अहमदपूरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा – आ.बाबासाहेब पाटील यांच्या बैठकीत सुचना
अहमदपूर ( गोविंद काळे )शहराचा पाणीपुरवठा
विस्कळीत झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यासंदर्भात आ. बाबासाहेब पाटील यांनी कर्मचाऱ्यांची सोमवारी बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीस तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, माजी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे यांची उपस्थिती होती.
शहर पाणीपुरवठा मागील काही महिन्यांपासून या ना त्या कारणांनी २० ते २२ दिवसांवर पोहोचला. शहरातील प्रत्येक घरी पाण्यासाठी खाजगी टँकर विकत घ्यावे लागत असल्याने कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडत चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाला मानसिक त्रास होत आहे. शहर पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा, या संदर्भात झालेल्या या बैठकीत आ. बाबासाहेब पाटील यांनी शहर पाणीपुरवठ्याचा आढावा घेत मागील बैठकीत झालेल्या मागण्यांची पूर्तता व पाणीपुरवठा वितरणाचे नियोजन याची माहिती घेतली. पाणीपुरवठा संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आ. बाबासाहेब पाटील यांनी या वेळी धारेवर धरत पाणीपुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे, अन्यथा यासंदर्भात अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असून दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
शहरातील स्वच्छतेचे संदर्भातही समाधानी नसून याही संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, असेही ते म्हणाले. बैठकीस शिवाजीराव देशमुख, माधवराव जाधव, प्रशांत भोसले, नायब तहसीलदार डी. के. मोरे, सतीश बिलापट्टे, पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी, लक्ष्मीकांत कासनाळे, अभय मिरकले, डॉ. फुजैल जागीरदार उपस्थित होते.