सावरकर कुटुंबातील महिला संयमी, धीरोदत्त, राष्ट्रभक्त वीरांगनाच होत्या: प्रा. स्नेहल पाठक
उदगीर:(एल.पी.उगीले) ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व त्यांच्या बंधूंचा अनन्वित छळ होत असताना, सावरकर कुटुंबातील महिलांनी डगमगून न जाता, कुटुंबाला तर उभे करण्याचा प्रयत्न केलाच पण सावरकर बंधूंच्या राष्ट्रकार्यात हिरीरीने सहभाग नोंदवला. तिन्ही सावरकर बंधूंच्या पत्नी या खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी, देशभक्त वीरांगणाच होत्या. असे मत प्रसिद्ध साहित्यिका स्नेहलता पाठक यांनी व्यक्त केले.
उदगीर येथील संस्कार भारती च्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात प्रसिद्ध साहित्यिका प्रा. स्नेहलता पाठक यांचे “सावरकरांच्या कुटुंबातील स्त्रियांचे योगदान” या विषयावर व्याख्यान पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्कार भारती उदगीर शाखेचे अध्यक्ष सतीश उस्तूरे होते. व्यासपीठावर भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे होते.
पुढे बोलताना प्रा. पाठक यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे संपूर्ण कुटुंबच स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होते. तिन्ही सावरकर बंधु हे प्रखर राष्ट्रभक्त होते असे सांगत, या बंधूंच्या स्वातंत्र्यांच्या लढाईत तिघांच्याही पत्नीनी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत आपले पती पूर्णपणे सहभागी होत असताना आपल्या संसाराची कसलीही काळजी न करता, स्वातंत्र्यवीरांच्या पत्नीसह त्यांचे बंधू गणेशराव व नारायणराव या दोघांच्याही पत्नीनी एकमेकींना साथ देत कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाठक म्हणाल्या. पाठक म्हणाल्या की, सावरकरांचे थोरले बंधू गणेशराव सावरकर व त्यांच्या पत्नी यशोदाबाईंनी वि. दा. सावरकर यांच्या शिक्षणासाठी मोठी मदत केलीच पण यशोदाबाईं सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठबळ देण्यासाठी अनेक उपक्रमात सहभागी झाल्या. विदेशी वस्तूवर बहिष्कार घालणे, युवतीचे संघटन करणे अशा कामातून त्यांनी राष्ट्रहितासाठी आपले आयुष्य वेचले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक श्रीपाद सीमंतकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अश्विनी निवर्गी यांनी करून दिला. आभार संध्या पत्तेवार यांनी मानले. कार्यक्रमाला संस्कार भारतीचे पदाधिकारी, समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.