उदगीरच्या पर्यायी बसस्थानकात गैरसोईमुळे प्रवाशांना दिवसा उन्हाचे तीव्र चटके, संध्याकाळी अवकाळी चे झटके !
उदगीर (एल.पी. उगीले) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे लातूर जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणारे उदगीरचे आगार दुसऱ्या क्रमांकाचे आहे. येथील जीर्ण झालेल्या बसस्थानकाची इमारत पाडून नवीन अद्ययावत बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी पर्यायी बसस्थानक उभारण्यात आले असले तरी अपुरा निवारा व बैठक अव्यवस्थेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पर्यायी बसस्थानकात सोयी – सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसल्याने वाढलेल्या तीव्र उन्हाचे चटके प्रवाशांना सहन करावे लागत आहे. अवकाळी पाऊस आला तर भीजल्याशिवाय प्रवाशांना पर्याय नाही. शिवाय सर्वत्र चिखलच चिखल अशी अवस्था झाल्याने प्रवासी अडचणीत आले आहेत.
बसस्थानक उभारणीसाठी श्रेयवादाची चडाओढ करणारे राजकीय पुढारी नागरिकांच्या या होत असलेल्या हाल अपेष्टा बद्दल उदासीन दिसून येत असल्याने या लोकप्रतिनिधी आणि नेत्याबद्दल जनतेच्या मनात नाराजी पसरत आहे.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील ऐतिहासिक उदगीर शहरात कर्नाटक, तेलंगाना व महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी वर्दळ असते. उदगीरच्या बसस्थानकात दररोज ३० ते ३५ हजार प्रवाशांची आवक-जावक होत असते. उदगीर आगाराला दररोज सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न आहे. परंतु या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. उदगीर बसस्थानकाची ५० वर्षे जुनी व जीर्ण झालेली इमारत धोकादायक झाली होती. जीर्ण इमारत पाडून त्या ठिकाणी बसस्थानकाची नवीन अद्ययावत सर्व सोयी सुविधा युक्त इमारत उभी करण्यात यावी, अशी उदगीरकरांची जुनी मागणी होती. गेल्या सात – आठ वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. नवीन बसस्थानकाच्या इमारत बांधकामाची दोनदा टेंडर प्रक्रिया होऊन कामास शुभारंभ झालेला आहे. नवीन बसस्थानकाची इमारत उभी होत असल्याने बाजूलाच एका पत्र्याच्या शेडमध्ये पर्यायी बसस्थानक सुरू करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाला दरमहा लाखोंचे उत्पन्न देणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एका पत्र्याच्या शेडमध्ये पर्यायी बसस्थानक सुरू करण्यात आलेले आहे. दररोज हजारो प्रवासी या ठिकाणी येत असताना अपुऱ्या पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी अपुरी बैठक व्यवस्था आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो वयोवृद्ध , लहान बालके , महिला प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पत्र्याच्या शेडमध्ये अपुरी जागा व अपुरी बैठक व्यवस्था असल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वाढलेले ऊन आणि वातावरणातील उकाडा यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्थानक परिसरात असलेल्या वृक्षांच्या सावलीचा , बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या दुकानांच्या सावलीला प्रवासी उन्हापासून आश्रय घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर पर्यायी बसस्थानकाला जाणारा रस्ता आणि बसेस थांबणाऱ्या ठिकाणी मजबुतीकरण झाले नसल्याने वाऱ्यामुळे धुळीचे लोळ मोठ्या प्रमाणात उठत आहेत. शिवाय बसस्थानक परिसरात खड्डे असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
उदगीर आगाराला दररोज लाखोंचे उत्पन्न देणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशातून होत आहे. पर्यायी बसस्थानकात सर्व सोयी सुविधा युक्त पत्र्याचे शेड उभारून प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके बसत आहेत. परंतु काही दिवसांवर पावसाळा असल्याने पावसाळ्यातही प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बसस्थानक परिसरात चिखल होत आहे. त्यामुळे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. एका बाजूला महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाकडे महिलांना आकर्षित करण्यासाठी तिकिटामध्ये सुविधा उपलब्ध करून देत आहे, मात्र उदगीर येथील पर्यायी बस स्थानकात मुली आणि महिलांसाठी चांगल्या शौचालयाची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रवासी महिलांचे हाल होत आहेत. वास्तविक पाहता जुने बस स्टॅन्ड पाडण्यापूर्वीच या सर्व सुविधा पर्यायी बस स्थानकाच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र केवळ हे बस स्थानक मी आणले का तू आणले? या गोष्टीचे श्रेय लाटण्यासाठी स्मशान घाईने काम सुरू केल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.