दलित हत्याकांड विरोधात बहुजन विकास अभियानाचे तीव्र निदर्शने

दलित हत्याकांड विरोधात बहुजन विकास अभियानाचे तीव्र निदर्शने

उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या दलित हत्याकांडाच्या विरोधात बैठक संपन्न झाली. उदगीर शहरामध्ये महात्मा गांधी उद्यानासमोर बहुजन विकास अभियान या सामाजिक संघटनेच्या वतीने पुढाकार घेऊन आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दलित हत्याकांड होत आहेत ही अत्यंत निंदनीय बाब आहे. महाराष्ट्राची खाली मान घालवणाऱ्या ह्या घटना असून राज्य सरकारने तात्काळ याची गंभीरदखल घ्यावी. यासाठी महाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उदगीर मध्ये बहुजन विकास अभियान या सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अक्षय भालेराव यांनी गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे गावातील काही मनुवादी गावगुंडांनी त्यांची हत्या केली, ही घटना ताजी असतानाच, लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे अवघ्या तीन हजार रुपयांच्या व्याजासाठी गिरीधर तपघाले या दलित समाजाच्या व्यक्तीची एका सावकाराकडून व त्याच्या भाच्याकडून डोळ्यात मिरची पूड टाकून रॉडने गंभीर मारहाण करत हत्या करण्यात आली. दिवसेंदिवस दलित हत्याकांडांचे सत्र चालूच असून मुंबई येथे सावित्रीबाई फुले छात्रालयामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका दलीत मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. महाराष्ट्रात दिवसेंदिवस घडणाऱ्या दलित हत्याकांड रोखण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. पीडित कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून एक कोटींची आर्थिक मदत करावी. सदरील प्रकरने जलद गती न्यायालयात चालवण्यात यावित. विशेष सरकारी वकील दिला जावा,पीडित कुटुंबात एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी. पीडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त यांना करण्यात आली आहे. आंदोलन स्थळावर उदगीर शहर पोलिसांनी येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे एकुर्केकर, संजय राठोड, मानसिंग पवार, आकाश कस्तुरे, अमोल सूर्यवंशी,दयानंद सूर्यवंशी, अहमद शेख, बबलू सूर्यवंशी, अरविंद सूर्यवंशी, राजकुमार कारभारी, लक्ष्मण आडे,अनिल भोसले यांच्यासह बहुजन विकास अभियानाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्या मान्य नाही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बहुजन विकास अभियानाच्या वतीने आंदोलन तीव्र करणार असल्याचे यावेळी अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले.

About The Author