच्छतेच्या बाबतीत जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव साजरा करत असताना वरील अभियान संबंध महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य परिवहन मंडळ लातूर धावचे उप अधीक्षक जफर कुरेशी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.रत्नाकर नळेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले तर आगार व्यवस्थापक पृथ्वीराज कोकाटे, वाहतूक अधिकारी संतोषकुमार बिरादार, वाहतूक निरीक्षक चांदमिया देशमुख, वाहतूक निरीक्षक विजयकुमार बनसोडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा.नळेगावकर म्हणाले की रोटरी क्लब, इन्नर व्हील क्लब, लिनेन्स क्लब, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्ये तसेच प्रवाशांच्या सहभागातून बस स्थानकावरील स्वच्छता पूर्णत्वाकडे जाईल. प्रवाशांनी बस स्थानकावरील स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहावे, स्वतः कचरा करणार नाही व इतरांनाही करू देणार नाही अशी भावना प्रत्येक प्रवाशांमध्ये आली तर बस स्थानक हे नेहमीसाठी आपल्या घरासारखे स्वच्छ राहील.
यावेळी बोलताना आगार प्रमुख पृथ्वीराज कोकाटे म्हणाले की बस स्थानकावरील स्वच्छतेसाठी आगाराच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न होणार असून या स्वच्छता मोहिमेत प्रवाशांचा सुद्धा सहभाग असावा. प्रवाशांनी बस स्थानकात थांबल्यावर स्वच्छता बाळगावी, बस स्थानकात कोठेही थुंकू नये, आपल्याकडील असलेले टाकाऊ साहित्य कचराकुंडीमध्येच टाकावे. यावेळी प्रवाशांचे पुष्प व पेढे देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी योगिता बोईनवाड, मीरा बोरोळे, दीप्ती केंद्रे, वाहतूक नियंत्रक व्यंकटराव वाकडे, भागवत कोल्हे, सायस केंद्रे, गोविंद माने, ज्ञानेश्वर अंकलवार, जैनुद्दीन मिर्झा यांची उपस्थिती होती.
यावेळी बस स्थानकामध्ये होणाऱ्या वाढत्या चो-यांचे प्रमाण पाहता राज्य परिवहन लातूर विभागाचे धावचे उप अधीक्षक जफर कुरेशी यांच्या उपस्थितीत पोलीस उपविभागीय अधिकारी मनीष कल्याणकर यांना बस स्थानकात पोलीस चौकी द्यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले.