शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त कधी लागणार ? कुचकामी ठरलेली सिग्नल यंत्रणा सुरू कधी होणार ?

शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त कधी लागणार ? कुचकामी ठरलेली सिग्नल यंत्रणा सुरू कधी होणार ?

उदगीर (लक्ष्मण उगिले) : उदगीर शहर हे उदागीर बाबा आणि शाहमहमद कादरी यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. असे असले तरीही उदगीर शहराला विशेषतः वाहतुकीच्या संदर्भात शाप आहे की काय? अशी शंका यावी, इतपत सतत बेशिस्त वाहतूक यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला वेळोवेळी सामोरे जावे लागत आहे. त्यात भरीस भर म्हणजे 4 जून2022 रोजी मोठ्या थाटामाटा आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेली सिग्नल यंत्रणा केवळ उद्घाटनासाठीच बसवली होती की काय? अशी शंका येणे इतपत ही यंत्रणा कुचकामी ठरून जवळपास वर्ष होत आले. तरीही या गैरव्यवस्थेकडे ना पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे, ना नगरपालिका प्रशासनाचे! वाहतुकीची कोंडी उदगीरकरांच्या नशिबी कायमचीच आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे. या वाहतुकीच्या कोंडीमुळे जीव गुदमरतोय, मात्र सांगावे तरी कोणाला? अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सिग्नलची मागणी जनतेची होती. ती मागणी अर्थात प्रशासकीय मंजुरी आणि बजेट आ. संजय बनसोडे यांनी मंजूर करून आणले, उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॅप्टन कृष्णकांत चौक, शहर पोलीस स्टेशन समोरील चौक आणि डॉक्टर झाकीर हुसेन चौक (ज्याला पूर्वी उमा चौक म्हटले जात होते) या चार ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले.
मोठ्या उल्हासात आणि उत्साहात त्याचे उद्घाटन झाले. मात्र दुर्दैवाने नव्याचे नऊ दिवस म्हणतात, तसेच या सिग्नल यंत्रणेचे झाले. ती यंत्रणा पुन्हा पूर्वत सुरू व्हावी आणि वाहतुकीची कोंडी सुटून नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षित मार्गक्रमण करता येईल. यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावे लागते. त्यात भरीस भर म्हणजे मुख्य रस्त्याचे काम सुरू झाल्याने खोदकामा दरम्यान सिग्नल यंत्रणा बंद पडल्याचे सांगण्यात आले. आता रस्त्याचे काम पूर्ण होऊन सात-आठ महिने होत आले, तरी देखील सिग्नल यंत्रणा पूर्वत करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी नागरिकांना जीव मोठी धरून चालायला भाग पाडत आहे. इतकेच नाही तर अनेक छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. या बाबीकडे ही म्हणाव्या त्या गांभीर्याने कोणीही लक्ष देत नाही. प्रशासनातील कोणताही अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी हे देखील या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत, आणि वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून पोलीस प्रशासनाकडून ज्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने उदगीर शहरातून जाणारा मुख्य रस्ता वेगवेगळ्या अतिक्रमणाने कायम व्यापला जात आहे. यामध्ये रस्त्यावरील दुकानदाराचे अतिक्रमण, पथविक्रेते, हातगाडी, भाजीपाला विक्रेते आणि काही ठिकाणी दुकानदारांनी आपले साहित्य रस्त्यावर टाकलेले असल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान बालके यांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागते आहे. मात्र निष्क्रिय आणि सुस्त प्रशासन व्यवस्थेला याचे गांभीर्य नाही. केवळ बघ्याची भूमिका घेऊन हे रडगाऱ्हाने रोजचीच बाब झाली आहे, असे समजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे वाहतूक व्यवस्था नियमित करण्यासाठी नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी घोळक्या घोळक्याने चौका चौकात थांबून आपले वेगळेच काम करत असल्याची चर्चा राजरोसपणे होत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण दूर करावे, यासाठी अनेक पत्रकारांनी जवळपास शंभर सव्वाशे दिवस आंदोलन केले, त्याही आंदोलनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.
किमान उदगीर शहरातून मोठी वाहने तसेच अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी आणि ती वाहतूक रिंग रोडने वळवावी. अशी ही जुनीच मागणी नागरिकांमध्ये होत आहे.
उदगीर शहरात एकाच रात्रीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात ट्रॅक्टर चालकाने एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला (ऑटो क्रमांक एम एच 24 इ 59 56) जोराची धडक दिली. यामध्ये प्रवासी शोयब पटेल आणि वीरभद्र संतोष पाटील तसेच ऑटो चालक नसरुद्दीन जावेद फकीर हे गंभीर जखमी झाले होते, जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी वीरभद्र संतोष पाटील (वय सतरा वर्ष) या युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने, रक्तस्त्राव झाला. त्याच्या दोन्ही पायावरून ट्रॅक्टर गेला होता, त्याला पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी फिर्यादी नसरुद्दीन जावेद फकीर या ऑटोचालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गु.र.न. 171 /23, कलम 279, 337, 338 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस (क्रमांक एम एच 24 ए व्ही 80 60) ही नांदेडहून उदगीर कडे आली असता अपघात घडला. या गाडीचे चालक दीपक भिमराव गोरखे यांनी बस निष्काळजी पणाने चालवून अपघात करून शैलेश संजय पाटील आणि त्यांच्या मित्राला धडक देऊन गंभीर जखमी केले. यापैकी शैलेश संजय पाटील या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रितेश राजकुमार कोटलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक दीपक गोरखे यांच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 170 /23 कलम 304 (अ), 279, 337 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रहदारीला शिस्त लावल्या शिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, याचे गांभीर्य प्रशासन आणि घ्यावे. अशी मागणी जनतेतून होत आहे.

About The Author