ग्रामीण हद्दीमध्ये अवैध दारूचा महापूर, दारूबंदी साठी रणरागिनी आक्रमक! तोंडचिर येथे घरात घुसून बाटल्या फोडल्या!!
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुका आणि परिसरातील भागात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. अवैध दारू विक्री बंद करावी, यासाठी महाराष्ट्रीय मराठा पार्टी च्या वतीने पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मात्र या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्याने, तोंडचिर येथील रणरागिणी आक्रमक झाल्या असून अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर मोर्चा नेऊन त्या ठिकाणी असलेल्या देशी दारूच्या बाटल्या फोडण्याचे काम या रणरागिणींनी केले आहे. काही दिवसापूर्वी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कुमठा येथे अशाच पद्धतीने महिलांनी आक्रमक होऊन अवैध दारू विक्री करणाऱ्याच्या घरावर मोर्चा नेऊन त्या ठिकाणावरून देखील अवैध दारू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या दारूच्या बाटल्या फोडण्याचे काम महिलांनी केले होते. अशाच पद्धतीचे निवेदन लोणी येथील ग्रामपंचायत आणि काही समाजसेवकांनी पोलिसांना दिले होते. तोंडार येथील कार्यक्रमात उदगीरच्या आमदारांनाही या अवैध दारू विक्रीच्या संदर्भामध्ये तक्रार केली होती. मात्र इतके सारे होऊन देखील बीट अंमलदार आपल्या चिरीमिरीच्या नादात अवैध दारू विक्रीला पाठबळ देत असल्याची चर्चा खुलेआम चालू आहे. अधिकृतपणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना अशा पद्धतीची अवैध दारू विक्री बंद करावी म्हणून निवेदनही दिले जात आहेत. इतके होऊन देखील अवैध दारू विक्री बंद होत नसल्याने यांना नेमका आशीर्वाद तरी कोणाचा आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. एका बाजूला अवैध धंदे फोपावत आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक अशा अवैध धंद्याच्या विरोधात असल्याचे सांगितले जात आहे. असे असेल तर स्थानिक पोलीस अवैध धंद्यांना का पाठीशी घालत आहेत? हेही समजायला मार्ग नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वतंत्र विशेष पथक असून त्या पथकाच्या मार्फत ग्रामीण भागात धाडी टाकून कारवाई का केली जात नाही? असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. गुन्हे प्रगटी करण्याच्या नावाने पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नेमके काय काम करतात? हा संशोधनाचा विषय बनला आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हे विशेष पथक केवळ वसुलीसाठी ठेवण्यात आले असल्याचा आरोपीही केला जातो आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत असलेला विषय वेगळा, मात्र सर्वसामान्य जनतेला या अवैध धंद्यापासून होणारा त्रास कमी व्हावा. अशी रास्ता अपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांचे आहे.