विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप, ऊर्जादाई असते – डॉ. तेलगाणे

विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप, ऊर्जादाई असते - डॉ. तेलगाणे

उदगीर (प्रतिनिधी) विद्यार्थी जेव्हा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आपले कौशल्य दाखवतात, त्यावेळी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास भावी वाटचालीसाठी त्यांच्यामध्ये सृजनशील ऊर्जा निर्माण होते. असे विचार सामाजिक प्रबोधनकार तथा स्त्रीरोग तज्ञ डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील ऑक्सफर्ड क्लासेस च्या यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण व सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी शिक्षण तज्ञ श्री पांचाळ, क्लासेसच्या संचालिका यास्मिन शेख, पिंजारी गुरुजी हे मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. शरदकुमार तेलगाने म्हणाले की, बाल वयात आपल्या सद्गुणांचे कुणी कौतुक केले तर ते गुण समाजात मान सन्मान वाढवतात. ही गोष्ट त्या बालमनावर कायम बिंबवली जाते. एका अर्थाने त्या विद्यार्थ्यावर हे संस्कार घडतात आणि अशा संस्कार घडवणाऱ्या सकारात्मक कार्यक्रमासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी पुढे येणे गरजेचे आहे. सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. या युगाला स्पर्धेचे युग असेच म्हटले जाते. त्यामुळे छोटे छोटे यश बालमनावर बिंबवून त्याचा मार्ग सुकर करण्यासाठी कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर देणे गरजेचे आहे. विद्यार्थी हा केवळ पुस्तकी ज्ञानातच रमनारा नसावा, त्याच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण तज्ञांनी त्याचा कल तपासून त्याला योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, याचे कारणच हेच आहे की, शिक्षणामुळे मनुष्य घडत असतो. ते चांगल्या पद्धतीने मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षणाला सुसंस्काराची जोड दिली जावी. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन यास्मिन शेख यांनी केले.

About The Author