चोरीच्या पिकअपसह 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

चोरीच्या पिकअपसह 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील 2 गुन्ह्यासह तुळजापूर येथील एक चोरीचा गुन्हा उघड करण्यात गुन्हे प्रगटीकरण विभागाच्या पथकाला यश आले आहे. लातूर येथील पोलीस ठाणे गांधी चौकच्या पथकाने अवघ्या 24 तासात कारवाई करत गुन्हे उघड केले आहेत.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,दिनांक 14/06/2023 पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल गुन्ह्यातील फिर्यादीने त्याच्या मालकीची पिकअप गाडी पेंड खजूरने भरलेली दिनांक 13/06/2023 ते 14/06/2022 रोजीच्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने सम्राट चौक परिसरातून चोरून नेली आहे. वगैरे फिर्याद दिली त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे गु. र. क्र. 263/23 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा उघडकीस आणने कामी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उप विभागीय पोलीस अधीकारी (लातूर शहर)भागवत फुंदे याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात गुन्ह्यातील अरोपीच्या शोधकामी पोलीस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सम्राट चौक येथून चोरीस गेलेली बोलेरो पिकअप वाहन वासनगाव शिवारात वैराग ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर एका हॉटेलच्या बाजूला लपवून ठेवलेला आहे. अशी माहिती मिळताच सदर पथक वासनगाव शिवारात पोहचून पाहणी केली असता गुन्ह्यात चोरीस गेलेले पिकअप तिच असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला, थोड्याच वेळात त्या पिकअप मध्ये बसताना पथकाने एकास थांबवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता, तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने काल रात्री सम्राट चौक परिसरातून सदरचे पिकअप वाहन चोरी केल्याचे सांगून पोलीस ठाणे शिवाजीनगर व पोलीस ठाणे तुळजापूर येथूनही चारचाकी वाहन चोरल्याचे सांगून त्याने लपवून ठेवलेले वाहन दाखवून दिल्याने पोलीस ठाणे शिवाजी नगरच्या हद्दीतून चोरलेली बोलोरो जीप व पोलीस ठाणे तुळजापूर हद्दीतून चोरलेली टाटासुमो असे तीन वाहने एकूण किंमत वीस लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीचा बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून गुन्हा उघडकिस आणून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 24 तासात हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आक्रम मोमीन, पोलीस अमलदार दामोदर मुळे, राजेंद्र टेकाळे, रणवीर देशमुख, दत्ता शिंदे, शिवाजी पाटील यांनी केली आहे.

About The Author